Wednesday, April 21, 2021

मॅनेज कसे करणार?


देशाच्या सुरू असलेल्या लढाईच्या दृष्टीने केंद्र सरकारने सोमवारी एक मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. १ मेपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांनी ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असेदेखील सांगण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत, पण हे जरी सगळे खरे असले तरी हे मॅनेज कसे करणार आहे हा प्रश्न आहे. यामुळे अजून काही गोंधळ आणि राजकारण निर्माण होणार नाही ना, याची भीती अधिक आहे.


यापूर्वी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचं नियोजित करण्यात आलं होतं, मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे, तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत. असे असताना पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबतदेखील बैठक झाली आहे. भारतात सध्या को-व्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक व्हिलासुद्धा आपत्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहिमेला येत्या दिवसांत वेग येणार असल्याचे दिसत आहे. तरीही लसीकरण केंद्रावरची गर्दी कशी कमी होणार, हा प्रश्न आहेच. त्याची व्यवस्था योग्य होणे गरजेचे आहे. आज राज्यात लसींचा तुटवडा आहे. त्यावरून केंद्र आणि राज्य यांच्यात हमरीतुमरी आहे. आम्हाला साठा कमी मिळतो म्हणून राज्य सरकार ओरडते आहे, तर साठा मुबलक आहे, असा दावा केंद्र करते आहे. ४५ वर्षांपुढील लस देण्यास सुरुवात झाल्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. मग आता १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली, तर तेवढा लसीचा साठा कुठे आहे?

आजही लसीकरण केंद्रावर इतकी गर्दी आहे की, दिवस दिवस थांबावे लागते. अगोदर टोकन घेण्यासाठी रांग. त्या रांगेत चार-पाच तास उभे राहिल्यावर टोकन मिळाले तर लस घ्यायची. दोन-तीन दिवस रांगेत थांबल्यावर एखाददिवशी गर्दी नाही म्हणून लसीकरण केंद्रावर जावे, तर टोकन देणे बंद झाले आहे, लस उपलब्ध नाही, असे सांगितले जाते. ४५ वर्षांपुढचे ज्येष्ठ आणि प्रौढ नागरिक अनेकवेळा हेलपाट्यांनी घाईला आलेले आहे. त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. असे असताना तरुणांनी जर गर्दी केली तर केवढा गोंधळ उडेल? त्यामुळे एक मेपासून प्रचंड प्रमाणात साठा येणार आहे का? लस देण्याची नवी यंत्रणा उभी केली जाणार आहे का? काही प्रमाणात लसीकरणाची केंद्रं वाढवली जाणार आहेत का? त्याची काय व्यवस्था केली आहे, त्याची मॅनेजमेंट कशी असणार आहे, हे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर तरुणांची गर्दी होईल. लस शिल्लक नाही म्हटल्यावर हीच तरुणाई सरकारच्या नावाने शंख करेल, गोंधळ घालेल त्याचे काय? त्यामुळे अगोदर येत्या दहा दिवसांत जास्तीत जास्त साठा करून ठेवला पाहिजे. जास्तीत जास्त प्रौढांना लसीकरण केंद्रावरून रिकाम्य हाताने परत जावे लागणार नाही हे पाहिले पाहिजे. मगच पुढच्या गटाला संधी मिळाली पाहिजे. घोषणा करणे सोपे आहे, पण मॅनेज करणे अवघड आहे. त्याची तयारी सरकारने केली पाहिजे. नुसती लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन उपयोग नाही. त्यासाठी योग्य प्रमाणात उत्पादन होणे आवश्यक आहे. अगोदरच अमेरिकेकडून कच्चा माल पुरेशा प्रमाणात येत नाही, म्हणून सिरमची तक्रार आहे. त्यामुळे लसीच्या उत्पादनात अडथळे येत आहेत. त्याची व्यवस्था अगोदर झाली पाहिजे.


भयावह वेगाने फैलावणाºया कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्वसन यंत्रे, प्राणवायू आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला होता. त्याचबरोबर खासगी आणि सरकारी औषधनिर्मिती क्षेत्रांनी पूर्ण क्षमतेने लस उत्पादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते, पण त्यासाठी लागणाºया सुविधांची, कच्च्या मालाची सोय होणे आवश्यक आहे. हे मॅनेज केले तर सर्व काही शक्य आहे.

नुकतेच कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेले आहे. त्यात त्यांनी कोरोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. या सूचनांचा सरकार विचार करेल हे नक्की, पण लसीकरण सुलभपणे आणि गर्दी टाळून कसे होईल हे पाहणे गरजेचे आहे. नवी मुंबईतील एका महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयात दररोज इतकी प्रचंड गर्दी असते की, टोकनला लांबच लांब रांग असते. प्रत्येक खिडकीवर रांग असते. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला असतो. यात एक जरी बाधित असेल तर ती संपूर्ण रांग बाधित होण्याची भीती आहे, पण कसलीही काळजी महापालिकेकडून घेतली जात नाही. त्यामुळे लसीला गर्दी झाली, पुरेसा पुरवठा नसेल तर त्यातून फार मोठे संकट उभे राहील. यासाठी हे सगळे मॅनेज कसे करणार हे राज्य सरकारने, आरोग्य यंत्रणेने पाहिले पाहिजे. देशात गेल्या ९२ दिवसांत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. वेगाने लसीकरण करणाºया देशात भारत समाविष्ट आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेत ९७ दिवसांत हा टप्पा गाठला गेला होता, तर चीनमध्ये १०८ दिवसांत तो गाठला गेला. त्यामुळे ही अभिमानाची बाब असली तरी लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे आणि चोवीस तास लस देणे ही सोय करणे गरजेचे आहे. सध्या बहुतेक ठिकाणी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण केले जाते. यात बहुतांश वेळ हा रांगेत टोकन घेण्यासाठी जातो. आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी आणि शेड्युल्ड होत नाही. ते अ‍ॅप पूर्णपणे फसले आहे. त्यामुळे नागरिकांना रांगेत राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत वेळ वाढवणे, लसींचा साठा वाढवणे हे फार महत्त्वाचे आहे. तरच १८ वर्षांपुढील सर्वांना लसीकरण करता येईल.

21/4/2021

No comments: