Sunday, January 24, 2021

आगीच्या वाढत्या घटना

 ातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत् ेनाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्नि: इति सुरिभि:  बृहद्देवता २.२.४


गेल्या काही दिवसांत राज्यात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या महिन्यातच भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेली आगीची दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक होती. यात दहा चिमुकल्यांचा बळी गेला. त्यानंतर दुसरी धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग. या आगीतही पाच जणांचा बळी गेला. छोट्या मोठ्या घटना, तर घडतच आहेत. भिवंडीत गोदामांना आगी लागणे, शुक्रवारी ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये लागलेली आग. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील आग. मुंबईत मालाडमध्ये लागलेली आग. या घटना आपल्याकडे सातत्यानं घडत आहेत, तरी आपण आगीचे प्रकार रोखण्यासाठी कुठे कमी पडत आहोत याचा शोध घेण्याची गरज आहे.


प्रत्येकवेळी शॉर्टसर्किटने आग लागली असे म्हणून वीजयंत्रणेवर खापर फोडण्यात अर्थ नाही. शॉर्टसर्किट का होते याचा तपास आम्ही करणार आहोत का? वायरिंग कमकुवत झाल्यानंतर, जुनाट झाल्यानंतर त्यातून शॉर्टसर्किट होत असते. मग हे वायरिंग वेळच्या वेळी चेक करणे, त्याचा मेंटनन्स ठेवणे, देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी प्रत्येक आस्थापनेने नेमली पाहिजे. काही ठराविक दिवसातून, ठराविक कालावधीनंतर चेक करण्याची जबाबदारी कोणावर तरी दिली पाहिजे. भंडाºयातील घटनेनंतर दोन परिचारिका आणि शल्य चिकित्सकांना निलंबित करून काय साध्य झाले? परिचारिकांनी रुग्णांची दखल घ्यायची की, लाइटची, वायरिंगची? डॉक्टरांनी पेशंट तपासायचे, शल्य चिकित्सकांनी माणसाचे शल्य जाणून घ्यायचे की वीजेचे? त्यामुळे ही जबाबदारी योग्य संबंधित व्यक्तीकडे सोपवली नसल्याने हे बळीचे बकरे बनले आहेत. हे वायरिंग धोकादायक आहे, त्याची दखल घेण्यासाठी कोणीच सूचना केल्या नव्हत्या का? अगदी पूर्ण बंद पडेपर्यंत, आग लागेपर्यंत वाट का पाहिली गेली? कारण कोणावर जबाबदारी सोपवली नाही म्हणून.

सीरमच्या आगीत वेल्डिंगच्या ठिणगीमुळे आग लागल्याचे बोलले जाते; पण वेल्डिंग करताना ठिणग्या उडणार हे माहिती असतानाही तिथे ज्वालाग्राही ज्वलनशील वस्तू कशा काय ठेवल्या गेल्या? आपल्याकडे त्याबाबत सूचना देऊनही माणसे त्याचे पालन करत नाहीत. पेट्रोल पंपावर गाडीला किक मारू नका, मोबाइल घेऊ नका असे सांगितले असले, तरी अनेक जण तिथे स्टार्टर मारतात, कीक मारतात, मोबाइल घेतात. यातून एखादा मोठा भडका उडू शकतो. हे सगळे आगीशी खेळण्याचे प्रकार आहेत. पाण्याशी आणि आगीशी कधी मस्ती करायची नसते. अग्नीचे तत्वच सर्व भस्मसात करणे आहे. त्याला शांत आणि संयमीत ठेवायचे असते; पण आम्हाला आगीशी खेळण्यात मोठेपणा वाटतो. त्यामुळे आम्ही धोके निर्माण करतो. सीरमसारख्या महत्त्वाच्या संस्थेत बांधकाम कर्मचाºयांच्या बेजबाबदारपणामुळे वेल्डिंगमुळे आग लागली. हे लांछनास्पद आहे. एका युद्धपातळीवर काम करणाºया संस्थेत, महत्त्वाच्या दिवसात असे प्रकार होत असतील तर ते चुकीचे आहे. वेल्डिंग करताना ठिणग्या उडतात हे माहिती असताना तिथे ज्वालाग्राही वस्तू ठेवल्या गेल्या, हे त्या कामगारांनी अगोदर सांगणे गरजेचे होते. विषाची परीक्षा कशासाठी घेतली जाते?


जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत्नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्नि: इति सूरिभि: ेबृहद्देवता २.२.४ असे अग्नीचे अग्नीपुराणात वर्णन आढळते. म्हणजे, सर्व भूतांच्या आधी जन्मलेला भूत म्हणजे पंचमहाभूत असा, यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे. द्यु, अंतरिक्ष, पृथ्वी ही तीन अग्नीची जन्मस्थाने आहेत. विस्तव हे अग्नीचे पार्थिव रूप आहे. त्याला जाळणे, भस्मसात करणे हेच माहिती आहे. भक्षण करणे हे त्याचे काम आहे. त्यामुळे कुठेही अग्नी निर्माण करायचा नसतो. त्याला नियंत्रित करायचे असते; पण अग्नी निर्माण होण्याची म्हणजे सर्व स्वाहा होण्याची आम्ही मुभा देत असू तर हे प्रकार वाढणारच ना. आग नियंत्रणात आणणे सोपे काम नसते. आगीशी सामना करताना अग्नीशमन दलाच्या कर्मचाºयांना जीव धोक्यात घालावा लागत असतो. त्यामुळे अग्नीप्रतिबंधक सुविधा आपल्याजवळ असल्याच पाहिजेत. आज मुंबईत खूपच उंच इमारती आहेत. काही इमारती चाळीस पन्नास मजल्यांपेक्षा जास्त आहेत. पुणे, ठाणे या भागातही २० ते २४ मजल्यापर्यंत अनेक इमारती आहेत. या इमारतीत अग्नीशमनाची सोय आहे काय याचा किती जण विचार करतात. आपल्याकडे असलेल्या अग्निशमन बंबाची शिडी जास्तीत जास्त कितव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते याचा अभ्यास सगळ्या महापालिकांकडे आहे का? दहाव्या माळ्यापर्यंत पोहोचतील इतक्या उंच शिड्या आहेत, पण जर पंधरा ते वीस मजल्यादरम्यान आग लागली तर काय करणार? या कशाचेच आमच्याकडे नियोजन नाही. त्यामुळे आम्हाला या आगीशी खेळावेच लागणार आहे. आगीच्या धोक्याशी सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनच आपण आगी न लागण्याच्या कारणांची सोय केली पाहिजे. शॉर्टसर्किटचे निमित्त होणार नाही, असे पाहणे गरजेचे आहे. ज्वालाग्राही पदार्थांची सुरक्षितता राखणे गरजेचे आहे. आग हे असे संकट आहे की, ते फस्त केल्यावरच संपते. म्हणून काळजी घेणे आणि सावध राहणे हाच त्यावर उपाय आहे.

No comments: