त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी। चित्त नाही नामी तरी वाया।। असे संत ज्ञानेश्वर हरिपाठातील दहाव्या अभंगात म्हणतात. म्हणजे तुम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या किंवा नद्यांमध्ये स्नान केले, पण जर तुमच्या चित्तात भगवंताचे नाव नसेल, तर तो सर्व प्रवास वाया आहे. वारीचा मार्ग हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे. वारीच्या मार्गावर असताना माणसाचे मन अत्यंत शुद्ध होते. कारण हा पंढरीचा मार्गच असा आहे की, त्या मार्गावर आपण चित्तशुद्धीसाठी जातो. म्हणूनच हरिपाठाचा अनुभव घेत ही वारी करायची असते. हरि मुखे म्हणा हरि मुखे, पुण्याची गणना कोण करी असे म्हणतात ते यासाठीच. चित्त शुद्ध झाले की मन मोठे होते. या मोठ्या मनात किती माणूसधर्म साठवला जाईल याची गणनाही करता येणार नाही.
म्हणूनच माऊली म्हणतात की, त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी। चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ॥ १॥ नामासी विन्मुख तो नर पापिया। हरीविण धावया न पावे कोणी॥ २॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक। नामे तिन्ही लोक उद्धरती॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे। परंपरा त्याचे कुळ शुद्ध॥ ४॥ याचा अर्थ हरीच्या नामाकडे चित्त नाही आणि गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम जो प्रयाग त्या प्रयागास जातो, अथवा दुसºया अनेक तीर्थयात्रा करतो, तर त्याचे ते करणे व्यर्थ होय. पाण्याने शरीर स्वच्छ होते, पण मन नाही. मन स्वच्छ करण्यासाठी हरिनामाचा साबणच हवा. सगळी मनातील मलिनता या मार्गावर दूर होते. सगळे स्वच्छ दिसायला लागते. जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे, म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडविण्यास हरीवाचून दुसरा कोण धाव घेणारा आहे? पाप म्हणजे दुसरे, तिसरे काहीच नाही. हरिमुखापासून, परमात्म्यापासून जो लांब गेला तो पापी. त्याला पुण्याचा मार्ग दाखवतो तो वारीचा मार्ग. भगवंताच्या नामाने पातकांपासून त्रैलोक्याचा उद्धार होतो असे वाल्मिकींनी रामायणात सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हरीच्या नामाचे जो भजन करतो, त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो. म्हणजे पंढरीची वारी आणि वारीचा मार्ग हा आपल्या उद्धाराचा मार्ग आहे. जीवन सार्थकी लावण्याचा मार्ग आहे. या मार्गातला सर्वात मोठा भाग हा हरिनामाचा आहे. हरिनामाची प्रेरणा देतो तो हरिपाठ. त्यामुळे हरिपाठाशिवाय वारी पूर्ण होत नाही. हरिपाठ हा वारीचा एक सोहळा आहे.
कर्मकांडाला महत्त्व न देता नामस्मरणाला, नामंसकीर्तनाला या वारीमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. वारकरी संप्रदायातील सर्वच संतांनी नामजपाचा महिमा सांगितला आहे. जनाबाई तर शेणाच्या गोºया थापतानाही त्या विठ्ठलाचे नाम घेत होती. त्यामुळे विठ्ठलमय झालेल्या जनीच्या गोवºया आणि तिथे असलेल्या दुसºया महिलेच्या गोवºया एकत्र झाल्या. त्यावरून भांडण जुंपले, तेव्हा माझ्या गोवºयांतून विठ्ठलाचे नाव ऐकायला मिळेल हे मोठ्या विश्वासाने तिने सांगितले होते आणि खरोखरच ती अनुभूती चक्क संत कबीरांनी घेतली. कबीरांनी त्याक्षणी जनाबार्इंना गुरू मानले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून पडलेला दोहा म्हणजे दु:ख में करे समिरन, सुख में करे ना कोई/जो करे समिरन सुख में, उसे दु:ख काहे को होये? हा आहे. तुम्ही सुखात असताना त्या हरीचे, विठ्ठलाचे, पांडुरंगाचे, परमेश्वराचे नाव घेतले तर दु:ख तुमच्या कधी वाट्यालाच येणार नाही. हरिनामातच सर्व सुखं आहेत हे वारीचा, पंढरीचा मार्ग दाखवतो.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
No comments:
Post a Comment