Sunday, April 18, 2021

चरित्रपटांची लाट


गेल्या पाच-सहा वर्षांत फिल्म इंडस्ट्रीमध्ये चरित्रपटांची लाट आल्याचे दिसून येते. यातील काही चरित्रपट किंवा बायोग्राफी या प्रत्यक्षात हयात असलेल्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्यांच्या आहेत, तर काही हयात नसलेल्या व्यक्तींच्या चरित्रपटांची निर्मिती झाली, पण लोकांना आवडणाºया व्यक्तिमत्त्वांची दुसरी बाजू मांडण्याचे काम गेल्या पाच-सहा वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेले आहे.


२०११ चा विश्वचषक किक्रेट कप जिंकला आणि अगोदरच सर्वांचा लाडका असलेल्या महेंद्रसिंह धोनीवरचा चित्रपट आला. त्याची ती अनटोल्ड स्टोरी प्रेक्षकांना आवडली. त्या पाठोपाठ क्रिकेट जगतातील क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाºया सचिन तेंडुलकरवर चित्रपट आला. मोहम्मद अझरुद्दीनवर आला. ही एक क्रिकेट जगतातील लाट तयार झाली. काही फाइल शॉट, खºया सामन्यांची चित्रं, तर काही अभिनेत्यांना घेऊन केलेले चित्रीकरण असे मिक्सिंग करून हे चित्रपट काढले गेले. यातील ‘महेंद्रसिंह धोनी- अनटोल्ड स्टोरी’ला चांगला प्रतिसाद मिळाला. सुशांतसिंह राजपूतने यात धोनीची भूमिका केली होती. धोनीच्या आयुष्यातील संघर्षमय प्रसंग यात चांगले टिपले होते.

राजकीय चरित्रपटांमध्ये गेल्या तीन वर्षांत आलेले दोन महत्त्वाचे चित्रपट म्हणजे ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ आणि ‘ठाकरे’ हा चित्रपट. ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ हा मनमोहन सिंग यांच्या जीवनावरचा चित्रपट होता. सोनिया गांधींच्या कृपेने अपघाताने पंतप्रधान झालेल्या मनमोहन सिंग यांच्यावरचा हा वास्तववादी चित्रपट काँग्रेसचा बुरखा फाडणारा असा वादग्रस्त चित्रपट होता. यात मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर यांनी केली होती. हा चित्रपट याच नावाच्या संजय बारू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केले होते. यात अक्षय खन्ना याने संजय बारू यांची भूमिका केली होती. ती एक लक्षवेधी अशी भूमिका होती. काँग्रेस अंतर्गत राजकारणावर चांगल्या प्रकारे प्रकाश या चरित्रपटात टाकण्यात आला होता.


दुसरा राजकीय चरित्रपट म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती. ठाकरे हा भारतातील राजकीय पक्ष शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत एकाच वेळी तयार होणारा बॉलिवूडचा एक चरित्रपट होता. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित झाला. अभिजीत पानसे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा संजय राऊत यांची आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी याने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केली आहे व अमृता राव हिने त्यांची पत्नी मातोश्री मीनाताई ठाकरे यांची भूमिका केलेली आहे. शिवसेनेची स्थापना ते शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री इथपर्यंत या चित्रपटाची वाटचाल यात दाखवली गेली. शिवसेनेची ताकद, मराठी माणसांचे प्रेम यावर चांगला प्रकाश या चरित्रपटातून उलगडलेला दिसला. हा चित्रपटही चांगला चालला.

२०१९ मध्ये सर्वाधिक चरित्रपट आलेले दिसले. यात ‘...आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला होता. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार मानले गेलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. एक दंतवैद्य ते मराठी नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नट असा डॉ. घाणेकर यांचा प्रवास या चित्रपटात दाखविला गेला आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी श्रीमती कांचन घाणेकर यांनी लिहिलेल्या ‘नाथ हा माझा’ या पुस्तकाचा आधार प्रामुख्याने या चित्रपटासाठी संदर्भ म्हणून घेतला आहे. अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. यामुळे काशिनाथ घाणेकर हा रंगभूमीवरचा इतिहास आणि शोकांतिका पुन्हा समोर आली. एकदम कडक हा शब्द पुन्हा प्रचारात आणण्याचे काम या चित्रपटाने केले.


याच वर्षात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्यावर ‘भाई’ हा चित्रपट दोन भागांत आला आणि प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटातून अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वंसमोर आली. पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यातील घटना समोर आल्या. त्यांचे निरागस आणि खरे व्यक्तिमत्त्व समोर आले. त्यांचे भाषेवरचे प्रेम, त्यांचे संगीतावरचे प्रेम हे चांगल्या प्रकारे अधोरेखित करतानाच यातील जास्तीत जास्त सच्चेपणा दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटांनी केला होता.

याशिवाय अनेक चरित्रपट गेल्या पाच-सहा वर्षांत मराठीत बनले. यामध्ये ‘लोकमान्य’ हा लोकमान्य टिळकांवरचा चित्रपट आला होता, तर बालगंधर्व हा बालगंधर्वांच्या जीवनावरचा चित्रपट आला. या दोन्ही भूमिका सुबोध भावेनेच केल्या होत्या, पण चरित्र वाचताना जेवढा वाचकांना आनंद मिळतो तसाच आनंद चरित्रपटातून देण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत होताना दिसत आहे हे नक्की. याशिवायही अनेक चित्रपट याअगोदर आले आहेत. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘अण्णा हजारे’ अशा अनेक चरित्रपटांची निर्मिती झाली. प्रेक्षकांनी त्याला योग्य तो प्रतिसादही दिला.


No comments: