Thursday, January 13, 2022

कल्पक संगीतकार आर. डी. बर्मन


संगीतकार आर. डी. बर्मन यांची आज पुण्यतिथी. बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक अशी ख्याती स्वत:च्या जिद्दीवर मिळवणारा संगीतकार म्हणजे आर. डी. आपल्या तीन दशकांच्या म्हणजे १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणीदेखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्यांचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.

आर.डी.चे वडील प्रख्यात संगीतकार सचिनदेव बर्मन १९४४ साली कोलकात्याहून मुंबईत आले. त्यावेळी राहुलदेव ५ वर्षांचा होता, मात्र चित्रपटसृष्टीत जम बसेपर्यंत कुटुंबाला येथे ठेवण्यात अर्थ नाही, या निर्णयापर्यंत सचिनदेव आले आणि त्यांनी माय-लेकांना पुन्हा कोलकात्याला धाडले. कोलकात्यात लहानाचा मोठा झालेल्या राहुलदेवला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याचा दिवस सायकल चालवणे, पोहणे, मित्रांसोबत भटकणे यातच संपत असे. कुठेही न शिकता त्याने माऊथ आॅर्गनवर प्रभुत्व मिळवले. वेळ काढून कोलकात्यात येणारे सचिनदेव मुलाच्या करामती पाहून काळजीत पडत. हा मुलगा तर फारच उनाड झाला आहे, मोठेपणी तो काय करणार, असा त्यांचा नेहमीचा सूर असे. सचिनदांचा हा दृष्टिकोन राहुलदेवच्या शाळेतील बक्षीससमारंभामुळे बदलला. या कार्यक्रमात सचिनदेवांच्या प्रमुख उपस्थितीत राहुलने व्यासपीठावरून माऊथ आॅर्गन सफाईदारपणे वाजवून दाखवला. दुसºया दिवशी सचिनदेवांनी त्याला विचारले, पुढे काय करायचे ठरवले आहेस, यावर ‘मला तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार व्हायचे आहे.’ हे राहुलचे उत्तर सचिनदेवांसाठी अनपेक्षित होते.


या प्रसंगानंतर सचिनदेवांनी राहुलला प्रथम ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला व पुढे उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद शिकण्यासाठी धाडले. त्यानंतर राहुलदेवने दाखवलेला झपाटा विलक्षण होता. वयाच्या १६व्या वर्षी मुंबईत दाखल झालेला राहुल लगेचच वडिलांचा सहाय्यक म्हणून काम करू लागला. एवढेच नव्हे, तर त्या वयात त्याने स्वरबद्ध केलेल्या ‘ए मेरी टोपी पलटके आ’ (फंटुश) आणि ‘सर जो तेरा चकराए’ (प्यासा) या चालींचा सचिनदेवांनी उपयोग केला. सचिनदेवांचा भर लोकगीतांवर तर राहुलदेवांना कोणताही संगीतप्रकार वर्ज्य नव्हता, साहजिकच ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटापासून पंचमच्या करामतीमुळे सचिनदेवांच्या गाण्यांची शैली कमालीची बदलली.

सचिनदेवांना साहाय्य करण्यात राहुलदेवांची उमेदीतील अनेक वर्षे वाया गेली. सचिनदांनी नाकारलेला ‘भूत बंगला’ हा चित्रपट त्याला मिळाला, परंतु मेहमूदने त्यापूर्वी ‘छोटे नबाब’ची निर्मिती सुरू केली आणि तो राहुलदेव बर्मन यांचा पहिला सिनेमा ठरला. ‘आराधना’च्या गाण्यांच्या निर्मितीत पंचमचा सिंहाचा वाटा असूनही त्या गाण्यांच्या तबकड्यांचे अनावरण सचिनदेवांच्या निवासस्थानी झाले, तेव्हा राहुल यांचे कोणीही कौतुक केले नाही, पूर्ण कार्यक्रमभर तो एका कोपºयात उभा होता. स्वतंत्रपणे संगीत देण्याची हीच वेळ आहे, या निर्णयापर्यंत तेव्हा तो आला.


वडील आणि मुलगा आता स्पर्धक झाले. पंचम एकेक शिखर सर करत असताना, सचिनदेव मात्र झाकोळले जाऊ लागले. १ आॅक्टोबर, १९७४ या सचिनदेवांच्या वाढदिवसाच्या रात्री न चुकता राहुलदेव रात्री अकरा वाजता घरी पोहोचले. दाराची बेल वाजवणार तोच ‘माझ्या कानावर ‘आप की कसम’ आणि ‘अजनबी’ या चित्रपटांतील गाणी पडली. वडील माझी गाणी ऐकतायत हे कळल्यानंतर राहुलदेवांनी संकोचून बाहेरच थांबणे पसंत केले.’ गाण्यांचा आवाज थांबल्यानंतर ते घरात शिरले. त्यानंतर सचिनदेव म्हणाले, ‘पंचम माझ्यापेक्षा मोठा संगीतकार झाला आहे हे मी मान्य करतो, असा मुलगा लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे. गुणवत्तेच्या कसोटीवर मुलगा वडिलांपेक्षा श्रेष्ठ ठरत असेल, तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही.’

संगीताची जागा निर्माण करणे हे आर. डी. यांचे वैशिष्ठ्य होते. शोले चित्रपट हा बॉलीवूडचा माइलस्टोन. हा काही संगीतप्रधान चित्रपट नाही; पण त्या चित्रपटातही संगीत किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले. यातील मेहबुबा मेहबुबा या गाण्यासाठी बाटलीत फुंकर घालून निर्माण केलेला आवाज हे जागतिक पातळीवर झालेले कौतुक होते. आजही पाश्चिमात्य देशात या गाण्याच्या रिमेक्स होतात, हे त्या संगीतकाराचे वैशिष्ठ्य आहे. वयाच्या अवघ्या ५५व्या वर्षी आजच्या दिवशी आर. डी. हे जग सोडून गेले, पण त्यांनी केलेली संगीत क्षेत्रातील कामगिरी मात्र अजरामर अशीच आहे.


आर. डी. यांच्या अफलातून संगीत देण्याचा आणि स्वरांचा शोध घेण्याच्या किमयेमुळेच तर आशा भोसले त्यांच्या प्रेमात पडल्या. दोघांनी विवाहही केला, पण हा विवाह म्हणजे दोन संगीत सूरांचे अफलातून सरगम होते. आशा आणि आर. डी. यांनी दिलेली गाणी म्हणजे अफलातून आणि अजरामर संगीताचा खजिना. त्याचप्रमाणे किशोरकुमार आणि आर. डी. यांचेही समीकरण जबरदस्त जमलेले होते, पण आपल्या कारकीर्दीत एका उंचीवर नेणारे संगीत आर. डी. यांनी निर्माण केले. आज आर. डी. यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्या संगीताला मानवंदना.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\

4/1/2022

No comments: