Sunday, January 16, 2022

इंडियन आयडल मराठी जोरात


सोनी मराठी गेल्या वर्षभरापासून एकापेक्षा एक चागले कार्यक्रम देत आहे. त्यात मागच्या महिन्यापासून सुरू झालेल्या इंडियन आयडल मराठीने चांगलीच पकड घेतली असून, प्रेक्षक प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि आता बुधवारचीही वाट पाहत असतात. यात परीक्षक असलेल्या अजय-अतुल यांनी जे स्पर्धक निवडून काढले आहेत, ते अक्षरश: भारी असेच आहेत.


सोनी मराठी या वाहिनीने २०२१ या लॉकडाऊनच्या काळातील वर्षभरात प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे आपल्याकडे खेचून घेतल्याचे दिसते. एकीकडे झी मराठीची घसरण होत असताना, रटाळ मालिकांना आणि टुकार विनोदांना कंटाळलेले प्रेक्षक सोनी मराठीने बरोबर खुबीने आपल्याकडे वळवले. त्या काळात कोणताही एपिसोड कंटाळवाणा होणार नाही, याची खात्री देत प्रेक्षकांना टिकवून ठेवले. यात मागच्या वर्षी कौन बनेगा करोडपती, गाथा नवनाथांची, क्रिमीनल्स अशा मालिकांनी चांगलेच समाधान प्रेक्षकांना दिले. त्यात आता मागच्या महिन्यापासून इंडियन आयडल मराठीच्या माध्यमातून एक चांगला नवा कोरा कार्यक्रम प्रेक्षकांना दिला आहे.

तसे कलर्सवर सूर नवा ध्यास नवा, झी मराठीवर सारेगमप हे कार्यक्रम गेल्या वर्षभरात झाले. पण तीच ती गाणी वेगवेगळ्या स्पर्धकांकडून येताना दिसतात. कोणती नवी गाणी यात सादर करावीत, असे कोणाला वाटत नाही. यातून या संयोजक आणि परीक्षकांच्या मर्यादा दिसू शकत होत्या, म्हणजे लिटील चॅम्सचे परीक्षक पंचरत्न नव्या स्पर्धकांना मार्गदर्शन करताना सांगायचे की, आमच्या पर्वात हेच गाणे मी गायले होते, ते कसे गायचे, त्यातील बारकावे सांगायचे. म्हणजे एकूणच त्या व्यतिरिक्त अन्य काही स्पर्धकांनी करायचे नाही, नवी गाणी सादर केली, तर त्याचे मापदंड परीक्षकांकडे नाहीत का?


त्या तुलनेत इंडियन आयडलने नवनवी गाणी सादर करायचा प्रयत्न आतापर्यंत केलेला दिसून येतो. अजय-अतुलचे मार्गदर्शन आणि परीक्षण आणि आतापर्यंत विविध पाहुणे या ठिकाणी येऊन गेले, त्यांनीही धमाल आणली होती. उत्तरा केळकर, साधना सरगम, अनुराधा पौडवाल, आरती अंकोलीकर टिकेकर, सुदेश भोसले आणि या आठवड्यात संगीत संयोजक अमर हळदीपूर यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन हे अत्यंत चांगल्या दर्जाचे होते.

यामध्ये स्पर्धकांनी सादर केलेली गाणीही वेगळ्या दर्जाची आणि नवीन आहेत. जी गाणी सर्वोत्तम आहेत; पण अशा कार्यक्रमातून सादर केली जात नव्हती, अशी गाणी या कार्यक्रमात पहायला मिळतात. यातील विशेष उल्लेख करावा लागेल तो याच आठवड्यात सादर केलेल्या अंगाई गीतांचा. तशी पुरुषांनी गायलेली अंगाई गीते फार कमी आहेत; पण यातील गाजलेली दोन गीते ही अमर हळदीपूर यांनी संयोजित केलेली आहेत. त्यातील एक गाणे १९७४च्या कुँवारा बाप या चित्रपटातील आहे, तर दुसरे गीत एक होता विदूषक या चित्रपटातील. एक होता विदूषकमधील हे अंगाई गीत पनवेलच्या सागर म्हात्रेने इतके अप्रतिम सादर केले की, परीक्षकांनी तू खरोखरच बाप आहेस का?, असा सवाल करत इतकी इन्व्हालमेंट कशी, असा प्रश्न विचारला. हे या कार्यक्रमाचे नाविन्य आहे.


साधारणपणे प्रत्येक कार्यक्रमात ठराविक गायकांची गाजलेली गाणी येतात; पण त्या पलीकडेही वेगळ्या आवाजाचे गायक आहेत, त्याचा प्रयत्न कोणी करत नाही. हे नेमके पण या इंडियन आयडलमध्ये दिसतो. यात श्वेता दांडेकर, कैवल्य केजकर, सागर म्हात्रे, भाग्यश्री टिकले, आम्रपाली पगारे हे एकसेएक गाणी प्रत्येक आठवड्यात सादर करताना दिसतात. श्वेता दांडेकरने तर कधी पुरुषांच्या आवाजात, तर कधी स्त्रियांचीही गाणी सादर करून आपली क्षमता दाखवली. विशेष म्हणजे श्वेता दांडेकरने मागच्या आठवड्यात उषा उत्थुप यांचे हरी ओम हरी हे गाणे अत्यंत सुंदर सादर केले होते, अशी गाणी रिअ‍ॅलिटी शोमध्ये होत नाहीत. या गाण्याचा प्रेक्षक, परीक्षक आणि सुदेश भोसले यांनी इतका आनंद घेतला की, सगळ्यांना तिने अक्षरश: नाचवले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची रंजकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

विशेष म्हणजे कलाकारांचे टॅलेंट शोधण्याचा चांगला प्रयत्न या कार्यक्रमाने केलेला आहे. म्हणजे एक हमालाचा मुलगा आहे. त्याला कधी इथपर्यंत पोहोचू असे वाटलेही नव्हते, पण त्याला इथे संधी मिळाली. आम्रपाली पगारे या छोट्या मुलीकडे कसलीही साधनसुविधा नाही; पण तिने फक्त मोबाइलवरून गाणी ऐकून तिने केलेली तयारी हे आश्चर्यच आहे. त्यामुळे सामान्यांना मिळालेली ही असामान्य संधी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रत्येक आठवड्याला हा कार्यक्रम लोकप्रियतेचा कळस गाठताना दिसत आहे. या आठवड्यात आम्रपाली पगारेने सादर केलेले मेरा साया या चित्रपटातील लता मंगशेकर यांनी गायलेलं, तू जहा जहा चलेगा, मेरा साया साथ होगा हे गाणे आश्चर्यकारक होते. कारण कोणत्याही रिअ‍ॅलीटी शोमध्ये आजपर्यंत हे गाणे सादर झालेले नाही. ठराविक पठडीतील साचेबद्ध गाणीच सादर होतात. त्यामुळे वेगळी गाणी ऐकायला पहायला मिळणे हे या इंडियन आयडल मराठीचे खास वैशिष्ठ्य आहे.


प्रफुल्ल फडके/छोटा पडदा

9152448055\\

13/1/2022

No comments: