Sunday, April 18, 2021

मान्याच्या वाडीत लशीकरण


कोरोनावर लसीकरण होणार म्हणून ग्रामीण भागातही आनंद झाला होता. मान्याच्या वाडीचा उत्साह नेहमीप्रमाणेच ओसंडून वाहत होता. गेल्या वर्षभरात मान्याची वाडी हे गाव अगदी आॅनलाईन झालं होतं. गावातल्या प्रत्येक पोरट्याच्या हातात स्मार्टफोन होता. त्यामध्ये पेटीएम, गुगलपेपासून सगळी अ‍ॅप होतीच; पण हे डिव्हाईस आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहे याचा विसर पडून अनेक पोरट्यांनी डेटिंग अ‍ॅपही डाऊनलोड केलेली होती. त्यामुळे त्यांना नवनवे ज्ञानही मिळत होते. याशिवाय टिकटॉक आणि कसल्या गमतीशीर व्हिडीओ करणाºयांची अनेक अ‍ॅप होती. त्यामुळे गावात प्रत्येकाला कोणतीही गोष्ट शूट करायची आणि पोस्ट करायचा हा नादच लागला होता.

अगदी सखूबाई भांडी घासत असली, तरी ती नटून थटून भांडी घासायची आणि मागे कुठले तरी विसंगत झिंगाट गाणे टाकून तिचा व्हिडीओ बनवायचा आणि ख्याख्याख्याख्या हसत तो टिकटॉकवर टाकायचा. असले प्रकार मान्याच्या वाडीत जोरात होत होते. लॉकडाऊनच्या काळात हे पेव फुटले होते. मुंबईत राहणारी माणसं नोकºया गेल्यामुळे, गावी आल्यामुळे ही खूळ डोक्यात घुसवून गेली; पण घराघरात मान्याच्या वाडीत टिकटॉक नाही, तर कुठल्यातरी अ‍ॅपवर व्हिडीओ तयार करून पोस्ट करून ते व्हायरल करायचे वेडच लागले होते. त्यामुळे आता लसीकरणाची तयारी सुरू झाल्यावर कुठे काय मिळते आणि काय पोस्ट करता येईल यासाठी मान्याच्या वाडीतील कलाकारांची सृजनशीलता वेग घेत होती.


छबुरावचा पोरगा बंटी यानं एक मोठा बॅनर गावाच्या कमानीपाशी लावला. यात गो कोरोना गो, लसी तुझे स्वागत असो, असा बॅनर लावला होता. त्यावर बंटीचा फोटो आणि त्याच्या उंचीचा एक मोठा ग्लास होता. आता हा ग्लास कशासाठी होता हे अनाकलनीय होते; पण त्याने असा बॅनर लावल्यामुळे तो भावी गावचा सरपंचपदाचा उमेदवार असणार, अशी चर्चा सुरू झाली. त्याला विरोध करण्यासाठी रामरावाच्या सनीने त्यापेक्षा मोठा बॅनर त्याच्या समोर लावला. त्यात गो बॅक कोरोना, आम्ही लसीकरण करणार आणि कोरानाला पळवणार, असा फोटो टाकला होता. त्यात त्याच्या उंचीचा एक मोठा रांजण त्याने उभा केला होता.

मग काय गावात एकच उत. आता गावात लसीकरण होणार आणि गाव कोरोनामुक्त होणार या चर्चेला उत आला. पाटलाच्या व्हरांड्यात हौसाबाई, आवडाबाई, पारूबाई या बायकांमध्ये चर्चा सुरू लावली. मिशेरीची देवाण-घेवाण झाल्यावर बायकांमध्ये बोलण्याला उत आला. ‘काय बाई म्हणायचं याला? आक्षी डोंगर पोकरून उंदीर काडला म्हणायचा. शेवटी त्या कोरोनाला घालवायला लसीकरणाचाच उपाय हाय. ह्ये आदी नवतं का समजत?’ पारूबाई म्हणाली तशी हौसाबाई म्हणाली, ‘न्हाय तं काय? गळी सरी न गावभर फेरी... या निसत्या लसीनं मानसं बरी व्हत्यात हे सांगाय काय झालं व्हतं सरकारला?’


तिकडं पारावरही तशाच चर्चा. आबुराव बाबुराव छबुराव, बबन्या यांच्यातही आता लसीकरण हुनार म्हनून आनंद होता. शेरातून सरकारी माणसं स्टॉक घेऊन येणार. जंबो लसीकरण होणार आणि गाव कोरोनामुक्त कसा होणार यासाठी चर्चा चालल्या होत्या.

रामराव म्हनाले, ‘म्या काय म्हणतो सरपंच, लसीकरण दोन दिवसांवर यीऊन ठेपलंय. आपल्या गावाचा पयला नंबर दिसला पाहिजे. त्यासाठी आपण एक जंबो मंडप घालू. मंडपात गावातली शेपाचशे मानसं येकदम जमून येका दमात समद्यांनी लस्सी घ्यायची. त्याचा फोटु पेपरात छापायचा आन आम्ही कोरोनामुक्त झालो, अशा बातम्या आणायच्या. आपल्या गावाचा आदर्श समद्यांनी घेतला पायजे.’


ही आयडियाची कल्पना सगळ्यांना आवडली आणि गावात एकच मोठा मंडप उभा केला. त्यात आत मस्तपैकी कापडाच्या कनातीचं बोळ, झुंबरं तयार केली गेली. लायनीत टेबल मांडली गेली. अगदी लग्नाच्या पंगती बसतात तशा. मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी कमान उभी केली. त्यासाठी केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या लावून सुशोभीत केले गेले. आत मोठा उभा फॅन आणि अत्तराचा फवारा मारणारा स्प्रे उभा केला. आत जाणारा प्रत्येक जण गार हवा आणि अत्तराचा फवारा घेऊन आत जाईल याची व्यवस्था केली.

बघता-बघता गावाची तयारी झाली. सकाळी १० वाजता लसीकरण सुरू होणार होते. सकाळी ८ वाजल्यापासूनच घरातून गावकरी नवे कपडे घालून, आंघोळीपांघोळी करून लग्नाला जावे या आनंदात जमले होते. शेरातून सरकारी माणसं बराबर पावणेदहाच्या सुमारास आली. तीन-चार व्हॅन, त्यात एक मोठा फ्रीज. काही बॉक्स, सुटबूट घातलेले आणि तोंडाला मास्क, डोक्याला कवच घातलेली माणसं उतरली. सगळ्या गावकºयांनी, ‘मान्याची वाडी झिंदाबाद, लस्सीकरण हुनार हाय, कोराना जानाय हाय,’ अशा जयघोष सुरू केला.


सरकारी माणसं खूश झाली. कनातीतून आत मंडपात मुख्य ठिकाणी जमा झाली. सगळे बॉक्स आत आले. गावकरी खूश. मग सरपंचांनी भाषणाला सुरुवात केली. ‘सन्माननीय शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आमचे गावकरी बंधूंनो, आज सरकारच्या कृपेने आपल्या गावात लसीकरणाला शुभारंभ होत आहे. आपलं गांव करोनामुक्त व्हावं यासाठी आपन गो कोरोना गोचा मंत्र जपला; पण हा कार्यक्रम राजकारणविरहीत व्हायला पायजे. नाई म्हणजेतशी आपल्या गावाची रितच हाय. आनंदाच्या आणि विकासाच्या कामात आमच्या मान्याच्या वाडीत कोनी राजकारण करत न्हायी. कसलाही भेदभाव आमच्या गावात चालत न्हायी म्हणून, तर मीडियात आमचं गाव नेहमी चर्चेत असतं. सरकारनं आमच्याकडं लसीकरणाचा पोग्राम पाटवला, त्यावेळी महिनाभरात सगळ्यांना देऊन टाका सांगितलं. आम्ही म्हणलं नाय चालणार. आज येकानं उद्या एकानं असं न्हाय चालणार. आमच्या गावात येकाच दिवशी सगळ्यांनी लसी घ्यायची. ते मुंबईत चाललंय तसलं राजकारण हितं नगं. मुंबई-पुण्यात अन् काही शेरात म्हणं लस्सी कमी पडल्या. तसलं काय चालायचं नाही. तुमी येतानाच गावात जेवडी मानसं हायत त्यांचा स्टॉक आना अन् सगळ्यांना लस्सी द्या, असं आम्ही इतावलं. सरकारला ते पटलं म्हणून आज आपल्या गावातला हा लस्सीकरणाचा कार्यक्रम जोरात हुनार हाय. यासाठी आलेल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आमचे शब्द थांबवतो. जयहिंद, जय महाराष्ट्र, जय मान्याची वाडी.’

जोरदार टाळ्या वाजल्या. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सेवकांनी जमलेल्या गर्दीतील ग्रामस्थांना आपल्या समोरच्या टेबलवर रांगेत बसायला सांगितले. प्रत्येकाच्या टेबलवर येऊन लस्सी मिळणार हाय, कुनी जागा सोडू नका असं सांगून कर्मचारी प्रत्येकाच्या टेबलसमोर थर्माकोलचे ग्लास ठेवायला लागले. तोपर्यंत सरकारी यंत्रणेची तयारी झाली. डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. ‘मान्याच्या वाडीतील सर्व ग्रामस्थांनी दाखवलेला उत्साह कौतुकास्पद आहे. एकाचवेळी सर्वांना लसी देण्याचा आमचा हा विक्रम आम्हाला करायला आवडेल. याची सुरुवात सरपंचांपासून करत आहोत.’ नर्स आली आणि तिने सरपंचांना दंड दाखवायला सांगितला. तसे सरपंच बिथरले. नर्स म्हणाली, अहो दंडावर घ्यायचंय हे इंजेक्शन.’ तसे सरपंच म्हणाले, अहो इंजक्शनचे काय काढलंत भलतंच? तुम्ही समद्या गावकºयांना लस्सी देणार म्हणून आम्ही हा मंडप उभारला. आता ही लस्सी काय अशी इंजक्शननं देणार का? तसं आमच्या गावात दुधदुभत्याला काय कमी न्हाय. परत्येक जण घरी दही, दूध, लस्सी नियमीत घेतोय. पण सरकारी लस्सी म्हंजे कायतरी वेगळं मस्त असल म्हनून आमी बोलावलं, तर तुमी हे इंजक्शनच काय काडलं?’


डॉक्टर जाम वैतागले. ‘फुलीश... आम्ही काय लस्सी वाटायला इथे आलोय का? लस द्यायला आलो आहे. इंजेक्शन. जसा पोलिओचा डोस असतो तसा हा कोरोनाच्या औषधाचा इंजक्शनचा डोस आहे.’

हे ऐकल्यावर सगळे ग्रामस्थ बिथरले आणि ग्लास फेकून मागच्या मागं काडता पाय घेत घराकडं पळू लागले. प्रत्येक जण बोंबलत होता, च्यामायला बंटीनं ग्लासचं बॅनर छापलं, सनीनं मटका उभा केला. त्यानं वाटलं लस्सी वाटपाचा कार्यक्रम हाय; पण ही तर इंजक्शन टोचायला लागलीत. ए पळारे समदी. नाहीतर टोचतील कुटं बी.


असं म्हणतं सगळं गावकरी मांडवाच्या कनातीवर करून वाट मिळेल तिथून पळू लागले. मांडवात फक्त डोक्याला हात लावून बसलेले सरपंच आणि त्यांच्या दंडात सुई खुपसणारी नर्स होती. सरकारी अधिकारीही गाडीच्या दिशेने पळाले.


No comments: