Friday, April 30, 2021

गोंडस अभिनेता ऋषी कपूर


गेल्या वर्षात कोरोनाने अनेक दिग्गजांचा बळी घेतला. त्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील एका गोंडस अभिनेत्याचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे ऋषी कपूर. गेल्या वर्षी ३0 एप्रिलला त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि खरोखरच वाईट वाटले. याचे कारण पहिल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील कोणतेही वृत्तपत्र सुरू झालेले नव्हते. त्यामुळे ज्याच्यावर भरभरून लिहिता येईल. अशा अभिनेत्यावर लिहिण्यासाठी लेखण्या चालवता आलेल्या नव्हत्या. त्यामुळे आज त्याच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्ताने त्याच्या कारकिर्दीवरून नजर मारावीच लागेल.


सुरुवातीला राज कपूरचा मुलगा, कपूर घराण्यातील कलाकार अशी ओळख असलेल्या ऋषीने आपण स्वतंत्र प्रतिभेचे कलाकार आहोत हे दाखवून दिले होते. कारण राज कपूरची तिन्ही मुले रणधीर, ऋषी आणि राजीव पडद्यावर झळकली तरी जी लोकप्रियता आणि जे यश ऋषी कपूरला लाभले ते कोणाला लाभले नाही. याचे कारण रणधीर कपूरने आपल्या अभिनयात सुरुवातीला राज कपूरची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. राजीव कपूरला तर शम्मीचा नवा अवतार म्हणून १९६0 च्या दशकातील शम्मीप्रमाणे प्रेक्षकांच्या समोर आणला गेला, पण ऋषी कपूर मात्र ऋषी म्हणून जन्माला आला आणि आपली स्वतंत्र शैली त्याने निर्माण केली होती. एका विशिष्ट पठडीत न अडकता वैविध्यपूर्ण आणि संगीतप्रधान चित्रपट केले. त्यामुळे तो सतत तरुणींच्या मनातला हीरो ठरला, तर तरुणांना नायकाप्रमाणे नाचवणारा ठरला. १९७० सालच्या 'मेरा नाम जोकर'मध्ये छोटी भूमिका करणाºया ऋषीने १९७३ साली बॉबी या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. राज कपूरची आयुष्यभराची कमाई 'मेरा नाम जोकर' या चित्रपटाने घालवली. सगळं काही त्याला विकावं लागलं. फक्त बायकोच्या आग्रहाखातर त्याने आर. के. स्टुडीओ विकला नाही. राज कपूरच्या बायकोचा सल्ला होता की, याच स्टुडीओच्या जोरावर नवा चित्रपट काढून आपण कर्जमुक्त होऊ. राज कपूरने ते मानले. आता नवा हीरो म्हणून तुझा मुलगा मला दे, अशी मागणी राज कपूरने केली आणि ऋषीला पणाला लावले. त्या शर्यतीत ऋषी जिंकला. 'बॉबी' हा चित्रपट आला आणि राज कपूरला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिने इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

कोणत्या वेळी काय करायचे याची त्याला चांगली जाण होती. प्रारंभी प्रेमी हीरो साकारणाºया ऋषीने वाढत्या वयाबरोबर नकारात्मक, खलनायकाच्या भूमिकाही साकारण्याचे धाडस केले. त्याचेही प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले. वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकांच्या स्वरूपात बदल केला. 'कुछ तो है' या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो, तर 'अग्निपथ' (नवीन) मध्ये रौफ लाला हा भीतीदायक वाटतो. औरंगजेब सिनेमातील त्याची भूमिका निर्दयी वाटते.


त्याची संवादफेक, आवाजाचा वापर त्याने चांगल्यापैकी केल्याचे दिसते. अनेक चित्रपटांत ऋषी कपूरने मुसलमान साकारला आहे. त्या त्यावेळी त्याने केलेले उर्दू भाषेतील उच्चार खरोखरच सच्चे वाटतात. 'लैला मजनू', 'अमर अकबर अँथनी', 'दिदारे यार', 'तवायफ' या चित्रपटांतील त्याच्या उर्दू भाषेतील संवादांचा आस्वाद घेणे हे रसिकतेचे लक्षण आहे.

ऋषी कपूरच्या नशिबाने त्याच्यासाठी दिग्गजांनी पार्श्वगायन केले आणि सुपरहिट, सदाबहार अशी गाणी त्याच्या वाट्याला आली, पण त्या गाण्यांसाठी त्याची देहबोली, लीप मूव्हमेंट किंवा ओठांची हालचाला इतकी अनुकूल असायची की, त्या गायकाचा आवाज याच्या गळ्यातून येतो आहे असे जाणवायचे. त्यामुळे मोहम्मद रफी आणि किशोर कुमार या दोघांचेही आवाज त्याला अगदी योग्य होत असे. 'लैला मजनू'मधील 'तेरे दर पे आया हूँ, हो के मायूस तेरे दर पे जवानी का नशा', 'अमर अकबर अँथनी'मधील 'शिर्डीवाले साईबाबा, परदा है परदा' असो किंवा 'कर्ज'मधील 'दर्दे दिल' अशी गाणी खास ऋषी करता लिहिली, गायली आहेत असेच वाटते. गाणे ऐकतानाही ऋषी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहात नाही.


ऋषी कपूरने स्वतंत्र चित्रपट केले तसेच मल्टीस्टार कास्ट चित्रपटही केले. यात त्याची अमिताभ बच्चनबरोबरची केमिस्ट्री अत्यंत छान होती. अमिताभबरोबर उभा राहताना ऋषी कधीच कुठे कमी पडला नाही. 'अमर अकबर अँथनी', 'कुली', 'नसीब', 'अजुबा' असे कितीतरी चित्रपट ऋषीने अमिताभबरोबर केले. त्यात ऋषीचे योगदान तितकेच महत्त्वाचे होते. अमिताभपुढे तो कधीही खुजा दिसला नाही. 'कुली'मध्ये दोघांचे गाणे आहे 'लंबुजी लंबूजी, टिंगुजी टिंगुजी' पण या लंबूजी आणि टिंंगुजींनी आपली उंची योग्य प्रकारे गाठलेली होती.

रहस्यमय, दे मार, कौटुंबिक किंवा प्रेमकथा अशा कोणत्याही चित्रपटात ऋषी शोभून दिसत होता. हिंदी निर्माता, दिग्दर्शकांचा आवडता विषय म्हणजे प्रेमाचा त्रिकोण. राज कपूरने हा प्रेमाचा त्रिकोण 'संगम'मधून आणला. प्रकाश मेहरांनी 'मुकद्दर का सिकंदर'मध्ये आणला असेच अनेकांनी आणले, पण रमेश सिप्पींनी 'सागर'मधून हा प्रेमाचा त्रिकोण आणला तेव्हा ऋषी कपूरच्या समोर अभिनयात कमल हसन हा दिग्गज होता, तर सौंदर्याचा अ‍ॅटमबॉम्ब आणि त्याची पहिली नायिका डिंपल ही होती. या त्रिकोणातही कमल हसनच्या मन हेलावणाºया आणि उड्या मारणाºया अभिनयात ऋषीचे तेजस्वी प्रेम झळकताना दिसत होते. 'ये वादा रहा' या चित्रपटात तर पूनम धिल्लन, टिना मुनीम आणि सारिका अशा तीन नायिकांबरोबर काम करताना आपले चेहरा हरवलेले प्रेम शोधणारा ऋषी प्रेक्षकांना आवडला होता. आपल्या गोंडस चेहºयाने मुलींना भुरळ पाडणारा हा निरागस किती खतरनाक असू शकतो हे त्याने 'बोल राधा बोल'मधून दाखवून दिले आहे. दुहेरी भूमिका करताना एक नायक, दुसरा खलनायक साकारताना त्याने घेतलेल्या स्टाइल आणि यातील नायक आणि खलनायक दोघेही प्रेक्षकांना आवडले.


ऋषी कपूर-नीतू सिंग यांची जोडी जशी पडद्यावर प्रेक्षकांना आवडली तशीच ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे, ऋषी-टिना, ऋषी-जयाप्रदा ही जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. 'सरगम'मधील भरभरून प्रेम करणारा ऋषी, 'रफू चक्कर'मधील खट्याळ ऋषी, 'दिदारे यार'मधला त्यागी ऋषी अशा विविध रूपांत तो प्रेक्षकांना आवडलाच, पण आपल्याच घरच्याच 'प्रेमरोग'मध्ये न्यायहक्कासाठी लढणारा प्रेमीही तितकाच प्रेक्षकांना आवडला होता. अशा एव्हरग्रीन चिरतरुण, गुबगुबीत आणि गोंडस अभिनेत्याचा कोरोनाने गेल्या वर्षी आजच्या दिवशी मृत्यू झाला आणि रुपेरी पडद्याचेही डोळे पाणावले.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन


9152448055

No comments: