Thursday, March 15, 2018

..हा तर बादशाहीचाच अस्त!

एक काळ असा होता की ‘नवाकाळ’ या वर्तमानपत्राला ‘अग्रलेखांचा बादशहा’ म्हटले जायचे. अर्थात हे बादशाहीपद स्वयंघोषितच होते. अग्रलेख वाचण्यासाठी ‘नवाकाळ’ घेण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली, याचे कारण नाटय़ाचार्य खाडिलकरांचे त्याच्याशी नाव जोडले होते. पण १९९७ मध्ये ‘नवाकाळ’चे संपादक बदलल्यानंतर गेल्या वीस वर्षात हे चित्र पुसले गेले. ‘नवाकाळ’चे नाव खाडिलकरवाडीतून पांडेवाडीत गेल्यावर त्या बादशाहीचाच अस्त झाला. बादशहाची राजकुमारी म्हणून मिरवणा-या आणि आपल्या वडिलांच्या आणि आडनावाच्या ख्यातीवर जगणा-या या जयश्रीबाईंना मात्र हे बादशहापद काही मिळू शकले नाही. कारण पुचाट लेखणी आणि सुपारीबाज पत्रकारितेतून त्यांच्या शब्दांना आमच्यासारखी सत्याची धार कुठून असणार? त्यामुळे ज्या ‘नवाकाळ’चा खप एकेकाळी काही लाखांत होता, तो हजारांत आल्यामुळे या बाई हवालदिल झाल्या आहेत. त्यामुळे आपला अस्त आता जवळ आहे हे लक्षात आल्याने अस्वस्थ झालेल्या या बाईंना सगळ्यांचाच अस्त होणार असे वाटू लागले. मागच्याच आठवडय़ात ‘नवाकाळ’ने ९६ व्या वर्षात पदार्पण केले. त्याचबरोबर जयश्रीबाईंनी आपल्या संपादकपदाच्या कारकिर्दीची २१ वर्षे पूर्ण करून बाविसाव्या वर्षात पदार्पण केले. त्यामुळे ‘नवाकाळ’ची शंभरी भरल्याचे त्यांना समोर दिसू लागले आणि आपली वाटचाल गद्धे पंचविशीच्या दिशेने होत असल्याचे लक्षात आल्याने या बाई बेभान झाल्या.कोणावरही काहीही टीका करू लागल्या. त्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी नारायण राणे दिसू लागले. स्वत:चा अस्त जवळ आल्यामुळे त्यांना नारायण राणे यांचे पुढचे पाऊल समजले नाही. ज्या नारायण राणे यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्रीपद अशाप्रकारे चढती कमान पाहिली, त्या कमानीत त्यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर हा यशाचा आलेख उंचावतच होता. केवळ महाराष्ट्रच नाही, तर दिल्लीही त्यांचे स्वागत करत असताना डबक्यात राहणा-यांना वाटले आता नारायण राणे यांचा अस्त झाला. वास्तविक बादशहांनी आपल्या कारभाराची चावी कन्येकडे दिल्यावरच बादशाहीचा अस्त सुरू झाला होता. दुस-याचे कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही, त्यांना कोण काय बोलणार? समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्खाची लक्षणे सांगितली आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘आपुली आपण करी स्तुती। स्वदेशी भोगी विपत्ती। सांगे वडिलांची कीर्ती। तो एक मूर्ख।’ ही सगळी लक्षणे या बाईंना लागू पडतात. कधीकाळी ‘नवाकाळ’ दर्जेदार होता. नाटय़ाचार्य खाडिलकरांचे त्याला नाव आहे म्हणून. साहित्य आणि सरस्वती त्यांच्याकडे पाणी भरत होती. त्यामुळे त्या प्रतिभेचे समस्त महाराष्ट्राने कौतुक केले. पण उत्तम वारसदारांचे लक्षण म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या संपत्तीत भर घालतो, नावलौकिकात भर घालतो तोच असतो. सारस्वतांची संपत्ती ही अक्षरसाहित्य असते. पण खाडिलकरांची ही परंपरा जयश्रीबाईंकडे आली आणि खंडित झाली. त्यांना ना लिहायला जमेना, ना चांगले काही करता येईना. त्यामुळे भरकटणा-या जहाजासारखी त्यांची अवस्था झाली आणि १९९७ पासून त्यांची भरकटणारी पत्रकारिता सुरू झाली. दर्जेदार लिखाणाची परंपरा अस्ताला जाऊन अग्रलेखांचा बादशहा ही बिरुदावली या बाईंनी संपुष्टात आणली. ‘नवाकाळ’ वाचणे वाचकांनी बंद केले. फसव्या जाहिराती, जुगार मटक्याचे आकडे आणि सुपारी घेऊन लिखाण करण्यावर या बाई गुजराण करू लागल्या. ज्याचे पाकीट येईल, ज्याची सुपारी येईल, त्याच्या गौरवाची भाटगिरी करण्याची परंपरा त्यांनी गेली २१ वर्षे जोपासली.महाराष्ट्रातील मोठमोठय़ा दिग्गजांवर निराधार टीका करायची आणि कोणी चौकशीला आले की सामोपचाराने स्तुतिसुमने उधळायची असली तडजोडीची पत्रकारिता ‘नवाकाळ’ने सुरू करून एक नवी प्रथा पाडली. एकेकाळच्या ‘नवाकाळ’चा जयश्रीबाईंच्या काळात सुरू झालेला ‘नवा-काळ’ म्हणजे उतरती कळा होती. आता ९६ व्या वर्षात पदार्पण करताना आपली शंभरी भरत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना जिकडे तिकडे अस्त दिसू लागला. त्यामुळे या बाईंनी नारायण राणे यांचा अस्त झाला अशी आवई उठवण्यास सुरुवात केली. इसापनीतीत आणि काही वर्षापूर्वी बालभारतीच्या पाठय़पुस्तकात आभाळ पडले नावाचा एक पाठ होता. या पाठात सशाच्या पाठीवर झाडाचे सुकलेले पान गळून पडते. तो ससा घाबरून पळत सुटतो. ‘आभाळ पडले, आभाळ पडले’ असे ओरडत सुटतो. त्याच्या ओरडण्याने अनेक छोटे भित्रे प्राणीही आभाळ पडले म्हणून पळत सुटतात. पण जंगलचा राजा निश्चित असतो. तो या पळपुटय़ा भित्र्या प्राण्यांच्या वागण्यावर हसतो आणि आभाळ कधी पडत नाही सांगतो आणि सर्वाना हाकलून देतो. नारायण राणे हे त्या सिंहासारखे राजेच आहेत. कोकणचे, महाराष्ट्राचे आणि दिल्लीच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारे ते राजे आहेत. पण जनाधार नसलेल्या आणि पितृकृपेने पक्षप्रमुखपद भेटलेल्या नेत्यांच्या जीवावर जगणा-या जयश्रीबाईंना ते कसे कळणार? पान पाठीवर पडलेल्या सशाप्रमाणे त्यांचा अस्त झाला, अस्त होणार म्हणून ओरडत पळत आहेत. पण त्यांच्या या ओरडण्याने फक्त त्यांचे हसे झाले आहे. कारण त्यांनी आता गद्धे पंचविशीत प्रवेश केलेला आहे. खरे तर त्यांच्या या सुपारी लिखाणाला उत्तर देण्याची काहीच आवश्यकता नव्हती. त्यातून बाई माणसाच्या नादाला लागण्याचा प्रकार आम्ही करत नाही. पण ते एका वर्तमानपत्राच्या माध्यमातून आलेले असल्यामुळे हे उत्तर देण्याचे आम्ही ठरवले. वास्तविक डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या युगात सनातन वृत्ती बाळगून चालणा-या ‘नवाकाळ’चा अस्त होत असल्याने त्यांना बाकीच्यांचे अस्त दिसतात. समाज हा अशाच चुकीच्या कल्पनांवर जगत असतो. चुकीची मते लादण्याचे काम ‘नवाकाळ’सारखी वर्तमानपत्रे करत असतात. अंधार होतो तेव्हा पृथ्वीने गिरकी घेतलेली असते. सूर्याकडे पाठ केलेली असते आणि अंधार पडतो. पण जग म्हणते सूर्याचा अस्त झाला. पृथ्वी स्वत:हून अंधारात जाते आणि सूर्याचा अस्त झाला, सूर्यास्त झाला म्हणते. जयश्रीबाईंनी नेमके तेच केलेले आहे. पण ना सूर्याचा अस्त होत असतो, ना सूर्यनारायणाचा अस्त होतो, ना नारायण राणे यांचा अस्त होत आहे. अस्त बादशाही साम्राज्याचा झालेला आहे. नारायण राणेंच्या अस्ताचे स्वप्न त्यांना पडले आहे. ही ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ असेच म्हणावे लागेल. त्यांनी संपादकीयमधून व्यक्त केले विचार पाहता ‘नवाकाळ’ हे सुपारीबाज आणि व्यक्तिद्वेषाने लिखाण करणारे नुसते पत्रच आहे. राणेंच्या प्रगतीमुळे त्यांच्या मनात मत्सर का निर्माण झाला? जाहिराती मिळाल्या नाहीत म्हणून की काय? वेळीच हे प्रकार बंद झाले नाहीत आणि राणे जर बोलू लागले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, याची नोंद जयश्री खाडिलकर-पांडे यांनी घ्यावी.

No comments: