कोरोनामुळे जवळपास दोन महिने अनेकांना सक्तीची सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे आता ही झीज भरून काढण्यासाठी आणि वाया गेलेले कामाचे तास भरून काढण्यासाठी आगामी काळात सुट्टीचे नियोजन करावे लागेल. अनावश्यक सुट्ट्या बंद कराव्या लागतील. तसेच काही सुट्टया या वैकल्पिक करणे आवश्यक आहे.खरं तर आपल्याकडे सुट्टी घेणे हा फार आनंदाचा भाग असतो. कामापेक्षा सुट्टी जास्त घेणारांचीही संख्या जास्त असते. कर्तव्यापेक्षा हक्काची जाणिव असते. त्यात सणवारांमुळे बँका शासकीय कार्यालयांनाही अनेक सलग सुट्या येतात. एप्रिल, डिसेंबर, मे, सप्टेंबर महिन्यात जोडून सुट्या खूप असतात. त्यामुळे आता सुट्टी कमी करणे आणि रद्द करणे आवश्यक आहे. बँकांचा आणि शासकीय कार्यालयातील सेकंड फोर यामुळे सलग तीन चार दिवस सुट्टी जोडून येण्याचे प्रकार आपल्याला सातत्याने बघायला मिळतात. त्यामुळे आपल्याकडे किती कामाचे तास वाया जातात आणि किती आर्थिक उलाढाली ठप्प होतात याचे कोणी गणितच करताना दिसत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यात कोरोनामुळे गेलेले दोन महिने भरून काढण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयावर आहे. त्यामुळे आगामी काळात किंवा लॉकडाउन उठेल तेंव्हा सुट्टीचे नियोजन करणे फार महत्वाचे असणार आहे. पंतप्रधानांनी तसे जनतेला आवाहन केले पाहिजे. त्यांच्या आवाहनानुसार जर दोन महिने घरी बसला आहात तर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देउन जास्त वेळ काम करण्याची, काही सुट्टीला तिलांजली देण्याची गरज आहे.तसे पाहता आपल्याकडचे बँकींग धोरण, व्यवस्था आणि यंत्रणा ही सातत्याने चर्चेत राहिली आहे. बँकांचे घोटाळे आणि बहुराष्ट्रीय बँकांची असणारी स्पर्धा या तुलनेत भारतीय बँकांना असणार्या सुट्ट्या या जास्त आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचे नियोजन केले जावे आणि त्या वैकल्पिक असल्या पाहिजेत. त्यासाठी तसे कायदे करून बँका 365 दिवस सुरू कशा राहतील हे बघितलेल पाहिजे. आपल्याकडे नेट बँकींग, ऑनलाईन बॅकींग, एटीएम या यंत्रणा कार्यरत होऊन बारा वर्ष झाली पण अजूनही त्यात आपण शंभर टक्के यशस्वी झालेलो नाही. याचे कारण सक्षम यंत्रणा नाही. आवश्यकते इतकी तरतूद नाही. बँकेत पैसा सुरक्षित आहे याचा विश्वास जोपर्यंत ग्राहकांना मिळत नाही आणि केव्हाही पैसे काढता येतील अशी यंत्रणा जोपर्यंत तयार होत नाही तोर्पर्यंत ऑनलाईन, नेटबँकींग आणि एटीएमवर आम्हाला अवलंबून राहता येणार नाही. तोपर्यंत बँकांना इतक्या सलग सुट्टी घेता येणार नाहीत. म्हणून त्याबाबत कायदा होण्याची गरज आहे. लॉकडाउनच्या काळात बँका जरी सुरळीत सुरू असल्या तरी बंद असलेले कारखाने, उद्योग उभे राहण्यासाठी बँकांना जास्त काळ सुविधा देण्याची आगामी काळात गरज भासणार आहे. त्यामुळे बँका आणि शासकीय कार्यालयातील सुट्टीचे नियोजन केले गेले पाहिजे. आर्थिक कोंडी आणि अर्थव्यवस्था ठप्प करण्याचे बँकांनी थांबवले पाहिजे आणि जास्तीत जास्त काळ बँका, सरकारी कार्यालयी कशाप्रकारे सुरु होतील हे पाहिले पाहिजे.सुट्टी हे बँकांच्या अंदाधुंद कारभाराचे कारण असू शकते. खरे म्हणजे असे सांगितले जात होते की बँकांची सुट्टी ही निगॉशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट नुसार ठरवली जाते. या कायद्यानुसार सलग तीन दिवसांपेक्षा जास्त बँका बंद राहू शकत नाहीत. असे असताना सलग चार दिवस या सुट्टया कशा दिल्या जातात? सुट्टीचा हा कायदा कधी, कोणी, केंव्हा बदलला हे कोणीही सांगू शकत नाही. सुट्टी सलग आली की आपल्याकडे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी आणि बँकांमधील एटीएमचा खडखडाट झाल्याने आर्थिक कोंडी हे प्रकार सातत्याने होताना दिसत आहेत. आजच्या गतीमान युगात इतकी सुट्टी कशी परवडेल या अर्थव्यवस्थेला याचा कोणीच विचार करत नाही. वाढती लोकसंख्या, वाढती गर्दी, वाढते व्यवहार या तुलनेत बँकांचे असणारे कमी कामाचे तास हे विकासास मारक आहेत. कारण अजूनही आपण ऑनलाईन व्यवहाराला सक्षम आणि साक्षर झालेलो नाही. कर्मचार्यांचा विचार करायचा असेल तर त्यांना वैकल्पिक सुट्टी देण्याचा पर्याय आहे. त्याचा विचार केला तरच देश पुढे जाईल. बहुराष्ट्रीय बँका आपले जाळे भ् ाारतातल्या कानाकोपर्यात पसरवत असताना आणि त्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकांची संख्या कमी करण्याचे धोरण आखण्याचे सरकार ठरवत आहे. पण बँकांचे विलीनीकरण, संख्या कमी करुन परराष्टीय बँकांना आपण तोंड देऊ शकणार नाही तर जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन आपण ग्राहकांना आकर्षित करू शकतो याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी सर्वात प्रथम आम्हाला सुट्टीचे नियोजन करावे लागेल. कोणत्याही कर्मचार्याला सध्या 52 रविवार, 26 शनिवार आणि अन्य 15 अशा 85 सुट्टी मिळतात. तर त्याच्या हक्काच्या रजा मिळून तो वर्षातील 100 ते 120 दिवस कामावर असत नाही. म्हणजे चार महिने काम न करता त्याला वेळेवर पगार मिळतो, महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी खात्यात जमा होतो. त्याचवेळी बारा बारा तास काम करणार्या असंघटीत कामगारांना विनावेतन सुट्टी घ्यावी लागते, पगार वेळेत होत नाही, त्यात अशा सुट्ट्यांचे निमित्त मिळाले तर त्यांचे वेतन आणखी रखडते. ही विषमता कधी दूर होणार? त्यांना सुट्टी द्यायची तर द्या पण सगळयांना एकदम सुट्टी कशासाठी. ती वैकल्पिक ठेवा. पर्यायी ठेवा. बँकींग यंत्रणा बंद न पाडता देता आली तर पहा. ईद, पतेती, ख्रिसमस, गणपती, बुद्ध पौर्णिमा, महावीर जयंती या सुट्टी त्या त्या समाजाच्या लोकांना देऊन बाकीच्यांनी कामावर येण्यास काय हरकत आहे? ज्या कार्यालयात एकही मुस्लिम कर्मचारी नाही त्या कार्यालयातील कर्मचार्यांना ईदची सुट्टी कशाला. बकरी इद, रमजान इद, मोहरम या सुट्टी फक्त मुस्लिम कर्मचार्यांना द्याव्यात आणि बाकीच्यांनी कामावर यायला काय हरकत आहे. जैन कर्मचार्यांसाठी महावीर जयंतीची सुटी देऊन बाकीच्यांनी कामावर येण्यास काय हरकत आहे? पार्शी न्यू इयर किंवा पतेतीची सुट्टी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात येते. बर्याचवेळा 15 ऑगस्ट, शनिवार रविवारला जोडून येते. ही सुट्टी सर्वाना कशासाठी दिली जाते? मुळात पार्शी लोकच इतके कमी झालेले आहेत की त्यांचे कर्मचारी औषधालाही सापडत नाहीत. त्यामुळे असतीलच कुठे तर त्यांना ती सुट्टी द्या बाकीच्यांनी कामावर येऊन यंत्रणा सुरु ठेवण्यास काय हरकत आहे? एस टी, रेल्वे कर्मचारी, सैन्यदल, पोलीस दल यांना असते का कधी सुट्टी? त्यांना ना दिवाळी ना गणपती, ना इद, ना नाताळ. बारा महिने यंत्रणा सुरु ठेवावी लागतेच ना. त्यांना पाहिजे तेंव्हा ते आपल्या सुट्टीचे नियोजन करून घेतात. तसे बँक कर्मचार्यांबाबत का केले जात नाही. 24 तास सेवा देण्याचे दिवस असताना बँका कधी सक्षम होणार आहेत? एटीएम म्हणजे अॅटोमेटीक टेलर मशिन असे सांगीतले जाते पण हे अॅटोमेटीक टेलर काउंटर कायम सलग सुट्टीचे काळात रोकड अभावी बंद पडते. मग त्याच्या अॅटोमेटीकला अर्थ काय राहिला? इंटरनेट आणि अन्य बँकींग यंत्रणाही कोलमडून पडताना दिसतात. कार्ड स्वाईप यंत्रणाही बंद पडताना दिसते. अशा परिस्थितीत सलग सुट्टी ही अर्थव्यवस्थेला घातक असल्याने ती वैकल्पिक केली जावी.कोरोनाच्या काळात संकटातून सावरण्यासाठी सर्व व्यवसाय उद्योगधंद्यांना, शेतीला बँकींगचा फार मोठा आधार लागणार आहे. अशा काळात बँकांनी जादा काम करून देश घडवण्याचे काम केले पाहिजे. त्यासाठी सुट्टी वैकल्पिक करून त्याचे नियोजन करावे.
Saturday, May 16, 2020
सुट्टीचे नियोजन करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment