Saturday, February 25, 2017

शिवसेनेची अवस्था ‘धरलं तर चावतंय...’

 


मुंबई महापालिकेत स्पष्ट कौल न मिळाल्यानं शिवसेनेची अवस्था सध्या धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय अशी झाली आहे. म्हणजे वरकरणी पाहिलं तर शिवसेना आणि भाजप दोघांचीही परिस्थिती खूपच सुधारली आहे. म्हणजे 2012 च्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ 75 होते. त्यात वाढ दिसते आहे. ते 9 नं वाढून 84 झालं आहे. पण स्पष्ट बहुमतापासून मात्र लांब रहावं लागलं आहे.

भाजपची अवस्था तशी फारशी वेगळी नाही, पण गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली अशी झाली आहे. म्हणजे भाजपनं निवडणूक प्रचारात गाजरं दाखवली होती अशी टिका झाली होतीच. पण त्याच गाजराची पुंगी मुंबई महापालिकेत वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली अशा तयारीत भाजप आहे. म्हणजे भाजप सत्तेवर नसल्यामुळे नुकसान काहीच नाही. उलट 31 वरून 82 वर संख्या पोहोचल्यामुळे चांगला जनाधार दिसतो आहे. त्यामुळे सत्तेसाठी शिवसेनच्या नागदुर्‍या काढण्याची गरज आज भाजपला वाटत नाही.परंतु शिवसेना मात्र भाजपच्या बाबतीत धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय अशा खिंडीत सापडली आहे. भाजपला बरोबर घेतलं नाही तर सत्तेपासून लांब रहावं लागेल. बाकी कोणाचेही ठिगळं लावायचं म्हणजे असंगाशी संग अन प्राणाशी गाठ अशी परिस्थिती असेल. भाजपला लांब ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसची साथ घेतली तर तो शिवसेनेचा सर्वात मोठा पराभव असणार आहे. काँग्रेसला संपवण्यासाठी केलेला अट्टाहास गळून पडला आणि नको त्यांच्याशी शय्यासोबत करायची वेळ आली असा व्यवहार तो होईल. शिवाय काँग्रेसला कायम विरोध करणार्‍या शिवसेनेने केवळ सत्ता स्थापनेसाठी त्यांची साथ मिळवली तर शिवसेना भ्रष्ट ठरेल. मतदारांची नाराजी ओढवून घेईल. अशा परिस्थितीत भाजप शिवाय शिवसेनेला पर्याय नाही असेच दिसून येते.शिवसेनेला राज ठाकरे यांनी चांगली संधी दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युतीसाठी हात पुढे केला होता. परंतु शिवसेनेने त्या प्रस्तावाला नाकारले आणि स्वबळाची भाषा केली. जर तरी भाषा करायची नाही, पण तरीही मनसेबरोबर शिवसेना असती तर दोघांच्या मिळून अजून किमान 30 जागा पदरात पडल्या असत्या. सत्तेचा सोपान साध्य झाला असता. पण हे घडू शकलं नाही. बाकी कोणाशीही सोबत करणे तितके शिवसेनेला सोपे नाही. अपक्ष, इतर आणि राष्ट्रवादी हे सगळे तसे शिवसेनेला निशिध्द असेच आहेत.परंतु सध्या तरी शिवसेनेला भाजपशी हात मिळवणी करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. तो स्विकारायचा नसेल तर अगोदर राज्याच्या सत्तेतून बाहेर पडावे लागेल. असं केलं तर तेल गेलं, तुप गेलं हाती आलं धुपाटणं अशी अवस्था शिवसेनेची झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे सध्या तरी भाजपशी काडीमोड घेणे शिवसेनेला परवडणारे नाही हेच चित्र आहे. - प्रफुल्ल फडके

No comments: