श्रीदासबोधातील दशक सातवा (विज्ञान दशक)मधील समास सहावा हा बद्धमुक्त निरुपण या नावाने ओळखला जातो. अत्यंत महत्त्वाच्या आणि गाभाभूत समासात समर्थ रामदास स्वामींनी प्रारंभी श्रोत्याची द्विधा मन:स्थिती आणि संभ्रम (ओवी १ ते १५) याकडे लक्ष वेधले आहे. इथे समर्थ ब्रह्मसुखाचा अनुभव आणि संसाराची ओढाताण यावर बोलतात. समासाच्या सुरुवातीला श्रोता समर्थांसमोर अतिशय प्रामाणिकपणे आपली मानसिक अस्वस्थता मांडतो. तो म्हणतो की, आपण जेव्हा अद्वैत ब्रह्माचे निरुपण करता, तेव्हा ते ऐकून मन क्षणभर तदाकार होते, शांत होते आणि परमोच्च सुखाचा अनुभव घेते. पण काही वेळातच ती वृत्ती पुन्हा खाली घसरते आणि पूर्ववत संसारी विषयात व काम-क्रोधादी विकारांत अडकते. याबाबत किटक न्यायाची अवस्था असल्यासारखे त्याला वाटते. इथे श्रोता आपली तुलना एका कीटकाशी करतो, ज्याच्या पायाला दोरा बांधून कोणीतरी सतत खाली-वर ओढावे. अध्यात्माचे श्रवण करताना मन वर (ब्रह्माकडे) जाते आणि निरुपण संपताच पुन्हा खाली (संसारात) कोसळते. या येरझारांमुळे श्रोता हतबल झाला आहे.
या समासात दोन्हीकडे अंतरण्याची भीती श्रोत्याच्या मनात निर्माण होते. श्रोत्याच्या मनात विचार येतो की, जर मी ब्रह्मरूप झालो आहे, तर पुन्हा संसारात कसा आलो? आणि जर मी संसारीच आहे, तर ब्रह्मसुखाची गोडी मला का लागली? या द्विधा मन:स्थितीमुळे ना प्रपंच नीट होतो, ना परमार्थ साधतो. दोन्हीकडून माणूस भरकटतो. म्हणून श्रोता आग्रहाने विचारतो की, आता यावर नक्की काय उपाय करावा? माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार का राहत नाही?
यावर समर्थ अत्यंत समर्थपणे उत्तर देतात. ‘फक्त शुक आणि वामदेवच मुक्त झाले का?’ वक्ता म्हणजे समर्थ यांचे उत्तर (ओवी १६ ते ३६) देतात. इतर ऋषी-मुनींचे उदाहरणही ते देतात. श्रोत्याच्या या प्रश्नावर वक्ता (समर्थ) अत्यंत मार्मिक प्रतिवाद करतात. श्रोता वेदांचा हवाला देऊन म्हणतो की, ‘वेद असे सांगतात की, केवळ शुकदेव आणि वामदेव हेच मुक्त झाले, बाकी सर्वजण बद्धच राहिले.’ यावर समर्थ संताप व्यक्त करतात आणि विचारतात की, जर या दोघांशिवाय बाकी सगळे बुडाले, तर मग महर्षी व्यास, प्रल्हाद, नारद, राजा जनक, अंबरीष, अर्जुन, वसिष्ठ, विभीषण यांसारखे असंख्य सिद्ध, योगी आणि आत्मज्ञानी पुरुष काय व्यर्थ गेले?
हा ‘पढतमूर्ख’ लोकांचा समज आहे. समर्थ स्पष्ट शब्दांत सांगतात की, जे लोक असा संकुचित अर्थ काढतात की, फक्त मोजकेच लोक मुक्त झाले आणि बाकी सगळे बद्ध राहिले, त्यांना ‘पढतमूर्ख’ म्हणावे. त्यासाठी वेदांचे खरे सामर्थ्य समजून घेतले पाहिजे. वेदांचे महत्त्व आणि महिमा अगाध आहे. वेदांचा किंवा ग्रंथांचा एक जरी श्लोक किंवा शब्द श्रवणाला मिळाला, तरी माणसाचे अनेक पाप-दोष नष्ट होतात आणि तो पावन होतो. वेद किंवा शास्त्रे कधीही कोणाला उद्धाराशिवाय ठेवत नाहीत; लोकांचा उद्धार करणे हेच वेदांचे मूळ सामर्थ्य आहे.
समर्थ सांगतात शुकदेवांच्या मुक्तीचे स्वरूप आणि व्यवहारातले ज्ञान (ओवी ३७ ते ४४) लक्षात घ्यावे. लाकडासारखे निपचित पडणे म्हणजे मुक्ती नव्हे. लोक असा समज करून घेतात की, जो माणूस लाकडासारखा अचेतन होऊन, हालचाल न करता पडून राहतो, तोच ब्रह्मज्ञानी किंवा मुक्त असतो. समर्थ हा गैरसमज पूर्णपणे खोडून काढतात. त्यानंतर शुकदेवांचे कर्तृत्व याबाबत ते भाष्य करतात. समर्थ म्हणतात की, शुकदेव मुक्त होते, पण ते काही जडासारखे अचेतन होऊन पडून राहिले नव्हते. त्यांनी राजा परीक्षिताला अत्यंत सविस्तरपणे श्रीमद्भागवत सांगून अध्यात्माचे अफाट निरुपण केले होते. जर ते अचेतन असते, तर त्यांनी एवढा मोठा सारासारविचार जगाला कसा सांगितला असता?
म्हणूनच खरी मुक्ती कोणती? ते इथे समर्थ विषद करतात. चालणे, बोलणे, लोकव्यवहार करणे आणि जिवंतपणी सर्व कार्ये पार पाडत असतानाही ज्याचे अंत:करण सद्गुरूंच्या बोधाने पूर्णपणे तृप्त आणि स्थिर झाले आहे, त्यालाच खरी सायुज्य मुक्ती लाभली असे म्हणावे.
मुक्तीचे विविध प्रकार (ओवी ४५ ते ५५) आहेत. समर्थ येथे मुक्तीचे चार प्रकार स्पष्ट करतात. जीवन्मुक्त होणे, जे आत्मज्ञानी पुरुष जिवंतपणी जगात वावरत असतानाही प्रपंचाच्या आसक्तीपासून मुक्त असतात. विदेहमुक्त होणे म्हणजे ज्यांनी देहाचा त्याग केल्यानंतर जी मुक्ती अनुभवली (किंवा देहबुद्धी पूर्णपणे संपवली). तसेच नित्यमुक्त होणे म्हणजे जे योगेश्वर कायमचे मुक्तच असतात (ज्यांना बद्धतेचा कधी स्पर्शही झालेला नाही.) आणि तटस्थता/स्तब्धता असणे म्हणजे स्वरूपबोधाने येणारी मनाची स्थिरता.
मी मुक्त झालो हाच मोठा अहंकार आहे. समर्थ सर्वात मोठा सिद्धांत मांडतात की, जोपर्यंत मनात मी बद्ध होतो आणि आता मी मुक्त झालो हा अभिमान (मीपण) टिकून आहे, तोपर्यंत तो माणूस खºया अर्थाने मुक्त झालेला नाही. हा मीपणा किंवा मुक्तपणाचा अहंकार म्हणजे पायात जड शिळा बांधून समुद्रात बुडण्यासारखे आहे. समर्थ सांगतात की, आत्मस्वरूपाला बंधन किंवा मुक्ती नाही. आत्मस्वरूप हे स्वयंप्रकाशित, शुद्ध आणि मायातीत आहे. आत्म्याला ना जन्म आहे, ना बंधन आहे, ना मोक्ष आहे. हे सर्व खेळ त्रिगुणांच्या आणि मायेच्या अधीन आहेत.
या समासात पुढे समर्थ माया, मृगजळ आणि स्वप्नाचे दृष्टांत (ओवी ५६ ते ६५) देतात. समर्थ म्हणतात, बद्ध आणि मुक्त हे केवळ कल्पनेचे खेळ आहेत. ज्याप्रमाणे माणसाला स्वप्नात आपण संकटात सापडलो (बद्ध झालो) असे वाटते किंवा आपण संकटातून सुटलो (मुक्त झालो) असे वाटते, पण जागे झाल्यानंतर कळते की, ते स्वप्न पूर्णपणे मिथ्या (खोटे) होते; त्याचप्रमाणे अज्ञानामुळे संसारात बद्ध वाटणारा जीव आत्मज्ञान झाल्यावर स्वत:ला मुक्त मानतो, पण परमतत्त्वाच्या पातळीवर विचार केला तर बद्धता आणि मुक्ती दोन्हीही केवळ कल्पनेचा भ्रम आहेत.
या समासाचा अंतिम निष्कर्ष काय तर जो साधक देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, त्याच्यासाठी बद्ध किंवा मुक्त असा कोणताही भेद उरत नाही. तो कायमचा सर्व संदेहांपासून मुक्त आणि समाधानी होतो. थोडक्यात सांगायचे तर या समासातून समर्थांनी लोकांना अंधश्रद्धा, वेड्यावाकड्या समजुती आणि बाह्य ढोंगांपासून (उदा. लाकडासारखे निपचित पडणे किंवा काही मोजकेच लोक मुक्त होणे यांसारख्या भ्रमांपासून) दूर केले आहे. ‘देहबुद्धी सोडणे, अहंकार गळणे आणि आत्मस्वरूपाची ओळख पटवणे’ हीच खरी मुक्ती आहे, हा अत्यंत मोलाचा संदेश समर्थ या समासातून देतात.
- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment