- सध्या देशभर ऑगस्टा-वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याची चर्चा चालू आहे. यूपीए सरकारने ऑगस्टा या इटालियन कंपनीकडून म्हणजे सोनिया गांधींच्या माहेरच्या कंपनीकडून तीन हजार सहाशे कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला. यामध्ये खूप घोटाळे झाले आणि कंपनीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बाजूला करण्यासाठी भारतातील अनेकांना लाच दिली. त्यात माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांचे नाव आले. इटालियन कोर्टात खटला झाला. कंपनीच्या दोन अधिकार्यांना चार-चार वर्षांची शिक्षा झालेली आहे. कोर्टाच्या निकालपत्रात कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचेदेखील नाव आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते. बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी यांचे नाव आहे. तेदेखील विदेशात घेतले गेले. बोफोर्स प्रकरण दाबून टाकण्यात आले. ऑगस्टा-वेस्टलँड प्रकरणाची चौकशी चालू आहे. बोफोर्स दाबता आले कारण सरकार कॉंग्रेसचे होते. आता हा घोटाळा, भ्रष्टाचार करणारे सत्तेत नाहीत. त्यांना सोडून देणे आणि वाचवणे हे दोन्हीही भाजपच्या मोदी सरकारच्या अंगलट येउ शकते. त्यामुळे चौकशी आणि कारवाई अटळ आहे. त्यामुळे जर या प्रकरणामुळे सोनिया गांधींना अटक करण्याची वेळ आली तर काय होईल?
- राजीव गांधी किंवा सोनिया गांधी ही केवळ व्यक्तींची नावे नसतात. प्रत्येक कॉंग्रेसचा कार्यकर्ता त्यांचा मुखवटा लावून आम्हीच ते आहोत असे भासवत असतो. यात निष्ठा किती आणि बचाव किती हा संशोधनाचा विषय आहे. कॉंग्रेस पक्षाची उभारणी नेहरू-गांधी घराण्याभोवतीच करण्यात आली आहे, यामुळे या व्यक्तींचा फायदा म्हणजे कॉंग्रेसचा फायदा आणि या व्यक्तींचा पडता काळ म्हणजे कॉंग्रेसचा पडता काळ असे समीकरण झालेले आहे. एका व्यक्तीभोवती किंवा एका घराण्याभोवती जेव्हा राजकीय पक्षाची उभारणी होते, तेव्हा त्या पक्षाचे भवितव्य त्या घराण्यातील व्यक्तींच्या चारित्र्यावर, कर्तृत्वावर आणि नेतृत्वक्षमतेवर अवलंबून राहते. अशा परिस्थितीत मोदींना कॉंग्रेसमुक्त भारत करण्यासाठी, कॉंग्रेसला संपवण्यासाठी सोनिया गांधींवर कारवाई ही करावीच लागेल.
- १९८९ पर्यंत देशात कॉंग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. तो स्वबळावर केंद्रात सत्तास्थानी येत होता. यानंतरची परिस्थिती अशी राहिली नाही, हळूहळू कॉंग्रेसचा जनाधार कमी कमी होत गेला. लोकसभेतील त्यांच्या खासदारांची संख्या कमी कमी होत गेली. आता तर ती फारच केविलवाणी आहे. कॉंग्रेसचा जनाधर कमी करण्याचे काम घराणेशाहीने केले आहे. कारण १९७७ मध्ये कॉंग्रेसचा जनता पार्टीकडून पराभव झाला. या पराभवाचे कारण होते आणीबाणी आणि संजय गांधी. संजय गांधी यांनी आणीबाणीत जो धुमाकूळ घातला, त्याचा फटका कॉंग्रेसला बसला. यानंतर क्रमांक लागतो राजीव गांधी यांचा. १९८५च्या निवडणुकीत कॉंग्रेसला लोकसभेत राक्षसी बहुमत होते. पण पुढे राजीव गांधी बोफोर्स घोटाळ्यात अडकले. १९८९ मध्ये त्यांना लोकसभेत बहुमत मिळवता आले नाही आणि यानंतर कॉंग्रेस पक्षाला स्वत:च्या ताकदीवर लोकसभेत कधीही निर्विवाद बहुमत मिळवता आले नाही.
- घराणेशाहीमुळे घराण्याशी निष्ठा ही सर्वात महत्त्वाची मानण्यात आली. कर्तृत्व, गुणवत्ता ही दुय्यम ठरली. शिवराज पाटील घराणेनिष्ठ आहेत, म्हणून त्यांना गृहमंत्रिपद मिळाले. प्रतिभाताई घराणेनिष्ठ आहेत, म्हणून त्यांना राष्ट्रपतिपद मिळाले. मनमोहन सिंग घराणेनिष्ठ आहेत, म्हणून त्यांना पंतप्रधानपद मिळाले. लांब कशाला सातारचे कराडचे पृथ्वीराज चव्हाण हे ही घराणेनीष्ठ आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली होती. अशी अनेकांची नावे आपण घेऊ शकतो. परंतु जे कर्तृत्ववान आहेत आणि ज्यांना स्वतंत्रपणे जनाधार आहे त्यांना कॉंग्रेसमध्ये सन्मान नसतो. कॉंग्रेसमध्ये याचा अर्थ गांधी घराणे त्यांना किंमत देत नाहीत. नारायण राणे हे त्याचे बोलके उदाहरण म्हणता येईल.
- ममता बॅनर्जी कॉंग्रेसमध्ये होत्या. शरद पवारदेखील कॉंग्रेसमध्ये होते. जगमोहन रेड्डी कॉंग्रेसचेच होते. यापैकी पहिल्या दोघांना कॉंग्रेस सोडावी लागली आणि जगमोहन रेड्डी यांच्या मुलाला तुरुंगाची हवा खावी लागली. हे घराणेशाहीचे पाय न चाटल्याचे परिणाम होते. तरीही शरद पवारांनी स्वाभीमान गहाण ठेवून सोनियांशीच जमवले हे अनाकलनीय आहे. कॉंग्रेस पक्ष घराणेशाहीवर चालवायचा की सामूहिक नेतृत्वावर चालवायचा याचा कधी ना कधी निर्णय कॉंग्रेसजनांना करावा लागेल. पंतप्रधानपदासाठीच नाही तर राष्ट्रपतिपदासाठीदेखील पक्षांतर्गत जीवघेणी स्पर्धा होते. त्यामुळे जो लायक आणि अधिक गुणवान असेल तो पुढे येतो. व्यक्तिनिष्ठा लोकशाहीला घातक असते. त्यामुळेच उद्या खरोखरच सोनिया गांधी ऑगस्टा-वेस्टलँड घोटाळ्यात अडकल्या तर पक्षाचे काय होईल? छगन भुजबळ आत गेल्यावर राष्ट्रवादीचे नेते लांब राहिले. थोडी टिका केली पण वाचवायला पुढे आले नाहीत. तशी वेळ सोनियांवर आली तर कॉंग्रेस नेस्तनाबूत होईल. कोणाला वाचवायचे, कसे वाचवायचे, कोणी वाचवायचे आणि कशासाठी वाचवायचे या प्रश्नातच हे सगळे अडकून पडतील.
Sunday, May 15, 2016
तर कॉंग्रेसचे काय होईल?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment