Saturday, November 30, 2019

उद्धव ठाकरेंचा ‘राज’मार्ग



महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांचा हा आता राजमार्ग तयार झालेला आहे. अतिशय संयमी, शांत मनाने काम करण्याची कुवत असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. कलाकार, कल्पक आणि आदर्श महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न घेऊन ही जबाबदारी स्वीकारणारे ते नेते असले, तरी त्यांना या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अखेर राजमार्गच स्वीकारावा लागला. जो मार्ग त्यांचे चुलत भाऊ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाखवला होता, त्याच मार्गावरून उद्धव ठाकरे यांना या पदापर्यंत पोहोचता आले आहे, हे लक्षात घेण्याजोगे आहे.एखादे औषध कितीही रामबाण असले, तरी ते सर्वांनाच लागू होते असे नाही. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच किंबहुना त्यापूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षाला रोखणे हे ध्येय ठेवले होते. मोदी, शहांना राज्यात रोखणे यासाठी काहीही करायला ते तयार झाले होते. त्यासाठी त्यांनी शरद पवारांशी संधान साधले. काँग्रेसशी हातमिळवणी केली. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. त्यावेळी त्यांचा शिवसेनेला विरोध हा केवळ ते भाजपबरोबर आहेत म्हणून होता. शिवसेनेने भाजपची साथ सोडली असती, तर या नव्या आघाडीत शिवसेनेलाही त्यांनी बरोबर घेतले असते कदाचित, पण काँग्रेस, राष्ट्रवादीला बरोबर घेऊनच भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल हा राजमार्ग राज ठाकरे यांनी दाखवून दिला होता. तोच मार्ग आज उद्धव ठाकरे यांनी निवडला आहे. राज ठाकरेंच्या मार्गावरून जाऊन त्यांनी आपले ध्येय साध्य केले आहे. या मार्गावर राज ठाकरेंना यश आले नाही, पण त्याच मार्गावर उद्धव ठाकरे यांना मात्र यश मिळाले, हे विशेषच म्हणावे लागेल.महाराष्ट्रावर मोदी, शहांच्या विचारांचे भाजप सरकार काही गोष्टी लादत आहे. त्याला विरोध करणारे या ठिकाणी कोणी तरी हवे आहे, असे राज ठाकरे वारंवार बोलत होते. त्यांच्यात असलेले चांगले वक्तृत्व मोदी, शहांच्या विरोधासाठी वापरले पाहिजे हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ओळखले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतच त्यांनी राज ठाकरे यांना जवळ केले होते. त्यासाठी विविध सभांमधून व्हिडीओ लावायचे कंत्राट त्यांना मिळाले होते, पण हा इव्हेंट तेव्हा फारसा प्रभावी ठरला नव्हता, म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीला २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे भाकीत केले जात असताना त्यांना कमी जागांवर रोखले. त्याउलट लोकसभेला भाजप २०० जागांवरच थांबेल आणि रालोआ अडीचशे पर्यंत पोहोचेल असे भाकीत होते. तेही मतदारांनी खोटे ठरवत एकट्या भाजपला ३०३ जागांवर निवडून दिले. म्हणजे दोन्ही वेळी पत्रपंडित आणि भाकीतकारांचे अंदाज मतदारांनी खोटे ठरवले होते, पण या जागा कमी करण्यासाठी आपण कारणीभूत ठरू, हे राज ठाकरे यांना वाटत होते. आपण या मार्गानेच भाजपला रोखू शकतो हे त्यांनी ओळखले होते. यासाठी ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले होते. लोकसभेला एकही उमेदवार उभा न करता केवळ मोदी शहांच्या भाजप विरोधात प्रचार करण्यासाठी ते सभा घेत होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येक वेळी भाजपला रोखा. भाजपबरोबर जात आहे म्हणून शिवसेनेला मत देऊ नका. कारण शिवसेनेला मत म्हणजे ते मोदींना मत आहे. त्यासाठी शिवसेनेला मत देऊ नका, असे सांगितले होते, पण आता शिवसेना भाजपबरोबर नाही. त्यामुळे राज ठाकरेंना अभिप्रेत असलेल्या मार्गावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे आलेले आहेत. या राजमार्गाचा लाभ राज ठाकरेंना झाला नसला, तरी उद्धव ठाकरे यांना मात्र नक्कीच झालेला आहे. परस्पर विरोधात राहूनही एका विचारावर दोघे ठाम राहिले आणि एकाला यश, तर एकाला अपयश मिळाले, ही विशेष बाब म्हणावी लागेल, म्हणजे एकच औषध सर्वांना लागू पडणार नाही, पण ते कोणाला तरी लागू पडेल, हेही तितकेच खरे हे यातून दिसून आले.२०१८ ला म्हणजे साधारण लोकसभा निवडणुकीला वर्षभर कालावधी असतानाच पुण्यात शरद पवार यांची प्रकट मुलाखत राज ठाकरे यांनी घेतली होती. या मुलाखतीत रॅपीड फायरमध्ये राज ठाकरे यांनी शरद पवारांना प्रश्न विचारला होता की, राज की, उद्धव? यावर शरद पवारांनी मोठ्या कौशल्याने फक्त ठाकरे असे उत्तर दिले होते. याचाच अर्थ वेळ येईल तसा दोघांचाही वापर करून घेणार. त्याप्रमाणे प्रचारात त्यांनी राजमार्ग निवडला होता. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला त्यांच्या प्रचाराचा फायदा होईल हे पाहिले होते. भारतीय जनता पक्षावर राज ठाकरे टीका करत सुटतील. त्यांच्या टीकेला तोंड देण्यात भाजपचा वेळ जाईल आणि आपल्यावर टीका होणार नाही ही अत्यंत महत्त्वपूर्ण कूटनीती शरद पवारांनी आखली होती. राज यांना जवळ घ्यावं की नाही, या विचारात काँग्रेसने लोकसभेला त्यांना दूर ठेवले. विधानसभेत आघाडीत घेण्यासही काँग्रेसचा विरोध होता, पण शरद पवारांनी पुढाकार घेतल्याने मनसेला आघाडीत घेतले गेले. मनसेसाठी पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीने जागा सोडली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उभ्या असलेल्या मनसे उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीने पाठबळ दिले होते. मनसे हा आघाडीचा एक घटक बनला होता, मात्र तरीही महाविकास आघाडीच्या स्थापनेत मनसेला आमटीत पडलेल्या झुरळाप्रमाणे चिमटीत धरून बाहेर का काढले? असा प्रश्न पडतो. याचे कारण अबू आझमी, राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, प्रहारचे बच्चू कडू अशा विविध छोट्या पक्षांच्या नेत्यांशीही शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती. शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी करायची का? याबाबत सर्वांचे मत घेतले आणि त्यांचा पाठिंबाही मिळवला, पण आघाडीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावणाºया राज ठाकरेंना मात्र शरद पवारांनी लांब का ठेवले? हे अनाकलनीय आहे.म्हणजे भाजपला लांब ठेवण्याचा राजमार्ग राज ठाकरेंनी निवडला, पण त्याचा फायदा मात्र उद्धव ठाकरे यांना झाला, हे नक्की.आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर या राजमार्गाचा महामार्ग होईल आणि राज्यात शिवशाहीचे सरकार अस्तित्वात येईल, या विश्वासासह त्यांना शुभेच्छा!

No comments: