Friday, January 14, 2022

अक्षम्य चूक


तशी ती घटना गंभीर होती, पण त्याचे गांभीर्य सर्वसामान्यांना समजले नाही. त्यात राजकीय नेते आणि विशेषत: काँग्रेसने त्याला स्टंटबाजीचे स्वरूप दिले. पण तो एक फार मोठा धोक्याचा प्रसंग होता, त्यामुळेच पंतप्रधानांनी मी जीवंत पोहोचलो असे ट्विट केले. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या ताफ्याला अडवण्याचा जो प्रयत्न झाला तो इतक्या सहजपणे घेऊन चालणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

पण पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत पंजाब सरकार आणि पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या बेजबाबदारपणामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दौºयादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे, पण पंजाब सरकार आणि तिथले प्रशासन त्याकडे फारशा गांभीर्याने पाहत नसल्याचे भटिंडा विमानतळावरच दिसून आले. पंतप्रधानांच्या औपचारिक स्वागतासाठी मुख्यमंत्री चन्नी तिकडे फिरकलेही नाहीत. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी तेथे उपस्थित राहण्याचा प्रोटोकॉल असताना तेही तिथे नव्हते. भटिंडाहून हुसेनीवाला येथे जाणाºया पंतप्रधानांच्या ताफ्यात या दोघांच्या गाड्या रिकाम्याच धावत होत्या. पोलीस उपमहासंचालकही विमानतळावर आणि ताफ्यात नव्हते. मोदी माघारी गेल्यानंतर ते घटनास्थळी आले.


वास्तविक पंतप्रधानांचा कार्यक्रम अकरा दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. नियोजित मार्गात अडथळे आले, तर पर्यायी सुरक्षित मार्ग तयार ठेवणे, ही पोलिसांची जबाबदारी होती. पंतप्रधान हुसेनीवाला येथे हेलिकॉप्टरने नाही, तर मोटारीने जाणार हे आंदोलनकर्त्यांना समजले कसे? घटनास्थळापासून २३ किलोमीटरवर पाकिस्तानची सीमा आहे. तिथे दहशतवादी, अमली पदार्थांचे तस्कर यांचा सतत धोका असतो. या भागात दोन मोठे बॉम्बस्फोटही झाले आहेत. शिवाय, शेतकरी आंदोलनामुळेही तणावाची स्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पंतप्रधानांच्या रस्ते प्रवासाला गो अहेडचा संदेश देताना योग्य ती खबरदारी घेतली नाही. दुसरीकडे, सरकार म्हणून जबाबदारी घेण्याऐवजी मुख्यमंत्री मात्र बेजबाबदार विधाने करत राहिले. केवळ काँग्रेस नेत्यांना खूश करण्यासाठी बेजबाबदारी वक्तव्ये येऊ लागली हे अत्यंत चुकीचे आहे. म्हणे कार्यक्रमाला गर्दी नसल्याने मोदी परत गेल्याचे सांगत सुरक्षेच्या मुद्यावर बोलण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले. हे इतके सहज घेऊन चालणार नाही. त्यामागे फार मोठा घातपाताचा कट असू शकतो हे नक्कीच.


पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन मुख्य सचिव बंदोपाध्याय यांनी पंतप्रधानांच्या दौºयाबाबत दाखवलेल्या बेफिकिरीमुळे केंद्राने त्यांना परत बोलावले होते, पण ममता बॅनर्जींनी त्यांना राजीनामा द्यायला लावून मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली. चन्नी यांच्या वक्तव्यावरून इथेही तसेच होण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, विरोधातील राज्य सरकारे ठरवून असेच वागू लागली, तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होतील. असा पायंडा पडणे योग्य नाही. त्यामुळे पंजाब सरकारला योग्य ती समज दिलीच पाहिजे.

ही गोष्ट सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाची नसल्याने त्याला फारसे सामान्यांनी महत्त्व दिल्याचे दिसले नाही. त्यांच्यापर्यंत प्रसारमाध्यमांनी विशेषत: टिव्ही वृत्त वाहिन्यांनी बातमी पसरवली. ती ही की पंतप्रधानांची गाडी २० मिनिटे अडकून पडली. म्हणजे त्या कोणा एका पुलावरच ती ट्रॅफिक जाममध्ये अडकली. याचे सामान्यांना काय कौतुक असणार? म्हणजे अस्वलापुढे एखाद्याने आपल्या मिशीवर हात फिरवून केसांचे कौतुक करण्याचाच तो प्रकार होता. ज्याच्या अंगावर भरपूर केस आहेत त्याला या मिशीचे काय कौतुक? तसाच प्रकार सामान्यांच्या बाबतीत झाला. कारण ट्रॅफिक जाम होणे, गाडी अडकून पडणे, कुठले तरी आंदोलक आले म्हणून रस्ता जाम होणे हे सामान्यांना रोजचेच आहे. त्यांची ही गाडी रोजच अडून पडते. कित्येक वेळा अशा प्रकाराने त्यांना आॅफीसला उशीर होतो, लेटमार्क होतो. त्यामुळे त्या घटनेचे ज्याप्रकारे वाहिन्यांनी प्रदर्शन केले त्यावरून फक्त पंतप्रधानांची गाडी ट्रॅफिकमध्ये २० मिनिटे अडकून पडली एवढेच दाखवले गेले, पण यामागे काही घातपाताचा कट असावा हे काही केल्या माध्यमांनी सांगितले नाही. हा माध्यमांचा अधमपणाच म्हणावा लागेल.


या घटनेने संपूर्ण भारतीय जनता पार्टी इतकी हादरून गेली की, त्यामुळे लोकांना त्याचे गांभीर्य समजले. स्मृती इराणी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे प्रोटोकॉल मोडला, बी प्लॅनची माहिती कोणी फोडली आणि पंजाब पोलिसांनी पंजाब सरकारच्या सांगण्यावरून कसा घातपाताचा प्रयत्न केला हे स्पष्ट केले, तेव्हा सामान्य माणसांना त्यातील गांभीर्य समजले. अन्यथा हे समजणे अवघड होते. संपूर्ण भाजप नेत्यांनी याचा निषेध केला, त्याबाबत चिंता व्यक्त केली आणि पंतप्रधानांनी स्वत: जेव्हा राष्ट्रपतींना भेटून वस्तुस्थिती मांडली, तेव्हा त्याचे गांभीर्य वाढत गेले. शिवाय हा सुरक्षेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही गेला. या दरम्यानच्या काळात मुंबईत कुठे आशिष शेलार यांनी महामृत्युंजय यज्ञ केला, कुठे प्रार्थना केल्या गेल्या. त्यामुळे ही घटना किती गंभीर आहे हे सामान्यांना कळले. नाहीतर कळलेही नसते. तसा पंजाबचा इतिहास हा भारतीय पंतप्रधानांच्या बाबतीत रक्षकच भक्षक बनू शकतात असा आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या सुरक्षारक्षकांनीच त्यांची हत्या केली होती. ते पंजाबी होते. त्यामुळे ते किती कडवट आहेत हे संपूर्ण देशाने पाहिले. या कडवट पंजाबी पोलिसांकडूनच काही घातपाताचा प्रयत्न झाला का हा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे, पण हे इतक्या सहजपणे घेऊन चालणार नाही. त्यासाठी पंजाबच्या सुरक्षा यंत्रणेच्या या अक्षम्य चुकीबाबत नाही, तर जाणूनबुजून राजकारण करणाºया कृतीचे कोणीही समर्थन करता कामा नये.

8/1/2022

No comments: