- पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०११च्या निवडणुकीत अवघ्या ५ जागांवर भाजपाने आसाममध्ये विजय मिळविला होता. गेल्या ५ वर्षात तो पक्ष ८७ जागांवर पोहोचला. हे कसे काय शक्य झाले? यातील केले गेलेले नियोजन आणि व्यवस्थापन सगळ्याचे राजकीय पक्षांनी अभ्यासण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षात संघाचे ५०० प्रचारक, भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून आसाममध्ये काम करत आहेत. ईशान्येकडील सात राज्यांच्या या समूहात भाजपाकडे एकही राज्य नव्हते. ५ वरून भाजपा ९० वर पोहोचला हे त्या कार्यकर्त्यांच्या चिकाटीचे फळ आहे.
- कॉंग्रेसने ज्या तरुण गोगाई यांची प्रकृती गेली १० वर्षे ठीक नव्हती, त्या तरुण गोगाई यांना २००१ पासून कॉंग्रेसने १५ वर्षे मुख्यमंत्रीपदी बसवले, त्यामुळे त्याच त्याच चेहर्याला मतदार कंटाळले. सामान्य मतदाराला बदल हवा असतो. भाजपाने त्या भावनेचा फायदा उठवला. राम माधव यांच्यासारख्या संघाच्या पूर्णवेळ प्रचारकाला भाजपाच्या पूर्णवेळ कार्यकर्ता करून पाच वर्षे आसामात बसवलेले होते. त्याचे हे फळ आहे.
- त्याचप्रमाणे मोदींनीही आसाममध्ये सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले होते. पाहिजे तेवढा पैसा त्यासाठी ओतण्यात आला आणि या सगळयांचा परिणाम आसाममध्ये कॉंग्रेसची गेल्या १६ वर्षाची सत्ता संपुष्टात आली.
- कॉंग्रेस नेतृत्वाने आता वर्षानुवर्षे तेच तेच चेहरे देणे बंद केले पाहिजे. तरच भविष्यात त्यांना यश मिळू शकेल. आवश्यक तेव्हा आणि आवश्यक तेथे नेतृत्वात झपाटयाने बदल केले पाहिजेत. आता तरुण राजकारणाचे भविष्य ठरवताहेत. त्या तरुणांना कॉंग्रेसकडे आकर्षित करता येईल, असा कोणता कार्यक्रम पक्षातर्फे दिला जातो? कॉंग्रेसपासून तरुण आज दूर आहेत म्हणून विजय दूर आहे.
- एकेकाळी देशात कॉंग्रेसकडे देशातील सर्वच्या सर्व राज्य होती. आज जेमतेम एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी राज्य कॉंग्रेसकडे उरली आहेत. म्हणूनच कॉंग्रेसचे पतन आणि भाजपचे उमलणे याचा अभ्यास समाजशास्त्र, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी जरूर केला पाहिजे.
- आज ज्या डाव्या कम्युनिस्ट पक्षांच्या हातात केरळचे राज्य गेलेले आहे, त्या केरळमध्ये १९५७ साली सर्वात प्रथम कॉंग्रेसला झटका बसला. पण त्यानंतर आलटून-पालटून केरळमध्ये येत राहिले. मात्र कॉंग्रेसला सलगपणे केरळवर पकड कधीच ठेवता आली नाही. गेल्या काही वर्षात झपाटयाने कॉंग्रेसच्या हातून एक एक राज्य निसटून चालले आहे. याचा प्रामुख्याने दोष येतोय तो स्थानिक नेतृत्वाकडे.
- आसाममध्ये भाजपा कधीही नव्हता. आता तो ईशान्येत घुसला. गेली पाच वर्षे संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर आसाममधील भाजपाचे प्रमुख सर्वानंद सोनोवाल यांनी पक्ष वाढविण्यासाठी जी पद्धतशीर पावले उचलली, याचाही परिणाम या निवडणुकीत नक्कीच झालेला आहे.
- आज दोन राज्यांतील सत्ता कॉंग्रेसच्या हातून गेलेली आहे. ईशान्यमधील भाजपाचा विजय म्हणजे दीर्घकाळ कॉंग्रेसला दरवाजा बंद अशी परिस्थिती आहे.
- ज्या ज्योती बसूंनी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षाला २९ वर्षे यश मिळवून दिले आणि नंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी ५ वर्षे अशी ३४ वर्ष डाव्या कम्युनिस्ट पक्षाकडे प. बंगालची सत्ता होती. ज्योती बसू यांना तर पंतप्रधानपदाची संधी चालून आलेली असताना, ‘पंतप्रधानपद नको, माझे राज्यच मी सांभाळतो’ असे ज्यांनी सांगितले, त्या बंगालमधील मजबूत कम्युनिस्ट पक्षाचा पराभव करणे हे इतके सोपे काम नव्हते. २०११ साली ममता बॅनर्जींनी ‘तृणमूल कॉंग्रेस’ स्थापन केली आणि बंगाली बाबूच्या भाषिक मानसिकतेला हात घातला. त्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसबरोबर निवडणूक लढवली आणि आघाडीचे नेतृत्व केले. ती आघाडी मोडून कॉंग्रेस २०१६ ला डाव्यांबरोबर गेली आणि बुडत्या जहाजात पाय रोवले. निदान तृणमूल मधल्या कॉंग्रेसचा टेकू हा बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने कॉंग्रेसला आधार होता, तोही कॉंग्रेस गमावून बसली.
- तामिळनाडूतील जयललितांचा विजय हा अम्मांच्या झगमगाटाचा विजय आहे. या निवडणुकीत तमिळनाडूत जयललितांना २५ जागा कमी झाल्या आणि प. बंगालमध्ये ममतांच्या २५ जागा वाढल्या. कॉंग्रेसला कुठेच वाढ नाही.
- आज देशात भाजपाकडे जी राज्ये आहेत, त्या राज्यात आसामची वाढ झालेली आहे. गुजरात, राजस्थान, काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांबरोबर आता आसाम भाजपाच्या यादीत सामील झाला आहे. तरीही देशातील बहुसंख्य मोठी राज्ये ही जवळपास प्रादेशिक पक्षांच्या हातात आहेत. बिहारमध्ये जनता पक्षाच्या नावावर नितीश कुमार राज्य करीत आहेत. उत्तर प्रदेशातील मुलायम सिंग यांचा सपाही प्रादेशिक पक्ष आहे. बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस हाही प्रादेशिक पक्षच आहे. तामिळनाडूतील अण्णा द्रमुक हाही प्रादेशिक पक्ष आहे. देशातील मोठी राज्य राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या बरोबर नाहीत तर ती प्रादेशिक पक्षांबरोबर आहेत.
- पाच राज्यांच्या निवडणुकीत पॉंडेचरी हे छोटं राज्य कॉंग्रेस पक्षांनं जिंकलं असलं तरी या निवडणुकीत कॉंग्रेसची पिछेहाट झाली हे मान्य करावं लागेल. पण चुकीच्या नेतृत्वाने कॉंग्रेस खचली तर योग्य नियोजनाने भाजप सरकते आहे हे यातून दिसत आहे.
Sunday, May 22, 2016
चुकीचे नेतृत्व आणि योग्य नियोजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment