- स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून होणार्या पंतप्रधानांच्या भाषणाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागलेले असते. भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे दीड तासांच्या भाषणात पाकिस्तानला अत्यंत चोख प्रत्युत्तर देत देशवासियांना दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान म्हणजे काय असते हे त्यांनी दाखवून दिले. म्हणजे गेल्या काही वर्षात पंतप्रधानाने बोलायचे असते हेच नव्या पिढीला माहित नव्हते. त्यामुळे भाषण करणारा, अभ्यासू पंतप्रधान अशी फक्त इतिहासात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची नोंद होती. त्यानंत वाजपेंयींच काळ वगळता पंतप्रधान या देशात बोलू शकतो हे कोणाला लक्षातच नव्हते. मनमोहनसिंग यांनी तर त्या पदाची पूर्ण वाट लावून टाकून आपला दहा वर्षात आवाजही आणि अस्तित्वही गमावल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे पंतप्रधानाने कसे बोलले पाहिजे याचा नवा धडा मोदींना घालून दिला.
- काश्मीर खोर्यातील सद्य परिस्थितीसंदर्भात मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे कारण पुढे करून भारताविरुद्ध सतत गळा काढणार्या पाकिस्तानसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण म्हणजे जोरदार चपराकच आहे. पंतप्रधानांनी यावेळी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे आभार मानले. मी तिथे प्रत्यक्ष गेलेलो नाही. मात्र, त्यांनी माझ्या भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले आहेत, ही देशासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
- स्वातंत्र्यदिन जवळ आला की पाकिस्तान एकीकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर, काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होत आहेत, अशी ओरड सुरू करतो. तर दुसरीकडे भारतीय सीमेवर आणि जमल्यास भारतातही छुप्या दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करत असतो. हे दरवर्षी होत असते. परंतु, आता परिस्थितीत बदल होत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानातच दहशतवादाचे मूळ रूजले असून त्याची विषारी फळे पाकिस्तानला चाखावी लागत आहेत, हे मोदींना दाखवून दिले.
- पाकव्याप्त काश्मीरात मध्यंतरी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात पेटलेला तीव्र असंतोष असो की बलुचिस्तानच्या रहिवाशांनी भारताच्या पंतप्रधानांना केलेली ‘आम्हाला बांगलादेशाप्रमाणे स्वतंत्र करा’ अशी मागणी असो, यामधून पाकिस्तानातील जनता या ‘भारतद्वेषा’च्या एककलमी अजेंडयाला विटू लागली असल्याचे स्पष्ट होते. हे मोदी सरकारचे यश आहे. मोदी यांनी सोमवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील जनतेचे या बदलत्या मानसिकतेबद्दल खास आभार मानून त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबाच दर्शवला.
- संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या व्यासपीठावरून हा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केल्यामुळे त्याची चर्चा साहजिकपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल. त्यामुळे आगामी काळात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर सुरू असलेल्या अन्यायाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानची कोंडी होऊ शकते. शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या धोरणातील यशाच्या दृष्टीने हे पाऊल योग्य दिशेने पडले आहे, असे म्हणायला हरकत नाही. हे मोदींचे फार मोठे कार्य आहे. पाकीस्तानला धडा शिकवणार्या इंदिरा गांधींना तत्कालीन जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी दुर्गा म्हणून संबोधून कौतुक केले होते. आता पाकीस्तानच्या राक्षसी पोटातील विष बाहेर काढणार्या मोदींना नरसिंहा म्हणून कॉंग्रेसने गौरवले पाहिजे. कारण तो दिवस दूर नसेल.
- अर्थात केवळ विरोधासाठी विरोध या वृत्तीतून त्यांच्यावर टिका केली जाईल पण त्याला काही अर्थ नाही. देशांतर्गत परिस्थितीबाबत मोदींनी काही गोष्टींचा उल्लेख आवर्जून केला तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे श्रेयस्कर मानले. देशातील वाढत्या महागाईबाबतही मोदींनी काहीही ठोस न बोलणे पसंत केले. केवळ आम्ही महागाईचा दर सहा टक्क्यांच्या वर जाऊ दिला नाही एवढाच उल्लेख त्यांनी केला. महागाईचा हा दर हा सर्व वस्तूंसाठी मिळून असतो. म्हणजे एकेकाळी चैनीच्या समजल्या जाणार्या आणि आता आवश्यक ठरलेल्या वस्तू तुलनेने स्वस्त झाल्या, मात्र देशातील जनतेसाठी जीवनावश्यक असलेल्या अन्नधान्याच्या किमतीतील वाढ मात्र हे सरकार रोखू शकलेले नाही.
- मोदींच्या भाषणाचा मुख्य रोख व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुराज्याच्या ध्येयावर राहिला. भारताला प्राप्त झालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करणे ही देशातील १२५ कोटी जनतेची जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच भारतापुढे अनेक समस्या असल्या तरी त्या सोडविण्याचे सामर्थ्यही भारतातील जनतेकडे असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या दोन वर्षांतील सरकारच्या कामगिरीमुळे व्यवस्थेत आणि सामान्य माणसाच्या जीवनात कशाप्रकारे बदल झाले आहेत, हे त्यांनी जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. समाज दुभंगला असेल तर तो कधीच टिकू शकत नाही. सामाजिक न्याय हीच सशक्त समाजाची गुरूकिल्ली असून त्याद्वारेच देशाची प्रगती साधता येणे शक्य असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. पण मोदींनी केलेले भाषण हे ऐकण्याइतकेच विचार करण्याजोगे आहे हे नाकारून चालणार नाही.
Thursday, August 18, 2016
ऐकण्याइतकेच विचार करण्याजोगे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment