Friday, January 15, 2021

ऋषीचं कूळ, झाडाचं मूळ

 मर्यादांचे उल्लंघन करणाºयावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो - चाणक्य

ऋषीचं कूळ, झाडाचं मूळ आणि भटारखाना कधीच पाहू नये असे म्हणतात. त्यात आता राजकारण्यांच्या खाजगी जीवनात डोकावू नये असेही वाढवावे लागेल. प्रत्येकाचा असा काही भूतकाळ असतो. भूतकाळात, तारुण्यात किंवा तारुण्याच्या उन्मादात प्रत्येकजणच काहीतरी चुका करतो किंवा कळत नकळत हातून काही होत असतं, पण याचा अर्थ त्याच्या भूतकाळातील घटनांनी त्याचा वर्तमान आणि भविष्यकाळ बरबाद करण्याचा प्रयत्न होणे हे अत्यंत चुकीचे आहे. वर्तमानात ती व्यक्ती कशी वागते आहे याला महत्त्व दिले पाहिजे.

आपल्याकडे अनेक ऋषिमुनी होऊन गेले आहेत. त्या प्रत्येकाच्या जन्माची आणि कुळाची कथा सांगायची म्हटलं तर बाप रे... या कुळातला आहे का हा ऋषी? म्हणून त्याचा तिरस्कार करावा लागेल किंवा थट्टा करावी लागेल, पण त्या ऋषीने केलेली कामगिरी, केलेली तपश्चर्या, केलेले संशोधन, दिलेली शिकवण ही त्याच्या जन्मदात्यांच्या कर्मावर ठरवणे त्या ऋषीवर अन्यायकारकच ठरेल. म्हणून आपल्याकडे ऋषीचे कूळ पाहू नका, तो ऋषी आहे एवढेच बघा, असे म्हटले जाते. लांब कशाला. आपण गुरूपौर्णिमेला व्यासपूजा करतो, व्यासपीठ म्हणतो पण त्या व्यासांचा जन्म आणि त्यांची कथा पाहिली तर ती किती विचित्र आहे? त्यांचा जन्म ज्याप्रकारे झाला यावरून व्यासांचे महत्त्व आपण कमी करत नाही, कारण ऋषीचे कूळ पहायचे नसते. त्यामुळे समाजात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली व्यक्ती, समाजकार्यात असलेली व्यक्ती, राजकारणी व्यक्ती यांच्या खाजगी आयुष्यात, भूतकाळात डोकावणे हे पण चुकीचे आहे. आज धनंजय मुंडे यांचे जे जुने प्रकरण चर्चेत आले आहे त्यावरून तो त्यांचा व्यक्तिगत आणि खाजगी प्रश्न आहे हे लक्षात घेऊन त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही हे लक्षात घेतले पाहिजे.


कोणतेही झाड जसे कितीही सुंदर मोठे, फुला-फळांनी डवरलेले असले तरी त्याची मुळं बघायला कोणी जाऊ नये. झाड सुंदर तर त्याचा आधार असलेले मूळ किती सुंदर आहे म्हणून मूळ शोधायचा प्रयत्न केला तर आत चिखल माती आणि घाणच सापडत जाणार आहे. जी वाईट बाजू आहे ती त्या झाडाने झाकण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणून झाडाची फळं पहा, फुलं पहा, सावली पहा, पण त्याचे मूळ पहायला जाऊ नका, असे आपल्याकडे सांगितले आहे. त्याप्रमाणे धनंजय मुंडे यांच्याकडे सध्या पहावे, त्यांचा भूतकाळ आणि खाजगी आयुष्य या दोन्हींचा काहीही अर्थाअर्थी संबंध नाही.

तशीच आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे भटारखाना. भटारखाना हा कधीच पाहू नये. भटारखाना म्हणजे आपले घरगुती किचन किंवा छोटे स्वयंपाकघर नव्हे, तर तिथे अजस्र असा वावर असतो आणि स्वयंपाक बनवला जात असतो. हॉटेलात, मंगल कार्यालयात, समारंभात मोठ्या प्रमाणावरचा स्वयंपाक होत असतो त्या भटारखान्यात कधीच जायचे नसते. बाहेर सुंदर सुग्रास सुवास देणारे जेवण असले, तरी आतला भाग भटारखान्याचा तितकाच वाईट असतो. तो झाकूनच ठेवायचा असतो. त्यात काय काय प्रकार चाललेले असतात हे पाहिले तर माणूस जेवणच सोडून देईल. ते उघडेबंब असणारे आचारी, त्यांच्या अंगावर भट्टीतील गरमीने आलेला घाम, त्या घामाच्या धारा तिथेच स्वयंपाकात पडत असतात. कणिक भिजवण्यासाठी हाताचाच नाही तर पायांचाही यथेच्छ वापर केला जातो. मोठा स्वयंपाक असतो तेव्हा पुºयांचे पीठ बनवण्यासाठी चक्क पायात प्लॅस्टिकची पिशवी बांधून हे आचारी सिमेंट वाळूचं आळं कालवावं तसे पायानं कणीक भिजवत असतात. निवडणे टिपणे हा प्रकार नसतोच. वर घोंगावणाºया माश्या, डास, आळ्या यांचा संचार, जवळपासचे पक्षी हळूच चोच मारून जात असतात. चव बरोबर झाली की नाही हे पाहण्यासाठी उष्टे चमचे त्यात बुचकळत असतात. असे अनेक प्रकार आपल्याला दिसतात. म्हणून भटारखाना कधी बघायचा नसतो. भटारखान्यातील अस्वच्छता बघितली तर आपलं जेवण करण्याचं मनच उडून जातं. यासाठी आपल्याकडे ऋषीचे कूळ, झाडाचे मूळ आणि भटारखाना कधी पाहू नये, असे सांगितले आहे. त्यात आता राजकारण्यांचा भूतकाळ कधी पाहू नये, असे वाढवावे लागेल.


आपण वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे आनंदाने, अभिमानाने सांगतो, पण एखादे चांगले काम करणारा नेता जर भूतकाळात काही वाईट वागला असेल, चुकीचे पाऊल टाकले असेल, कलंकीत असेल, तर त्याच्या त्या भूतकाळाचा आधार घेऊन त्याला बरबाद करण्याचे प्रयत्न राजकीय मंडळी करत असतात. हे अत्यंत चुकीचे आहे. पदाचा दुरुपयोग करून, अधिकाराचा दुरुपयोग करून जर काही गैरप्रकार केला असेल, तर त्याला यथेच्छ झोडायला हरकत नाही, पण भूतकाळावरून त्याचे भविष्य खराब करण्याचा प्रयत्न म्हणजे माणसाला सुधारायची संधीच द्यायची नाही, असा त्याचा अर्थ होतो. आचार्य चाणक्य आपल्या नीतिवचनात म्हणतात की, मर्यादांचे उल्लंघन करणाºयांवर कधी विश्वास ठेवायचा नसतो. आज धनंजय मुंडे यांच्याबाबतीत त्यांच्याकडून, त्या महिलेकडून आणि सगळीकडूनच मर्यादांचे उल्लंघन केले गेलेले आहे. त्याचे हे परिणाम समोर येताना दिसत आहेत. बाकी काही नाही, पण तो भूतकाळ आता बंदिस्त मर्यादित करून ठेवणे आणि भविष्याकडे लक्ष देणे हेच फक्त हाती आहे.

No comments: