मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या उत्तर पत्रिका घोटाळा ही फार चिंतेची बाब आहे. मुंबई विद्यापीठातला उघडकीस आला म्हणून समजला नाही तर बाकी ठिकाणी काय होत असेल याचा विचारच न केलेला बरा. महाराष्ट्रात अनेक अशी खाजगी विद्यापीठे आहेत तिथे काय होत असेल हे यावरून लक्षात घ्यावे लागेल.नुकताच उघडकीस आलेला मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिकांचा घोटाळा, हे हिमनगाचे छोटेसे टोक असावे असेच यावरून वाटते. विद्यार्थ्यांनी पेपर सोडविल्यानंतर जमा केलेल्या उत्तरपत्रिकांच्या गठ्ठयातून विशिष्ट खूण केलेल्या उत्तरपत्रिका वेगळ्या काढणे, त्या विद्यार्थ्यांच्या घरी नेऊन देणे, घरी सोडवलेल्या उत्तरपत्रिका चोवीस तासांच्या आत परत गठ्ठयात ठेवणे ही कार्यपद्धती असणार्या या घोटाळ्यात सध्या तरी रखवालदार, लिपिक इत्यादी आठ जणांना अटक झाली आहे. अजून किती जण यात आहेत कोणास ठाऊक? पण ही व्याप्ती पूर्ण तपासण्याची गरज आहे. पेपर घोटाळा उघडकीस आल्यानंतर नेहमीप्रमाणे विविध कारणे पुढे केली जात आहेत. त्यात सुरक्षेची जबाबदारी खासगी सुरक्षाव्यवस्थेवर असणे, हंगामी रक्षकांचे प्रमाण जास्त असणे इत्यादी बाबींकडे बोट दाखवले जात आहे. सीसीटिव्ही यंत्रणेचा अभाव हे ही प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे. पण या जर तरच्या गोष्टी आहेत. या घोटाळ्यात पकडलेल्यांमध्ये फक्त सुरक्षारक्षकांचा समावेश नसून विद्यापीठ कार्यालयातील लिपिक व इतर कर्मचार्यांचाही समावेश आहे. त्यामुळे फक्त खाजगी सुरक्षाव्यवस्थेकडे बोट दाखवणे ही दिशाभूल केली जात आहे. यह उघड झालेल्या घोटाळ्यामुळे असे आणखीही घोटाळे नक्कीच चालत असणार या शंकेला पुष्टी मिळते. सुरक्षारक्षकांच्या सहभागामुळे कुंपणच जर शेत खात असेल तर कोर्या उत्तरपत्रिका बाहेर जाणे आणि सोडवलेल्या उत्तरपत्रिका आत येणे, हे कितीसे अवघड असणार? या घोटाळ्यात पकडलेली टोळी ही मोठया संघटीत टोळीची छोटीशी कडी असू शकते. संपूर्ण टोळी पकडली गेली की ज्याची शक्यता जवळजवळ नगण्य आहे, तर या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येईल. त्याचबरोबर हजारो रूपये मोजून विनासायास पदवी मिळवणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत असे घोटाळे हे होतच राहणार. एखादी टोळी पकडली जाते. परंतु नवीन क्लृप्त्या, पद्धती वापरून नवे घोटाळे घडतच राहतात. पेपरफुटी, फेरतपासणीत गुण वाढवणे, कॉपी करु दिली जाणे, डमी विद्यार्थी बसवणे इत्यादी प्रकार यापूर्वी समोर आले. त्यात सहभागी असलेल्यांवर कारवाईही झाली. तरीही नव्याने पेपरघोटाळा घडलाच. त्यामुळे अशा प्रकरणी कठोर कारवाईची गरज आहे.हे सगळे का होते आहे? हे सीईटी आणि नव्या पद्धतीतील वादामुळे. आपल्या विद्यापीठाचा स्टँडर्ड ठेवायचा नाही. लायकी नसणार्यांना प्रवेश देण्यासाठी खाजगी सीईटींचा वापर करायचा. सीईटीतून प्रवेश देण्यासाठी कोर्या उत्तर पत्रिका घ्यायच्या आणि नंतर त्याला प्रवेश देण्याचे प्रकार करायचे. त्यामुळे या अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी हे असले प्रकार केले जातात.हे असले प्रकार थांबण्यासाठी नीट प्रमाणेच सर्वत्र एकच परिक्षा घ्यावी लागेल.आज अभियांत्रिकीचा हा घोटाळा उघडकीस आला आहे. अजून काही दिवसांनी अन्य शाखांचे घोटाळे उघडकीस येतील. हे सर्व मॅनेज केलेले आहेत. वर पासून ते खालपर्यंत. ज्यावेळी वरच्यांना त्यांचा हिस्सा मिळत नाही तेव्हाच ते उघडकीस येतात. अशातून तयार झालेले भ्रष्टाचारी अभियंते हे सरकारी मोक्याच्या जागा अडवतात. हेच या देशाचे दुर्दैव आहे.या देशात सार्वजनिक बांधकामाचे घोटाळे नेहमीच होतात. पूल कोसळणे, इमारत कोसळणे, त्यात दबून नाहक निरपराध माणसे मरणे, हे प्रकार नित्याचे झाले आहेत. ते अशा प्रकारे अभियंते तयार केल्यामुळे होत आहेत. पण यामुळे गुणवान विद्याथ्यार्र्ंवर अन्याय होत आहे त्याचे काय?गुणवान विद्यार्थी अशा प्रकारे बोगस उत्तर पत्रिका लिहीणार्यांमुळे मागे पडतात. परंतु एक प्रश्न यातून निर्माण होतो की ज्यावेळी कोर्या उत्तर पत्रिका दिल्या जातात त्यावेळी त्यावर शेरे कसे मारले जात नाहीत? कोरा पेपर दिला जातो त्यावेळी परिक्षा हॉलमधील सुपरवायजर काय करतात? कोर्या पानांवर काट मारण्याची प्रथा बंद केली गेली का? याचा अर्थ परिक्षांसाठी येणार्या पर्यवेक्षकांपासूनच हा सगळा घोटाळा सुरू आहे. यासाठी आता केंद्रीय पातळीवर एकच परिक्षा घेऊन प्रवेश पद्धती दिली पाहिजे. सर्व प्रकारची आरक्षणे काढून योग्य विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसारच प्रवेश दिला पाहिजे. ज्या पेपर तपासनीसांकडे हे पेपर तपासायला गेले त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीत हा प्रकार किती वर्ष होतो आहे, कोणाकोणाला यापूर्वी पास केले त्यांची नावे घेतली पाहिजेत.
Monday, May 30, 2016
उत्तर पत्रिका घोटाळ्याचे अनुत्तरीत प्रश्न
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment