Sunday, May 31, 2020

आक्रमक भूमिका आवश्यक

भारत आणि चीन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीनने आपल्या कुरघोड्या वाढवल्या आहेत. नेपाळ, पाकीस्तान यांच्या माध्यमातून भारताला छळण्याची संधी चीन सातत्याने साधत आहे. नवनवे सीमावाद निर्माण करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न चीनचा आहे. भारतातील राजकीय विरोधक एकमेकांवर करत असलेल्या कुरघोड्यांचाही फायदा हे शत्रू घेत असतात. काँग्रेसने यापूर्वी कायम पाकीस्तानच्या तोंडात शोभावीत अशी वक्तव्ये करून देशहितात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तोच प्रकार काँग्रेस आता चीनबाबत करून आपल्या देशातील राज्यकत्यार्र्ना सत्तेपासून दूर करण्यासाठी हा चीनी ड्रॅगन भारतात आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारला स्वकीय आणि थेट अशा दोन्ही शत्रूंना तोंड द्यावे लागणार आहे. चीन त्याचाच लाभ उठवताना दिसतो आहे.
    सध्या भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष ताबारेषेवर गेल्या 15 दिवसांत दोन वेळा संघर्ष झाला. यंदा गोष्टी थोड्या पुढे गेल्या. चीनने वादग्रस्त भागात हेलिकॉप्टर्स उडवली. प्रत्युत्तर देताना भारताचे फायटर जेट गेल्यानंतर त्यांचे चॉपर माघारी गेले. भारत आणि चीन यांच्यातील 3488 किलोमीटरची सीमारेषा वादग्रस्त आहे. ही जगातील सर्वात मोठी वादग्रस्त सीमारेषा आहे. पण कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा उठवत चीन भारताशी युद्ध छेडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सावध रहावे लागेल. आता प्रत्यक्ष ताबारेषा कोणती? हे स्पष्ट नसल्याने तणाव निर्माण होतात.  1962 च्या युद्धानंतर दोन्ही देशांत याच मुद्द्यावर नेहमी संघर्ष होत राहिले. काँग्रेसने अनेक दशके सत्ता मिळवून हा प्रश्न सोडवला नाही तर त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी सातत्याने हा प्रश्न चिघळत ठेवला. म्हणूनच ज्याप्रमाणे मोदी सरकारने 370 कलमाला हात घालून काश्मिरचा प्रश्न सोडवला तसा हा चीनचा प्रश्न सोडवावा आणि एकदाचा सोक्षमोक्ष लावावा ही भारतीय जनतेची इच्छा आहे. काँग्रेसला चीनला पोषक वातावरण निर्माण करण्यापासून रोखले पाहिजे आणि चीनचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला पाहिजे. आज संपूर्ण जगात चीनबद्दल नाराजी आहे. अमेरिकाही चीनवर नाराज आहे. त्याचा फायदा उठवत भारताने चीनला धडा शिकवला पाहिजे. भारतातील चीनची  घुसखोरी रोखली पाहिजे. या घुसखोरीला मोदी विरोधकांकडून मिळणारी प्रोत्साहन थांबवले गेले पाहिजे. मोदी शहा जेंव्हा देशाच्या हिताचा निर्णय घेतात तेंव्हा काँग्रेसचे बोलघेवडे नेहमीच शत्रूची बाजू घेतात. राहुल गांधी, सोनिया गांधींपासून, मणिशंकर अय्यर, दिग्विजयसिंग, पी. चिदंबरम अशांना पाकीस्तानचा पुळका येतो आणि देशविरोधी वक्तव्ये हे लोक करतात. आता त्यांनी चीनच्या सूरात सूर मिसळवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच काँग्रेसला रोखण्याचे आणि समजावण्याचे काम करणे हे मोदींपुढचे फार मोठे आव्हान आहे.आज भारत आणि चीन तदोन्ही सैनिकांमध्ये हाणामारी, दगडफेक, यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी होणे असे प्रकार होतात. ताबारेषेच्या जवळ सिंचन कालवा, निरीक्षण चौकी, रस्ते बांधणीस एकमेकांना विरोध, ही संघर्षाची कारणे असतात. संघर्षानंतर तिथले भारतीय व चीनचे कमांडर यांच्यातील आमने-सामने चर्चेनंतर तणाव निवळतो. हे सातत्याने होत आहे. पण या परिस्थितीत आपण भक्त नसलो किंवा भाजपविरोधक असलो तरीही देशहितासाठी सरकारच्या पाठिशी राहणे आपले कर्तव्य आहे हे काँग्रेस आदी पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे.    गेले काही वर्ष  रस्ते बांधणीस चीनला असलेला भारताचा विरोध, या मुद्द्यावरून 2017 मध्ये डोकलामचा तणाव 73 दिवस लांबला होता. दोन्ही राष्ट्र प्रमुखांच्या भेटीनंतर तणाव कमी झाला होता. आता लडाखच्या पूर्वेला तिबेटची सीमा लागून असलेल्या पेंगोंग सरोवराजवळ तणाव निर्माण झाल्यानंतर सैनिकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर चारच दिवसांनी सिक्कीमला खेटून असलेल्या सीमेवरही संघर्ष झाला. चीन शांत नाही बसणार. त्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना विषाणूच्या वैश्विक संसर्गानंतर जगात चीनविरुद्ध विविध देशांची फळी तयार होते आहे. त्यात भारत चीनच्या बरोबर नाही. विरोधात आहे. अशा परिस्थितीत सगळ्या जगातील देश चीनच्या विरोधात असताना काँग्रेसने चीनची बाजू घेण्याचे टाळले पाहिजे. नेहरूंनी हिंदी चिनी भाई भाई म्हणत गळ्यात गळे घातले असले तरी आता त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही.चीनशी लढण्यासाठी सीमेवरच युद्ध करायचे आहे असे नाही तर आर्थिक पातळीवर, व्यापारी पातळीवर हे युद्ध लढायचे आहे. चीनने निर्माण केेलेल्या कोरोना संकटामुळे आज भारतामध्ये येणारे परदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव केंद्र सरकारची थेट मंजुरी असल्याशिवाय त्याला मान्यता देऊ नये, असे आदेश कोरोना प्रारंभानंतर काढले आहेत. या आदेशाचा रोख थेट चीनकडे बोट दाखवतो. याअगोदर चीनने एचडीएफसी बँकेचे शेअर घेतल्यानंतर केंद्राला जाग आली. काही अमेरिकी कंपन्यांचे भाग चीनने खरेदी केले. ते भारतीय कंपन्यांच्या बाबतीत होऊ शकते. ते देशहिताचे नाही. त्यामुळे सर्व पातळीवर आपल्याला सजग राहायचे आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी सरकारच्या पाठीशी राहिले पाहीजे. देशातले विरोध सीमेवर जाताना सोडायचे असतात हे भान काँग्रेसला ठेवावे लागेल. सध्या भारत आणि सगळे जग कोरोनाविरोधाच्या लढाईत गुंतले असताना चीन मात्र औद्योगिक उत्पादन व व्यापार वाढीत गर्क आहे. याअगोदरच्या दोन जागतिक महायुद्धांत जेवढे आर्थिक नुकसान झाले त्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक नुकसान चीनने लादलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत झाले, असा समज चीनविरोधी देशांचा आहे. चीन भारताविरुद्ध ‘हायब्रीड वॉर लढतो आहे. त्यात तो सीमेवर सैनिकांचा वापर करतो. माओवाद्यांना, नक्षलवाद्यांना मदत करत देशात अशांतता निर्माण करतो. ईशान्य भारतातही बंडखोर गटाला मदत करतो. शिवाय चीनचे भारताच्या विरोधात राजनैतिक युद्ध चालूच असते. युनोमध्ये भारताला विरोध, पाकिस्तानचे समर्थन हे नेहमीचे उद्योग आहेत. शिवाय व्यापारयुद्ध सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर चीनची वागणूक सुधारणार नाही. भारताला सर्वच स्तरांवर अधिक सावध व कोणत्याही प्रकारच्या लढाईत कणखर उत्तर देण्याच्या तयारीत सतत राहावे लागेल. म्हणूनच अंतर्गत मतभेद विसरून आता चीनबाबत सतर्क रहावे लागेल. कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना 370 कलमाबाबत जशी आक्रमक भूमिका या सरकारने मागच्या वर्षी घेतली होती तशी भूमिका घेणे गरजेचे आहे.

No comments: