रामराज्य यावे, सगळे काही नीट व्हावे अशी अपेक्षा आपल्या देशात नेहमीच केली जाते. पण रामराज्य आले तर आमच्या राजकारण्यांचे, विविध पक्षांची दुकाने उघडलेल्यांचे कसे चालणार? त्यामुळे सगळं काही नीट चालत असेल तर त्यामध्ये खिळ घालण्यासाठी दंगली घडल्या पाहिजेत. देवाच्या धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर अशांतता माजली पाहिजे यासाठी असंतुष्ट आत्मे प्रयत्नशील राहतात. त्यामुळे चांगले काम करु इच्छिणार्या राज्यकर्त्यांनाही राष्ट्र बलवान करण्यात अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत राष्ट्राची अवस्था मृतप्राय झालेली असते. आज शोषणात सामान्य माणूस अडकला आहे. बळी तो कान पिळी अशी अवस्था आहे. हातातील सत्तेचा दुरूपयोग करून, असलेल्या शक्तीचा दुरूपयोग करून दुसर्याला त्रास देणे एवढेच काम काही शक्ती करताना दिसतात. अशाने राष्ट्र जिवंत रहात नाही. मुकाटपणे सहन करणार्या मुडद्यांचे ते राष्ट्र असते.राष्ट्र चिरकाल जिवंत राहण्यासाठी चार प्रकारच्या शक्ती आवश्यक असतात. शिक्षक-शक्ती म्हणजे पूर्वीच्या चतुर्वणातील पहिले ब्राह्मण, रक्षक-शक्ती म्हणजे क्षत्रिय, पोषक-शक्ती म्हणजे वैश्य आणि सेवक-शक्ती म्हणजे शुद्र. यापैकी रक्षक-शक्तीवर बाकीच्या तीनही शक्ती अवलंबून असल्याकारणाने राष्ट्र जिवंत राहायचे असेल तर रक्षक-शक्ती म्हणजे क्षत्रिय कायम ठेवण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी अन्य शक्तींचे रक्षण करायचे असते.याबाबत रामायणात विश्वामित्रांनी म्हटले आहे, ‘धनुर्विद्या आणि ब्रह्मविद्या जाणणारे असे ब्रह्मपुत्र वसिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणाले की भरून पावलो. माझे मनोरथ पूर्ण होतील.’ देवांनी हे वसिष्ठांना सांगितले. त्यांनी ते मान्य करून विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हटले. विश्वामित्रांनी लगेच हात जोडून वसिष्ठांचे आभार मानले. हा आपल्याकडचा पुराणातील दाखला आहे. जातीव्यवस्थेला कुठे थाराच नाही इथे. तरीही आजकाल राजकारणासाठी जातीव्यवस्था हा मोठा आधार असतो. विश्वामित्रांच्या या एकंदर कथेवरून विश्वामित्रांनी ब्रह्मर्षी पदासाठी तप करायला आरंभ केल्यानंतर कोण ब्राह्मणाने त्यांना अडथळा आणल्याचे दिसत नाही. उलट ब्रह्मदेवांनी, तुझ्यात अमक्या गोष्टीची उणीव आहे ती दूर कर आणि जितेंद्रिय हो, असे सांगून उत्तेजन दिल्याचे दिसते. विश्वामित्रांमध्ये अनेक गुण होते पण गर्व, क्रोध आणि अविचार यामुळे त्यांचे चीज झाले नाही. त्यांची महत्वाकांक्षा मात्र अत्यंत दांडगी होती. त्या जोरावर ते अनेक संकटे पार करून ब्रह्मर्षी झाले. रामाला घडवताना विश्वामित्रांचा भूतकाळ सांगून अविचारी असलेल्या काम आणि क्रोधापासून दूर राहणे महत्वाचे असल्याचे शताननांनी सुचवले आहे. पं. श्रीपाद सातवळेकर हे त्यांच्या वाल्मिकी रामायण-बालकांड या पहिल्या खंडात परिशिष्टात सांगतात की, ब्राह्मणांनी कोणत्याही क्षत्रियाला त्याच्या ब्राह्मण होण्याच्या मार्गात कोणत्याही प्रकारे हरकत घेतल्याचे आढळत नाही. किंबहुना त्याला सहाय्यार्थ घेऊन उत्तेजन दिले आहे. विश्वामित्रापुर्वी काही क्षत्रिय अशा रीतीने ब्राह्मणत्व प्राप्त करून ब्रह्मलोकाला गेले आहेत.आता ‘ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण व्हावा व क्षत्रियाचा मुलगा क्षत्रियच व्हावा’, हा आग्रह ब्राह्मणांचा मुळीच नव्हता. हा आग्रह नव्हे, तर ही श्रुतिस्मृतींची आज्ञा आहे. या आज्ञेला अनुसरून परमज्ञानी वैदेह जनक, मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि परम ब्रह्मचारी भीष्म पितामह इत्यादि श्रेष्ठ क्षत्रिय वागत असल्याचे इतिहास प्रसिद्ध आहे. हे सर्व राजे मनात आणले असते तर त्यांनी क्षत्रियाचे ब्राह्मण करून घेण्याची परंपरा चालू करून अखिल जगतातील क्षत्रियांना केव्हाच ब्राह्मण करून टाकले असते. जनक-राम-कृष्णांनी जर का क्षत्रियाचे ब्राह्मण करण्याची प्रथा पाडली असती तर कालांतराने बहुतेक सर्व क्षत्रियजातच नष्ट झाली असती आणि परचक्रापासून आर्यराष्ट्राचे संरक्षण करण्यास कोणीच क्षत्रिय उरला नसता. एका क्षत्रियाला ब्राह्मण करणे म्हणजे राष्ट्राच्या संरक्षक शक्तीला तेवढ्याच अंशाने पक्षाघात करण्यासारखे आहे. याठिकाणी ब्राह्मण म्हणजे शिक्षक अशा अर्थ घेतला पाहिजे. सगळेच शिकवायला लागले तर शिकायला कोण? सगळेच शिकवणारे होतात, आणि आचरणात आणणारे कोणी नसतात तेंव्हा त्यांचा १९७७ चा जनता पक्ष होतो. आजचा आप होतो. राष्ट्राच्या शक्तीला उणेपणा येईल व परकीय शत्रूस त्याचा फायदा घेण्यास अवसर सापडेल, याची जाणीव जनक, राम, कृष्णादिकांना असल्यामुळे अंगी सामर्थ्य असून देखील त्यांनी क्षत्रियांना ब्राह्मण करून घेण्याचा उपक्रम मुळीच केला नाही आणि ब्राह्मण होण्याची अंगी पूर्णपणे पात्रता असूनही आपण स्वत:देखील ब्राह्मण झाले नाहीत. येथे आर्य हा वंशवाचक शब्द नसून गुणवाचक आहे. रामराज्याची कल्पना करताना आपण अगोदर आपल्यातील कर्तव्यपालन केले पाहिजे. शोषणमुक्त समाजरचना तयार केली पाहिजे.
Tuesday, January 9, 2018
शोषणमुक्त समाजरचना तयार केली पाहिजे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment