Tuesday, January 5, 2021

वाहिन्यांचे जग



१९७०च्या दशकात तो आला तेव्हा त्याचे नाव टीव्ही होते. टेलिव्हिजन म्हणून ओळखला जाऊ लागला. पण हळूहळू त्याचे उपप्रकार झाले. नवनव्या वाहिन्या तयार होत गेल्या. इतका की, आज त्याचा विस्तार प्रचंड झाला आहे आणि तो जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

पूर्वी एकच होते काम टीव्ही सुरू करायचा म्हणजे दूरदर्शन एवढेच. सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी इसी किंवा क्राऊन करोनाचे शटर उघडायचे आणि तो कृष्णधवल टीव्ही सरू करायचा. कोणाची निळी तर कोणाची काळी काच. मग तो दूरदर्शनचा गोळा फिरत यायचा आणि कार्यक्रमांची यादी यायची आणि सहा वाजेपासून कार्यक्रम सुरू व्हायचे. ८.३० पर्यंत आणि नंतर ८.४० पर्यंत प्रादेशिक कार्यक्रम आणि त्यानंतर नॅशनल प्रोग्राम फॉलोज म्हणत राष्ट्रीय कार्यक्रम सुरू व्हायचे. साधारण ११.२० पर्यंत टीव्ही सुरू रहायचा. रविवारी फक्त दिवसभर कार्यक्रम असायचे. हे सगळे कार्यक्रम पाहिले जायचे.


त्यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी साडेदहाला असणारी साप्ताहिकी कार्यक्रम हा पाहणे उत्सुकतेचा भाग होता. फुल खिले हैं गुलशन गुलशनमध्ये तबस्सूम कोणाची मुलाखत घेणार, मुखवटे आणि चेहरेमध्ये अशोक शेवडे कोणाची मुलाखत घेणार याची उत्सुकता असायची. तसेच शनिवारी कोणता मराठी चित्रपट असणार, रविवारी कोणता चित्रपट असणार याची प्रत्येकाला उत्सुकता असायची. मग तो गजरा सादर करायला या खेपेला कोण येणार, प्रतिभा आणि प्रतिमामध्ये कोण येणार, संताकुकडीमध्ये काय आहे हे सगळं लक्ष देऊन पाहिले जायचे आणि वेळ मिळेल तेव्हा पाहिले जायचे. सुरुवातीच्या काळात प्रत्येक रविवारी कीर्तनही असायची. गोविंद खरे यांची कीर्तनं अनेकवेळा पहायला मिळायची. यात ते कृष्ण गोविंद हरे हरे म्हणताना, मध्येच हसत कृष्ण गोविंद खरे खरे म्हणत कीर्तनाची सांगता करत. ही मजा काही वेगळीच होती.

मुंबईत सेकंड चॅनेल दिसायचे. बाकी सगळीकडे फक्त रिले सेंटर. १९८६ मध्ये बॅ. गाडगीळ आणि त्यानंतर अजित पांजा यांनी या काळात सर्वत्र दूरदर्शनचा प्रसार केला, पण १९९० नंतर एकेक खाजगी वाहिन्या येऊ लागल्या, पण तो काळ सुवर्णकाळ होता. पण दूरदर्शन कधीच कमी पडले नव्हते. आजही इतक्या शेकडो वाहिन्या आहेत, पण दूरदर्शनची विश्वासार्हता आणि लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. कारण काळाची पावले ओळखत त्यांनी फक्त मुलाखती, चित्रपट नाटकावर अवलंबून न राहता स्वत:च्या मालिका सुरू केल्या होत्या. यातील मालिकांनीच लॉकडाऊनच्या काळात भारतीयांना पुन्हा आनंद दिला होता, हे लक्षात घेतले पाहिजे.


दूरदर्शनच्या हम लोग, बुनियाद, नुक्कड, कथासागर, नकाब, रजनी, छोटी बडी बाते, कच्ची धूप, छोटे बडे, दिदीज कॉमेडी शो, तसबीर का दुसरा रूख या मालिका कधीच विसरता येणार नाहीत अशाच आहेत. पण प्रादेशिक पातळीवर येणाºया मालिकांमध्ये मराठीतील चिमणराव गुंड्याभाऊ, आव्हान, बंदीनी, असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे, चाळ नावाची वाचाळ वस्ती, कमांडर, दामिनी, घरकुल, गोट्या, श्वेतांबरा, स्वामी आदी मालिका कधीच विसरता येणार नाहीत अशाच आहेत.

ताक धी नाधीन यांसारखा अंताक्षरीचा कार्यक्रम, आरोहीसाखा संगीतमय कार्यक्रम, आमची माती आमची माणसं मधील गप्पा गोष्टी या दूरदर्शनच्या ठेव्यातील अनमोल गोष्टी आहेत. यामुळेच टीव्हीचा प्रेक्षकवर्ग तयार झाला. आज ज्या वाहिन्यांचे प्रचंड जाळे तयार झालेले आहे त्यांचा पाया हा आपले दूरदर्शन आहे. त्याकाळात त्याला इडियट बॉक्स म्हणून ओळखले जात होते. पण आता तो त्याहीपलीकडे गेला आहे की, सगळ्या भाषांचे, सगळ्या विषयांचे जग आपल्या या छोट्या बॉक्समध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे आता टीव्ही म्हणजे दूरदर्शन हे समीकरण पुसले जात असले, तरी दूरदर्शनने घातलेल्या पायामुळेच आज हे वाहिन्यांचे जग विस्तृत झालेले आहे.


स्टार टीव्ही, झी टीव्ही, एटीएन अशा वाहिन्या येता येता सोनी टीव्ही आला. झी टीव्ही या एका वाहिन्याच्या असंख्य वाहिन्या तयार झाल्या, पण १९९०च्या दशकात झी टीव्ही आला, तेव्हा झी या नावावर खूप विनोद होत होते. म्हणजे झी टीव्हीचा सिंबॉल असलेला झेड याला झी म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे केजीच्या वर्गात एबीसीडी शिकणारे विद्यार्थी एक्स वाय झेड न म्हणता एक्स वाय झी, असे म्हणू लागले होते. या वाहिनीला आपल्या प्रसिद्धीसाठी तेच अभिप्रेत होते. कारण त्यांनी युवा पिढी, वृद्ध पारंपरिक प्रेक्षक लक्षात ठेवलाच नव्हता. तर भविष्यातील ग्लोबल जगाचा, कार्पोरेट जगाचा असणारा प्रेक्षक म्हणजे लहान मुलांना लक्ष्य केले होते. या झी टीव्हीवरच्या त्या काळात गाजलेल्या मालिकांमध्ये अनू कपूरची अंताक्षरी ही प्रचंड लोकप्रिय झालेली होती. क्लोजअप अंताक्षरीने प्रेक्षकांना सांगितिक कार्यक्रमांकडे पुन्हा एकदा वळवले होते. झी टीव्हीवरची दुसरी एक गाजलेली मालिका म्हणजे झी हॉरर शो. रामसे बंधूंनी रुपेरी पडद्यावरून आपली सगळी भूतं आता या झी टीव्हीकडे वळवली होती. त्यामुळे झी हॉरर शो पहायला आणि घरातच किंचाळ्या मारायला प्रेक्षकांना बसवले होते, पण त्या काळात झी टीव्हीला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले ते अंताक्षरी आणि हॉरर शोने. त्याशिवाय त्यांच्या चुना लगा के, तारा अशा अनेक मालिका होत्या. त्याही दीर्घकाळ चालल्या, पण अनेक वाहिन्या येत आणि जात होत्या, विकल्या जात होत्या त्यात झी टीव्हीला स्थिर स्थावर करण्यात या मालिकांचा हातभार फार मोठा आहे. त्यामुळेच त्यांनी वृत्तवाहिन्या, प्रादेशिक वाहिन्या असे जाळे निर्माण केले. नाहीतर एटीएनसारख्या असंख्य वाहिन्या अल्पकाळात बंद पडल्या. कारण फक्त जुने चित्रपट दाखवणे हेच त्यांच्या हातात होते, पण झीने सिनेमासाठी झी सिनेमा ही स्वतंत्र वाहिनी केली. मालिकांसाठी झी टीव्ही, झी मराठी आणि अन्य प्रादेशिक वाहिन्या तयार केल्या. झी न्यूज, झी २४ तास असे प्रत्येक भाषेतील स्वतंत्रपणे जाळे विणले. आता सिनेमातही भरपूर वर्गीकरण करून झी क्लासिक, झी अनमोल अशा कितीतरी वाहिन्या निर्माण केल्या आहेत. मराठीतही झी युवा, झी संगीत यांनी आपल्याकडे प्रेक्षक खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण या सगळ्याचा पाया झी टीव्ही या वाहिनीने घातला.

सोनी टीव्हीला आहट आणि सीआयडी या मालिकेने नाव दिले, तर घरघुती भांडणाच्या, कुरघोडीच्या मालिकांनी धुमाकूळ घालणाºया स्टार प्लसला कौन बनेगा करोडपतीने २००१ ला जीवदान दिले. आता नवनवे टप्पे या करोडपतीने विविध वाहिन्यांवरून पार केले असले, तरी केबीसी आणि स्टार प्लस हे पहिले नाते होते. अशा प्रकारे टीव्ही हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असताना त्यातील घटना आणि मालिकांवर आपण दर मंगळवारी चर्चा करणार आहोत.


No comments: