Monday, December 3, 2018
आयत्या घरात घरोबा..
जिथे शाळा उभ्या राहतात, तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान जन्माला येतात, तर जिथे मंदिर-मशीद उभ्या राहतात तिथे धर्माध लुटारू जन्माला येतात. हे विचार होते साक्षात प्रबोधनकार ठाकरे यांचे; परंतु त्यांचेच नातू उद्धव ठाकरे यांना मात्र कदाचित आपल्या पूर्वजांचे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मान्य नसावेत. म्हणूनच कदाचित त्यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्यावारी केली. गेले होते अशा आवेशात की, सर्वाना वाटत होते आता मंदिर बांधूनच परत येणार बहुधा. पण, प्रत्यक्षात झाले काय तर, तिथे जाऊन पंतप्रधानांना प्रश्न केला की, मंदिर कधी बांधताय ते सांगा. हे ना रामाच्या विचारांचे आहेत, ना महाराजांच्या.. ना आपल्या आजोबांच्या विचारांचे आहेत, हे आहेत फक्त आयत्या घरात घरोबा कुठे करता येतो या विचारांचेच आहेत.मागच्या आठवडय़ातील यासारखा मोठा विनोद दुसरा कोणताही नसेल. दस-याला केलेली घोषणा, जय श्रीरामची दिलेली गर्जना, छत्रपतींच्या बरोबरीने रामाची प्रतिमा असे सगळे वातावरण तयार केले. आता आम्हीच मंदिर बांधणार, असा गाजावाजा केला आणि तिथे गेल्यावर अवसान गळाले की काय, पण कधी बांधताय मंदिर? असा प्रश्न केला आणि परत फिरले. म्हणजे फक्त एवढेच विचारण्यासाठी ही स्टंटबाजी केली होती का? गेले सव्वा महिना तब्बल भारतीय जनता पक्ष कशी जनतेची फसवणूक करते आहे, राम मंदिर फक्त निवडणुका आल्यावर आठवते, असे बरेच काही बोलून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातून काहीही साध्य झाले नाही. रिकाम्या हातांनी परत येण्याची नामुष्की शिवसेना पक्षप्रमुखांवर आली, यासारखा विनोद तो काय?ही जी स्टंटबाजी झाली, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की, तुम्ही एक फोन करून पंतप्रधान मोदींना हा प्रश्न विचारू शकला असता. त्यासाठी एवढी स्टंटबाजी करण्याची काय गरज होती? इतके तावातावाने गेलेले अयोध्येतून परतताना हवा गेल्यासारखे कसे आले? हा प्रकार म्हणजे कजाग बायको आणि तिच्या पुचाट नव-यासारखा झाला. म्हणजे तो नवरा आपल्या कजाग बायकोला जाब विचारायला जातो. तू भांडी घासणार आहेस की नाही? बायको उत्तर देत नाही. पुन्हा आवाज चढवून विचारतो, तू भांडी घासणार आहेस की नाही? बायको अंगावर खेकसते, नाही घासणार. तशी शेपूट घालत तो पुचाट नवरा म्हणतो, मग मीच घासतो. उद्धव ठाकरे यांची फार वेगळी परिस्थिती याहून झाली नाही. त्याठिकाणी विश्व हिंदू परिषद, साधूगण आणि अन्य संघटना अगोदरच कामाला लागलेल्या आहेत, मग हे काय आणखी दुसरे मंदिर बांधायला गेले होते का? मग काहीतरी करायचे म्हणून शरयू नदीची आरती केली. साधूंचा आशीर्वाद घेतला. त्या साधूंना माहितीही नाही, कोण आहेत हे. कारण, सगळेच भगवे कपडे, झेंडे घेतलेले तिथे जमले होते. त्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी हे संधीसाधू आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी यांच्या सभेला जाणेही नाकारले. मग काय ना सभा, ना पायाभरणी. केली डरकाळी वाघाने, मंदिर कधी बांधताय ते सांगा. सगळा महाराष्ट्र या विनोदाने खो-खो हसत होता. आपल्याला महाराष्ट्राबाहेर कुणी ओळखत नाही. असली नौटंकी करणे फक्त भाजपलाच जमते. पण, हे चाललेत शिडी लावून उंटाचा मुका घ्यायला. काय केले त्याठिकाणी शिवनेरीची माती नेली होती त्याचे? अहो, ज्या शिवनेरीची माती घेऊन हे साहेब अयोध्येला गेले होते, त्या शिवनेरीवर एखादी वीट तरी साहेबांनी उभारलीय का? त्या शिवनेरीला कधी शिवजयंतीला तरी गेला आहात काय? आजवर छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण केले आता रामाच्या नावाने सुरू केले. यांचे शिवप्रेम किती बेगडी आहे हेही जनतेने ओळखले असल्याने आता यांना राम आठवला, बाकी काही नाही. पण, रामाच्या नावावर नाटक करताना मात्र शिवसेनेचा फज्जा उडाला हे नक्की.एकीकडे महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा मुद्दा पेटलेला होता. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर झालेला होता. नक्की काय होणार, याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली होती. त्याला महत्त्व न देता हे अयोध्येला गेले. तिथे फज्जा उडाल्यावर मग यांना मराठी माणूस आठवला. मग त्यांना मराठय़ांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे वाटायला लागले.इतकी वर्षे मराठा समाज आणि मराठी माणसाची फसवणूक करणा-या याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचे कधीही समर्थन केलेले नव्हते. पण, आता हे आंदोलन अंतिम टप्प्यात आहे म्हटल्यावर त्याचे काही श्रेय मिळते का, हे पाहण्याची धडपड त्यांनी सुरू केली. या केविलवाण्या धडपडीत आपण आधी काय बोललो होतो आणि आता काय बोलत आहोत, याचा विसर त्यांना पडला, पण जनता विसरलेली नाही.उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष कधीही मराठी आरक्षणाच्या बाजूने नव्हता. आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, असे शिवसेनेचे मत होते आणि मराठा आरक्षणाला कायम विरोधच केला होता. पण, शिवसेनेतील मराठा वर्ग बाजूला होईल या भीतीने ऐनवेळी भूमिका बदलली. आम्ही या आरक्षणासाठी प्रयत्न केले म्हणून डंका पिटायला सुरुवात केली. मोर्चेक-यांना भेटायला काय गेले! फक्त फुकटचे श्रेय लाटायला मिळाले तर लाटायचे या भावनेने ते आले. पण, त्यांची पक्की मते मराठा समाजाला माहिती असल्यामुळे कोणी याला फारशी किंमत दिली नाही. हा दुसरा विनोद उद्धव ठाकरे यांनी केला.महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा, छत्रपती शिवरायांचा वापर फक्त राजकारणासाठी आणि निवडणुकांपुरता करायचा, ही सवय लागलेल्या शिवसेनेला मराठा समाजाने आपली ताकद दाखवून दिली होती. इतके मोर्चे निघाले त्या मोर्चात कधी शिवसेना आली नाही. मराठा क्रांती मोर्चाची टर उडवण्याचा अधमपणा त्यांनी केला. त्यावर अश्लील व्यंगचित्र काढून मराठा समाजाचा अपमान केला. हे जे ५८ मोर्चे शांतपणे निघाले होते, ते आरक्षणाच्या मागणीसाठी होते. त्या मोर्चाची टिंगल करणारे आता श्रेय लाटायला येतात, तेव्हा त्यांना कोणी जवळ करेल का? खोटे बोलायचे ते तरी किती याला मर्यादा असतात. आता उल्लू बनवायचे दिवस संपले आहेत. त्यामुळे आता यांना कसला तरी आधार पाहिजे म्हणून रामाचा आधार घ्यावा लागला आहे.एका विद्वान मित्रांनी फोन करून सांगितले की, पाहा उद्धवजी अयोध्येत जाऊन आले आणि वातावरण किती गरम केले पाहा. वास्तविक तिथे ज्वलंत निखारे अनेक वर्षापासून नाही, तर दशकांपासून आहेत. त्या निखा-यांची राखही झालेली नाही. संघ परिवार, विश्व हिंदू परिषद सतत त्या आगीत तेल ओतते आहे. वातावरण गरमच आहे. हे फक्त आपला पापड भाजायला तिथे गेले. कदाचित तिथले वातावरण पाहूनच हुडहुडी भरली असेल. कारण, आपल्याला करायला काहीही शिल्लक नाही हे लक्षात आले असेल. पण, सच्चे समर्थक ते फोन करणारे म्हणत होते की, साहेबांनी वातावरण गरम केले. याचा नेमका अर्थ काय आहे की, एखादा राजा आपल्या लवाजम्यासह बाहेर पडतो. हत्तीवरून नगर प्रदक्षिणा घालायला तो जातो. त्यावेळी दुतर्फा असलेले लोक त्याला मुजरा करत असतात. पण, हत्तीला वाटते की सगळे लोक मलाच मुजरा करत आहेत. अगदी तोच प्रकार सेना पक्षप्रमुखांबाबत घडला. हे त्यांना समजले नाही. पण, महाराष्ट्राला समजले. त्यामुळे याकडे एक विनोद म्हणूनच सर्वानी पाहिले.आता राम मंदिर कोणाला नको आहे? सर्वानाच हवे आहे. उद्धव साहेबांनी राम मंदिर नक्की उभारावे, पण ज्या शिवरायांचे नाव घेत सत्ता-संपत्ती कमावली, त्या शिवरायांच्या एखाद्या गडकिल्ल्याचे संवर्धन करावे, असे या साहेबांना कधी वाटले का?या राम मंदिराचे आंदोलन आणि आरक्षण यांचे फार जवळचे नाते आहे. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग आणल्यानंतर हे राम मंदिराचे आंदोलन पेटले होते हे लक्षात घेतले पाहिजे. मंडल आयोग लागू होऊ नये म्हणून देशभर धार्मिक दहशतवाद पसरवून एक फार मोठी लाट निर्माण केली गेली. त्यासाठी देशभरातून हजारो कारसेवक तयार झाले. हे कारसेवक कोण होते? आज आरक्षणासाठी लढणारांपैकीच अनेकजण त्यात होते. १९९२ ला ६ डिसेंबरला बाबरीचे पतन झाल्यावर त्यामध्ये अयोध्येत शेकडो-हजारो कारसेवक मारले गेले. त्यापैकी एखाद्याच्या घरी हे साहेब कधी गेलेत का? त्यांचे दु:ख कधी समजून घेतले आहे का?मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी अनेकजण या अयोध्येच्या लढय़ात उतरले. कारण, ओबीसींना त्यांचा हक्क मिळू नये अशा मताचे काही लोक होते. आताही मराठा आरक्षण मिळू नये, असे वाटणारे विघ्नसंतोषी लोक कमी नव्हते. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांपासून या ठाकरे बंधूंपर्यंत दोघेही होते. आर्थिक आरक्षण मिळावे, असे वक्तव्य जाहीर मुलाखतीत शरद पवारांनी केले होते. ते देता येत नाही आणि घटनेत तशी तरतूद नाही हे माहिती असूनही त्यांनी वक्तव्य केले होते. याचे कारण मराठा आंदोलनाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला असताना, मागासवर्गीय आयोगावर कुठेतरी प्रभाव टाकण्यासाठी, न्यायालयावर दबाव टाकण्यासाठी ही खेळी केलेली होती. तेच आता आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी टपले आहेत, याचे आश्चर्य वाटते. म्हणूनच गुरुवारी शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला जल्लोष हा अत्यंत खोटा वाटत होता.विदर्भ-मराठवाडय़ात हजारोंनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. या आत्महत्याग्रस्त शेतक-यांना भेटावे, त्या शेतक-यांच्या मुलांसाठी एखादी शाळा काढावी, असे या साहेबांना कधी वाटले का? पण, गर्दी दिसली की घुसले तिकडे! शेतकरी मोर्चा निघाला की, त्या गर्दीत ही गर्दी आपलीच आहे असे दाखवून घुसले त्या शेतकरी मोर्चात. मार्चमध्ये निघालेल्या मोर्चात शिवसेनेने हीच नौटंकी केली होती. त्यामुळे सगळीकडून विश्वासार्हता गमावून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली हे नक्की.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment