- सध्या केवळ सातार्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बोगस डॉक्टर संतोष पोळच्या कारनाम्यांची चर्चा आहे. त्याने अनेक गुन्ह्यांची कबूली दिल्याचे पोलिस जाहीर करत आहेत. अनेकांची चौकशीही होत आहे. त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण आज त्याने कबूली दिली आणि प्रत्यक्षात चार्जशीट दाखल होऊन केस कोर्टासमोर येईल तेव्हा काय घडणार? हा खरा प्रश्न आहे. कारण जरी पोलिसांपुढे त्याने कबूल केले असले तरी कोर्ट पुरावे मागणार. पुरावे नाहीत, कोणी प्रत्यक्षदर्शी नाही अशा सबबी सांगून तो पुन्हा मोकाट सुटेल. हे नेहमीचेच होऊन बसले आहे. म्हणून आता कायद्यात नीट तरतूद करून खर्या गुन्हेगारांना शासन होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. वाईतील वकीलांनी त्याचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणीतरी ते घेणारच. त्यामुळे अशाच पळवाटा काढल्या जातील यात शंका नाही.
- म्हणजे मंगल जेधे नावाची एक महिला बेपत्ता होते. तिच्या खुनाच्या तपासातून आणखी एक नव्हे दोन नव्हे तर पाच खून एका बोगस डॉक्टरने केल्याचे उघडकीस येते. हा प्रकार सामान्यांची मती गुंग करणारा तर आहेच पण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात तो घडला आहे याची चीड आणणारा आहे. पण हा बोगस डॉक्टर जसा बिनबोभाट अनेक वर्ष आपली कृष्णकृत्य करीत राहिला तसाच तो सुटण्याकरता प्रयत्न करणार. त्याला ती संधी मिळता कामा नये.
- वाई तालुक्यात हा सारा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आहे. तेथील संतोष पोळ नावाच्या एका बनावट डॉक्टरने हे खून केले आहेत. स्वतःला सामाजिक कार्यकर्ता असल्याचे भासवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांशी त्याने जवळीक साधली होती. त्या जोरावर वाई परिसरातील बर्याच शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना लाचलुचपत प्रकरणांत त्याने गुंतविले होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती. त्या बळावर त्याने तेरा वर्षे हे प्रकरण दडपण्यात यश मिळविले. अशा खतरनाक आणि पाताळयंत्री माणसाला सोडवण्यासाठी फार मोठे प्रयत्न होतील. किंबहुना काही मोठ्या शक्ती जर यात अडकल्या असतील तर त्या त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे एकूणच वैद्यक क्षेत्रातील अनिष्ठ प्रथांचा बोभाटा होणार आहे.
- सौ. मंगल भिकू जेधे ही महिला आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला जाते असे सांगून १५ जूनला वाईजवळच्या वेलंग येथील घरून गेली. त्यानंतर ती बेपत्ताच झाल्याची तक्रार तिचे पती भिकू जेधे यांनी वाई पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्याआधी ही महिला पोळ या बनावट डॉक्टरशी वारंवार संपर्कात होती. त्यावरून पोळनेच अपहरण करून तिला अज्ञात ठिकाणी लपवून ठेवल्याचा गुन्हा जुलैमध्ये दाखल करण्यात आला होता. त्यावरही हा पोळ इतका बदमाश आणि उलटया काळजाचा की त्यानेच, सौ. मंगल जेधे सोने दुप्पट करूनदेते, असे सांगून आपल्याकडून २० तोळे सोने घेऊन गेल्या आणि त्यांनी आपली फसवणूक केली आहे, अशी खोटी तक्रार सातारा पोलिसांकडे दिली.
- पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्याने आणखीही काही क्लुप्त्या लढवल्या होत्या. अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर हल्ला केला, असा बनावदेखील त्याने केला. याबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नंतर त्याची साथीदार ज्योती मांढरेनेही पोळच्याच सांगण्यावरून न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मंगल जेधे प्रकरणी चौकशी होऊ नये, म्हणून या दोघांनी वेगवेगळ्या मार्गांनी स्थानिक पोलीस अधिकार्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ही सगळी पार्श्वभूमी पाहता आज कबूली जबाब देवून पोलिसांच्या खाक्यापासून बचाव करून घेणारा हा माजलेला पोळ नव्हे वळू नंतर दिशाभूल करण्याची शक्यता आहे. अशा दुष्ट लोकांचे वकीलपत्र घेण्यास अनेक समाजसेवक वकील तयार होतात. पुण्यातल्या गाजलेल्या जोशी अभ्यंकर खून प्रकरणात जक्कलचे वकीलपत्र सध्या समाजसेवा आणि आंदोलने, मोर्चे काढणारे बी. जी. कोळसे पाटील यांनी घेतले होते. राम जेठमलानींनीही अशी अनेक वकीलपत्र घेतली आहेत. मान्यवर विचारवंत म्हणवून घेणारे, डाव्या विचारांचे अनेक वकील कसाब, अफझल गुरूपासून ते अगदी अंजना, रेणुका गावितपर्यंतच्या हत्याकांडातील आरोपींचे वकीलपत्र घेतात आणि स्वत:ला मोठे करून घेतात. त्यांच्या नावलौकीकाचा फायदा उठवून हा संतोष पोळ कायद्याची शिंगं कशी उगारेल ते पहावे लागेल. पण आता कायदा मजबूत झाल्याशिवाय अशा नराधमांना शासन घडवता येणार नाही हे नक्की. हा गुन्हा संवेदनशील असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी प्राधान्याने तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. पण वरच्या पातळीवर काय होईल ते आज तरी सांगता येत नाही. वास्तविक गेल्या तेरा वर्षांपासून खून होत राहतात आणि पोलीस खात्याला त्याचा पत्ता लागत नाही ही चिंताजनक बाब आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मागे संघटना होत्या म्हणून त्यांच्या खुनांची चर्चा झाली. पोळने मारलेल्यांपैकी कोणाचीही चर्चा झाली नाही. त्यामुळे कोणताही तपासाचा, शिक्षेचा दबाव नसताना संतोष पोळला धडा कसा शिकवला जाईल?
Wednesday, August 24, 2016
कायद्याची शिंगं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment