रविवारी 31 मे रोजी आता चौथा लॉकडाउन संपेल. कदाचित पाचव्या लॉकडाउची घोषणा होईल. पंतप्रधान नरेद्र मोदी मन की बातमध्ये आज काय बोलणार याकडेही सगळ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. पण त्याचवेळी आता पाचव्या लॉकडाउनमध्ये किंवा कोरोनानंतरचे जीवनमान कसे असेल हा एक चर्चेचा विषय बनला आहे. आज कोरोनामुळे संपूर्णणे ठप्प झालेले जनजीवन नियम व अटींसह काही प्रमाणात सुरु होत आहे. रिकामे, सुनसान रस्ते आता वाहनांच्या पळत्या चाकांनी सुखावत आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवांशिवाय इतरही उद्योजकांना आणि कार्यालयांना काही प्रमाणात आपले कामकाज सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. जे जिल्हे अतिदक्षता विभागात येत नाहीत त्या ठिकाणच्या प्रवासी वाहतुकीसाठी एसटीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पाचवा लॉकडाउन घोषीत केला तर काय होईल, त्याचे नेमके नियम कसे असतील या चिंतेबरोबरच, किमान जून महिन्यात तरी अनेकांना आपले दैंनदिन आयुष्य पुन्हा सुरु करता येईल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.कोरोनामुळे बहूतांश कार्यालये, शाळा, कॉलेज आणि शिकवणी वर्गांनी ऑनलाईनचे महत्व जाणले. हे प्रॅक्टीकली कसे यशस्वी होणार हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे आर्थिक दरीही वाढण्याची भिती आहे. कारण ऑनलाईन शिक्षण घेण्याइतकी आपली यंत्रणा अजून सक्षम आणि मजबूत झालेली नाही. जो गोरगरीबवर्ग, दारिद्य्ररेषेखालील किंवा अगदी सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबांकडेही अजूनही ऑनलाईनची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळेच ज्यांच्याकडे या सुविधा आहेत त्यांचाच फक्त फायदा होणार का असा प्रश्न आहे. आज, भारतात अगदी महाराष्ट्रात ग्रामीण भागातही ऑनलाईन कामकाज सुरु झाले. ज्यांना ऑनलाईन काम, ‘वर्क फ्रॉम होम’ आदीचे वावडे होते त्यांनाही आता याची चांगलीच सवय होते आहे. राज्य सरकारने जरी झूम अॅपबाबत काही प्रमाणात सांशकता व्यक्त केली असली तरी बहूतांश कार्यालयांनी लॉकडाऊनच्या काळात कर्मचार्यांसोबतच्या मिटींगसाठी झूम अॅप, व्हीडिओ कॉलिंगचा आधार घेतला आहे. थोडी काळजी घेतली तर सुरक्षितपणे ऑनलाईनचे उत्तम पर्याय वापरता येतात. सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांप्रमाणेच आता न्याय व्यवस्थाही ऑनलाईनच सुरु आहे. दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, देशभरातील सर्व उच्च न्यायालये, सत्र, कनिष्ठ व जिल्हा न्यायालयांचे कामकाजही आता ऑनलाईन सुरु करण्यात आले आहे. यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. पण त्याचवेळी न्यायव्यवस्था आणि काही गोष्टी या प्रत्यक्षात व्हाव्यात अशी मागणीही होत आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करणे शक्य नसल्याची मतेही व्यक्त होत आहेत.आज अनेक राज्यांनी लॉकडाऊनची व्याप्ती बर्यापैकी कमी करून जनजीवन सुरळीत करण्याला प्राधान्य दिले आहे. याचा अर्थ कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला आहे किंवा लवकरच तो टळणार आहे, असा निश्चितच नाही. परंतु, सगळे काही बंद करून घरात बसून राहिल्याने फारसे काही साध्य होणार नाही, याची जाणीव आता लोकांना, सरकारला होत असल्याचे दिसते. म्हणूनच पाचवा लॉकडाउन जाहीर केला तरी त्या लॉकडाउननंतरचे जीवन कसे असेल किंवा नाही घोषीत केला तर माणसांनी नेमके कसे जगायचे हा एक विषय फार महत्वाचा आहे.कोरोनाची लागण होणार नाही या दृष्टीने घ्यावयाची ती काळजी घेऊन सामान्य व्यवहार पूर्ववत करण्याकडे लोकांचा आणि सरकारचाही कल दिसत आहे. आज संपूर्ण जग कोरोनामुळे भयग्रस्त झाले आहे. कोरोनाने माणसाला घरात बसण्यास बाध्य केले आहे. अजूनही जर आम्ही स्वत:ला सुधारू शकलो नाही, तर कोरोना व्हायरस आणखी थैमान घालेल ही भीती कायम आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील मृतांचा आकडा तपासला तर या संकटाचे स्वरूप किती भयंकर राहू शकते, याचा विचार आताच केला पाहिजे. मनुष्यजातीने आत्मसंयम बाळगणे फारच महत्त्वाचे झाले आहे. आपल्या महत्त्वाकांक्षेपायी संपूर्ण मनुष्यजातीचे, जगाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. चीनने हे संकट संपूर्ण जगावर लादले आहे हे स्पष्ट असले तरी आता त्याला काही इलाज राहिलेला नाही. या परिस्थितीशी संघर्ष तर करावा लागणारच आहे. त्यामुळेच भविष्यातील जीवन कसे असेल हाच एक विषय सध्या चर्चेचा झालेला आहे. आर्थिक विकासाची एक मर्यादा प्रत्येक देशाने ठरवून टाकली पाहिजे. तरच निश्चिंतपणे पुढली वाटचाल करता येणार आहे. कोरोना संकटापासून धडा घेत आम्ही दिशा निश्चित करून वाटचाल केली, तर मनुष्यजातीला कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही, याची खात्री बाळगली पाहिजे. कदाचित आणखी काही दिवस ‘रेड झोन’पुरताच लॉकडाऊन कायम राहील. त्यानंतर जनजीवन हळुहळू जनजीवन पूर्वपदावर येईल. एकीकडे कोरोनाशी सुरू असलेली लढाई तशीच सुरू राहील आणि दुसरीकडे जगरहाटीदेखील नेहमीप्रमाणे सुरू होईल. परंतु, सगळेच काही पूर्वीसारखे नसेल. या कोरोनाने बरेच धडे आपल्याला दिले आणि जगालाही दिले. हे धडे केवळ आरोग्यासंदर्भात होते किंवा आहेत असे नाही तर जागतिक अर्थशास्त्राचीही नव्याने फेररचना केली जाऊ शकते, इतपत हे धडे व्यापक आहेत.आता आपल्याजवळ जेवढे आहे, त्यापेक्षा अधिक कमवा, अशी मानसिकता तयार करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. यातून अधिकाधिक कमावण्यासाठी अनैतिक स्पर्धा सुरू होते आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकाधिक पैसा कमवायचा, त्यातून स्वत:ची ताकद वाढवायची आणि वाढलेल्या ताकदीतून विस्तार करायचा, हा प्रकार भांडवलवाद जन्माला घालून खतपाणी देणाराच म्हटला पाहिजे. साम्राज्यवाद नव्या प्रकारे प्रस्थापित करताना जैविक अस्त्रे सोडायची आणि नवी जीवनशैली लादून माणसांच्या गरजा बदलायचा हा नवा व्यापार सुरू झाला आहे. पूर्वी घराबाहेर पडताना, कामावर जाताना कधी तोंडावर मास्क सामान्य माणूस घेत नव्हता. पण आता मास्क घालणे ही जीवनावश्यक बाब बनली आहे. त्याची खरेदी उलाढाल वाढवली गेली आहे. त्याच्या उत्पादनापासून सगळ्या प्रक्रियेला आपोआप प्रोत्साहन दिले गेले आहे. हा नवा ट्रेंड व्यापारात किंबहुना आर्थिक युद्धात येताना दिसत आहे. आज चीनने हे एक संहारक अस्त्र सोडले. उद्या अमेरिका असेच काही करून त्यांच्याकडच्या उत्पादनाची मागणी वाढेल असे काही करू शकते. म्हणूनच हे कोरोनानंतरचे जीवन हे फार मोठा संघर्ष करायला लावणारे असेल. यात जगण्याचा संघर्ष करताना निम्मी माणसे खचून जाउन मरतील तर निम्मी रोगाने मरतील. जागतिक वर्चस्वाच्या या लढाईतून, स्पर्धेतून अनेक देशांनी महासंहारक शस्त्रास्त्रे निर्माण केली आहेत. या महासंहारक शस्त्रांचा वापर वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांविरुद्ध झाला, तर संपूर्ण जग उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोना संकटाने जागतिक बाजाराच्या धावत्या चाकाचीच खीळ काढल्याने संपूर्ण जगासमोर आता आर्थिक महामंदीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक बड्या उद्योजकांचे कारखाने बंद आहेत, आधीच उत्पादित मालाचा उठाव होत नाही तोपर्यंत नव्या मालाचे उत्पादन जोखमीचे ठरू शकते, याचा अर्थ हे कारखाने इतक्यात सुरू होणार नाहीत. सरकारी तिजोरीवरही प्रचंड ताण आल्याने बाजारात पैसा ओतण्याच्या सरकारच्या क्षमतेला मर्यादा आल्या आहेत. मागणी-पुरवठा साखळीच विस्कळीत झाली आहे, ती पूर्ववत सुरू होण्यास बराच काळ लागू शकतो, शिवाय केवळ उत्पादन पूर्ण वेगाने सुरू होणे पुरेसे नाही, त्या उत्पादनाला बाजारपेठेत उठावदेखील मिळायला हवा. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार कमी झाले आहेत, होत आहेत आणि पुढेही काही काळ ते होतच राहणार आहेत, त्यामुळे बाजारातील ग्राहकांची संख्या कमी होईल, शिवाय या संकटामुळे पैसा खर्च करण्याबाबतीत लोक हात आखडता घेऊ शकतात. म्हणूनच आज पंतप्रधान काय बोलतील, काय घोषणा करतील आणि लॉकडाउन 5 कसा असेल याची चिंता प्रत्येकाला आहे. दोन अडीच महिने घरात काढल्यानंतर आता पैसे संपल्यावर जगायचे कसे हा फार मोठा प्रश्न आहे. सरकार कुठून, कशी आणि कोणाला मदत करणार आहे हा भयानक प्रश्न आहे. आपण भारताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. जगातल्या अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी आली असतानाही आणि अमेरिकेसारख्या देशाने गतकाळात आर्थिक निर्बंध लादले असतानाही आपली अर्थव्यवस्था तग धरून राहिली होती. भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमुळेच हे शक्य झाले. चीन सध्या औद्योगिक आंतरजाल पद्धती, पुढील पिढीसाठी ती माहिती व तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रासाठी विशेष निर्मिती करून या उदयोन्मुख क्षेत्रावर वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. इतर मातब्बर देश कोरोना साथीमुळे हैराण झालेले असताना संवेदनशील उपकरणांचे उत्पादन, वाहकविरहित वाहने, सायबर सुरक्षा या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करून नवनिर्मितीची प्रेरणा बाळगून आहे. यासाठीची पूर्वतयारी व पायाभरणी झाली असल्यामुळे एका बाजूस कोरोनापासून आपला बचाव करत दुसर्या बाजूने जागतिक अर्थव्यवस्थेवरील आपली पकड भक्कम करण्याची संधी या संकटकाळात आपल्याकडे आहे असा विश्वास चीनला वाटतो आहे. अर्थात हे सारे चीन शकय करू शकणार आहे का याचे उत्तर भविष्यकाळच देईल. परंतु आज अमेरिका, ब्रिटन, रशिया, ब्राझील ही राष्ट्रे पूर्णत: कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. भारतातही त्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. मागच्या आठवड्यहात बाराव्या स्थानावर असलेला भारत आता 9 व्या स्थानावर आला आहे. असे असताना नवा लॉकडाउन कसा असेल आणि आपले भवितव्य काय या चिंतेने सामान्य माणूस ग्रासला आहे. आज संपूर्ण जगाची विशेषत: पाश्चिमात्य अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या वस्तुस्थितीकडे पाहता, ज्या देशाकडे भविष्यकालीन आर्थिक धोरण व ते राबविण्याची क्षमता आहे, जो देश कोरोना साथीवर नियंत्रण ठेवून आपले आर्थिक क्षेत्र कार्यक्षम व गतिमान करण्यात जलदगतीने यशस्वी झाला आहे, तो भविष्यकाळात स्वत:ची अर्थव्यवस्था अधिक बळकट करून जागतिक अर्थव्यवस्थेवरही प्रभाव टाकेल हे निश्चित आहे. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आत्मनिर्धाराची घोषणा केली आहे. पण प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर कसे होता येईल आणि स्वावलंबी बनून देश मजबूत कसा करता येईल, याचा विचार मांडताना मोदींनी काळाची पावले ओळखली आहेत. पण ते फक्त स्वप्न न राहता प्रत्यक्षात कसे येईल याचा विचार केला पाहिजे. गेल्या दोन-चार दशकांपासून वाहत असलेले जागतिकीकरणाचे वारे थंडावत जाऊन प्रत्येक देश आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. अर्थात सगळ्याच देशांच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. परंतु, त्यातून मार्ग काढताना अधिक विश्वासार्ह मित्रांचा शोध घेतला जाईल, परिणामी, जागतिक स्तरावर अनेक नवे गट निर्माण होऊ शकतात. या कोरोना संकटानंतर जागतिक पातळीवर सहकार्याचे नवे पर्व सुरू होऊ शकते. कोरोनानंतरचे जग हे असेच विविध प्रकारे बदललेले दिसणार आहे. त्याच्यासोबत आपल्याला ‘अॅडजस्ट’ करून घेणे आणि पुढे जाणे गरजेचे ठरणार आहे. पण यामध्ये सामान्यांची मोठी परवड होणार आहे याकडे डोळेझाक करून चालणार नाही. विशेषत: मध्यमवर्ग यातून भरडला जाणार आहे. गोरगरीबांना रेशनपासून सगळ्या सोयी सुविधा मोफत आणि अन्य मार्गांनी मिळत आहेत. सरकार त्यांच्यावर पाउस पाडत आहे. श्रीमंतांचा प्रश्नच नाही. पण मध्यमवर्गीयांना मात्र हातात काहीच उरत नाही आणि गरीबासारखे वागताही येत नाही. म्हणूनच आता भविष्यात उद्यापासूनचे जीवन कसे असेल याची चिंता लागलेली आहे.
Sunday, May 31, 2020
सामान्यांची परवड थांबेल का?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment