एक अत्यंत महत्वाकांक्षी पण संयमी व्यक्तिमत्व अशी पतंगराव कदम यांची ख्याती. कोणत्याही क्षेत्रात उतरल्यावर हाती घेतलेले काम हे सर्वोच्च शिखरावर न्यायचे हा त्यांचा ध्यास होता. त्यातूनच पश्चिम महाराष्टÑातून भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी एक साम्राज्य उभे केले. या सम्राटाला राज्याचे मुख्यमंत्रीपदाचेही वेध लागले होते. पण काँग्रेसमध्ये कार्यक्षम कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवायची जी प्रथा आहे त्या प्रथेने त्यांना राज्यातील सर्वोच्च पद काँग्रेसकडून मिळाले नाही. मात्र शिक्षण क्षेत्रात मात्र त्यांनी आपले स्थान निर्विवादपणे निर्माण केले होते. त्यामुळेच खºया अर्थाने शिक्षण सम्राट ही बिरुदावली त्यांना शोभून दिसली. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरश: साम्राज्यच निर्माण केले. वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना कदम यांनी राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे आपले पाय घट्ट रोवले. हे करत असताना मनाचा संयम राखून त्यांनी हसतमुखपणे कार्य केले. त्यांच्या कार्याचा लाभ काँग्रेसला झाला पण त्यामानाने काँग्रेसने त्यांच्या पदरात काही फारसे टाकले नाही.सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि कमवा आणि शिका योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत केली. कर्मवीरांच्या कार्याने त्यांना भाराऊन टाकले त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचे बिज त्यांच्या मनात रोवले गेले होते. १९६१ मध्ये ते पुण्यात आले. रयतच्याच एका हायस्कूलमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी तेव्हाच्या पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. काही काळाने त्यांनी १९८० च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या या विषयावर डॉक्टरेट मिळविली. केवळ विशीत असताना त्यांनी १९६४ मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली. आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. गेल्या ५३ वर्षांत संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा-कॉलेजेस आहेत. त्यात तब्बल दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. त्यामध्ये दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी कॉलेजांची स्थापना केली आहे. त्यांच्या या योगदानाची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. लोकश्री, इन्स्टिट्यूट आॅफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल मानवता सेवा अवॉर्ड, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल मराठा विश्वभूषण पुरस्कार, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे एक्सलन्स अॅवॉर्ड इन एज्युकेशन, कोल्हापुरातील उद्योगभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. पण पतंगरावांच्या कामगिरीनेच त्या पुरस्कारांची शान वाढली आहे हे निश्चित.शिक्षणासह सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. भारती सहकारी बँक, सोनहिरा सरकारी साखर काररखाना, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी, सोनहिरा कुक्कुटपालन संघ, कृष्णा-येरळा सूतगिरणी यांसह पुणे, सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे. भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे. त्यामुळे रोजगाराभिमुख उद्योग उभारणीत आणि शिक्षणात त्यांचे फार मोठे कार्य आहे. पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जात होते. १९९० मध्ये ते पहिल्यांदा राज्याचे शिक्षणमंत्री बनले. त्यानंतर सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील पतंगराव हे अविभाज्य घटक होते. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री म्हणून पदभार सांभाळला. नोव्हेंबर २००४ मध्ये ते सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री बनले. मार्च २००९ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले. सांगलीतील वांगी-भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले. दिल्लीतील वरिष्ठांशीही अत्यंत घनिष्ठ संबंध होते. अघळपघळ, आणि स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखविणे, हा त्यांचा स्वभावविशेष होता. त्यामुळेच त्यांच्या निधनापूर्वी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीही त्यांना भेटून गेल्या.पतंगराव कदम राजकीय वतुर्ळात स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीला शक्य ती मदत करण्यास ते अजिबात मागेपुढे पाहत नसत. मात्र, रोखठोकपणामुळे काही वेळा ते अडचणीतही येत. किर्लोस्करवाडीतील उद्यमनगर घसरणीला लागत असताना त्यांनी पलूस येथे औद्योगिक वसाहत उभारली. तेथे वाइन प्रकल्प चालवून रोजगारनिर्मितीचाही प्रयत्न त्यांनी केला. सदाशिव पेठेतून सुरुवातपुण्यातील सदाशिव पेठ म्हणजे विद्वानांची खाण असे समजले जायचे. विद्वता ही विद्येच्या मायघरात सिद्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी भारती विद्यापीठाची सुरुवातही त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठेतून सुरु केली. ‘माझ्या गावातला मॅट्रिक झालेला मी पहिला मुलगा होतो. पुण्यात आलो आणि जिथे एक खडा मारला, तर दहा विद्वानांना लागतो, अशा सदाशिव पेठेतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत विद्यापीठाची स्थापना केली’ डॉ. पतंगराव कदम आपला परिचय करून देताना नेहमी अशीच सुरुवात करीत. विद्वत्ता ही फक्त पुणेकरांची मक्तेदारी नाही तर पुण्यात येऊन गावाकडचे लोकही काही करु शकतात हे त्यांनी करुन दाखवले.
Saturday, March 10, 2018
शिक्षण सम्राट डॉ. पतंगराव कदम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment