मातोश्री देविबाई छाबडा यांना आपल्यातून जाऊन ३ वर्ष पूर्ण होतील. पण त्या आपल्यातून गेल्या आहेत असे अजूनही वाटत नाही. म्हणजे ३ वर्ष उलटली तरी त्यांचा इथं कुठं तरी वावर आहे असे सतत वाटत असते. या कॅम्पसमध्ये जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा नकळत त्या इथंच कुठेतरी आहेत असे वाटत राहते. म्हणजे एखादी वार्याची छानशी झुळूक येते आणि गारवा देऊन जाते. त्यातील वारा दिसत नाही पण तो असतो, तसेच मातोश्रींचे इथे असणे सतत जाणवत राहते. थंडी दिसत नाही पण ती आहे हे कळते तसेच मातोश्रींच्या शांत चित्त आणि भावमुद्रेचे अस्तित्व इथे सतत कुठेतरी जाणवत राहते. जसे आपण परमेश्वराला पाहिलेले नसते पण तो आहे हे जाणवत राहते तसेच आईंबाबत इथे जाणवत राहते आणि काम करायला एक प्रकारची शक्ती मिळते. कारण साक्षात शक्ती आणि प्रेरणेचे रूप असे त्यांचे वागणे होते.आदरणीय देविबाई छाबडा यांना सर्वजण आई किंवा मातोश्री म्हणूनच ओळखत असत. अतिशय शांत आणि संयमी अशी त्यांची मुद्रा सतत आधार देणारी अशी होती. छाबडा कुटुंबियांना त्यांनी केलेल्या विविध कार्यात जे काही यश आत्तापर्यंत मिळाले आहे, नावलौकीक मिळाला आहे तो प्रचंड संघर्ष करून मिळाला आहे. या संघर्षात प्रेरणा देणारा आणि आधार देणारा मायेचा स्पर्श जो होता तो मातोश्री तथा देविबाई नारायणदास छाबडा यांचा होता. तो आधार छाबडा परिवारावर आणि त्यांच्या उद्योग समुहात असणार्या प्रत्येकाला आजही मोलाचा वाटतो आणि चिरंतन असा आहे. तो इथेच कुठेतरी आपल्या आसपास वावरतो आहे असे जाणवत राहते. कधी कधी नेमके काय करावे असे सुचत नसताना जेव्हा सहज नजर त्यांच्या फोटोकडे जाते तेव्हा पटकन तो प्रश्न कसा सुटावा, काय निर्णय घ्यावा हे लगेच समजते. हा अनुभव प्रत्येकाने या परिसरात केव्हा ना केव्हा तरी घेतला आहे हे विशेष. मातोश्रींचं आयुष्यच तसं संघर्षाला साथ देणारं आणि समर्थ असं होतं. विस्थापित म्हणून कोल्हापूरात कँपात राहणे नशिबी आले. त्यानंतर सातार्यात आल्यानंतर जे काही मिळवले ते कष्टसाध्य असे या कुटुंबियांनी मिळवले. कोणाचीही मदत नाही की काही नाही अशा कष्टाने जे मिळवले त्यामध्ये मानसिक आधार देण्याचे काम देविबाई छाबडा यांनी केले होते. कोल्हापूरात धान बाजाराचा व्यवसाय सुरू केल्यावर त्यात यश मिळत असतानाच सीमाप्रश्न पेटला आणि त्यात झालेल्या हिंसाचारात, आंदोलनात शून्यातून निर्माण केलेले विश्व पुन्हा गमवावे लागले. जसा फटका भारत पाक फाळणीनंतर बसला तसाच फटका महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नामुळे बसला. तरीही संयमाची सीमा न ओलांडू देता पुन्हा शून्यातून विश्व उभारण्याचे काम स्व. नारायणदास छाबडा यांनी केले. त्यामध्ये मुख्य प्रेरणा होती ती स्व. मातोश्री देविबाई छाबडा यांची. धीर धरा, सगळं काही ठिक होईल असा विश्वास आपल्या शांत संयमी स्वभावातून मातोश्रींनी दिला आणि कोल्हापूर पासून ते सातार्यापर्यंत प्रवास झाला. या सगळ्या प्रवासात कराव्या लागणार्या संघर्षात शिणवठा घालवण्यासाठी मायेची सावली देण्याचे काम मातोश्रींनी केले. त्यामुळे छाबडा शिक्षण संस्थेच्या विश्वस्त म्हणून त्या सदैव वटवृक्षाप्रमाणेच भव्य आणि आधार होत्या. सगळ्या उद्योग समुहाच्या प्रेरणा होत्या.आपल्या संघर्षात सतत साथ देण्याचे काम करून सावलीप्रमाणे उभ्या राहिलेल्या आपल्या पत्नीचे नाव अजरामर झाले पाहिजे, त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा सगळ्या जगाला कळला पाहिजे या उद्देशाने स्व. नारायणदास छाबडा यांनी मातोश्रींच्या नावाने ग्रामीण शिक्षण संस्था सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. वडिलांची ही इच्छा शिरसावंद्य मानून मुलांनी घनशाम छाबडा, सहजराम छाबडा, नंदकुमार छाबडा आणि सर्व कुटुंबियांनी पूर्ण केली. आपल्या पत्नीच्या नावाने सौ देविबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करून घेतली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची सोय स्व. बाबूजी तथा नारायणदास छाबडा यांनी केली. आपल्या माघारीही आपल्या पत्नीच्या वाट्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे या उद्देशाने आपल्या मुलांकडून बाबूजींनी काम करून घेतले. सौ देविबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेमुळे मातोश्री केवळ अजरामर झाल्या नाहीत तर अखंड सौभाग्यवती राहिल्या. आपल्या अर्धांगिनीच्या पदरात हे फार मोठे कार्य सोपवूनच बाबूजींनी जगाचा निरोप घेतला.वडिलांच्या माघारी मुलांनी मातोश्रींच्या आशीर्वादाने आणि साक्षीने या संस्थेचा वटवृक्ष केला. आपल्या मुलांच्या आणि संस्थेच्या कार्याचे मातोश्रींना अतिशय कौतुक वाटायचे. त्या मोठ्या उत्साहाने आणि विश्वासाने हे काम पहायला यायच्या. संस्थेने उभे केलेले प्रत्येक टप्प्यावर त्या जातीने नजर फिरवून पहायच्या तेव्हा त्यांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद आणि समाधान फार मोठे होते. आयुष्य सार्थकी लागल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसायचा. त्यांची ती संस्थेवरून फिरणारी नजर म्हणजे आशीर्वादासारखी असायची. छाबडा उद्योग समुहात काम करणार्या प्रत्येकाला ती प्रेरणा देणारी असायची. त्यामुळेच आज मातोश्रींना जावून तीन वर्ष जरी पूर्ण झाली असली तरी त्या सदैव आपल्या आसपास आहेत असे जाणवल्याशिवाय रहात नाही.प्रत्येकाला आपल्या अडचणीच्यावेळी मन शांत करण्यासाठी एखादं ठिकाण, व्यक्तिमत्व हवं असतं. कित्येकदा या अडचणी, संकटं सांगणंही अवघड होऊन जाते. त्याची खळबळ फक्त आपल्या मनातच होत राहते. पण ही खळबळ आपल्या जवळची व्यक्ती सहजपणे समजून घेते. ज्याप्रमाणे कासवाची पिल्लं तिच्या आईंनं नुसतं नजरेनं पाहिलं तरी त्यांची पोटं भरतात, भूक भागते. तसंच मातोश्रींचे पाहणे, वागणे, वावरणे होते. त्यांनी नुसते पाहिले तरी आपल्याला धीर यायचा. हा फ़ार मोठा धीर छाबडा कुटुंबियांना त्यांच्या असण्याने मिळत होता. तो आजही आहे. कारण अजूनही वाटते त्या इथंच कुठे तरी आहेत. आजच्या या पुण्य दिवसाचे निमित्ताने मातोश्रींना छाबडा कुटुंबिय, छाबडा उद्योग समूह, छाबडा शिक्षण संस्था सर्वांच्या वतीने आदरांजली वाहतो.- प्रफुल्ल फडके* * *
Friday, July 15, 2016
अजूनही वाटते मनास..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment