आमदार विवेक पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि सातत्याने त्यांनी केलेल्या मागणीमुळे शिवकालीन रायगड पुन्हा उभारण्यासाठी केंद्रिय पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्धार पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. गेल्या काही अधिवेशनात आमदार विवेक पाटील यांनी हा मुद्दा सातत्याने उचलून धरला होता. यामध्ये विजयदुर्ग या किल्ल्याची होत असलेली पडझड, ऐतिहासिक वास्तू असलेल्या शिरढोणच्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तुंचा, साक्षीदारांचा सन्मान करण्याचा मुद्दा त्यांनी उठवला आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये ऐतिहासिक वास्तुंकडे ज्या आत्मीयतेने पाहिले जाते त्या प्रमाणात महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तुंकडे आत्मीयतेने पाहिले जात नाही. आमदार विवेक पाटील यांना ही त्रुटी प्रकर्षाने जाणवली आणि त्यांनी हा पुढाकार घेतला ही एक फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल. महाराष्ट्राशेजारचे गोवा हे छोटेसे राज्य. महाराष्ट्राचाच किंवा कोकणचाच एक भाग म्हणावा असा आपल्या भाषिकांचा हा प्रदेश. पण या छोट्याशा राज्यात ऐेतिहासिक वास्तूंना किती महत्त्व दिले गेले आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. गोव्याला पर्यटनाला गेल्यावर तेथील गाईड, स्थानिक टुरिस्ट कंपन्या या वास्तू मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने दाखवतात. तो पाहिल्यामुळे त्या इतिहासाच्या अभ्यासाची इच्छा निर्माण होते. हे आम्हाला का जमू नये? ओल्ड गोव्यातील मोठमोठ्या चर्च असोत अथवा वास्को द गामाच्या वस्तू, अॅक्वा फोर्टसारखा किल्ला हा किती स्वच्छ आणि सुस्थितीत दिसतो. पण ती जागरूकता आमच्यात नाही. प्रत्येकजण सरकारने लक्ष दिले पाहिजे म्हणून ओरडतो पण आपल्याला जे शक्य आहे ते करण्याचे औचित्य त्याला वाटत नाही. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांकडे गेल्यावर आपणच त्यांची किती विटंबना करतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. छत्रपती शिवरायांची गादी असलेल्या सातारा शहरात शेजारी शेजारी दोन राजवाडे आहेत. एकात प्रतापसिंह हायस्कूल भरते तर नव्या राजवाड्यातून आठ वर्षापूर्वी अनेक सरकारी कार्यालये आणि न्यायालयाचे स्थलांतर झाले आहे. पण या सुंदर वास्तुला ऐतिहासीक महत्त्व असूनही त्याची डागडुजी करण्याबाबत पुढाकार घेतला जात नाही. अतिशय भव्य असा दरबार हॉल त्या ठिकाणी आहे. कडेला मोठी नक्षिदार कारंजी आहेत. त्या जुन्या तांब्याच्या कारंज्यांची चोरी करताना मध्यंतरी पकडले होते. पण याचे पुनरूज्जीवन करावे असे कोणाला वाटत नाही. कर्नाटकात असे घडताना दिसत नाही. आम्ही त्या राज्याशी सीमेवरून भांडतो. सीमेसाठी बरोबरी करतो, पण त्यांच्यासारखी ऐतिहासिक वास्तुंची दखल आम्ही घेउ शकत नाही. छत्रपतींच्या गादीच्या ठिकाणी ही अवस्था आहे पण म्हैसूरमध्ये टिपू सुलतानचा वाडा पर्यटकांसाठी आकर्षकपणे ठेवलेला आहे. जगमोहन पॅलेसची बडदास्त किती चोख ठेवलेली दिसून येते. हे आम्हाला का जमत नाही? राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यातील दिवाणे आम, दिवाण ए खास असो किंवा आग्रा फोर्टमधील दिवाण ए आम, दिवाण ए खास असो. त्याचे सौदर्य कधीही बघितले तरी कायम जैसे थे जाणवते. बोटभरही धूळ तिथे येउन दिली जात नाही. त्या तुलनेत शिवकालीन वास्तूंची ही वाताहात का होते आहे? त्यासाठी सरकारबरोबरच प्रत्येक नागरिकाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून पुढे आले पाहिजे. दिल्ली, उत्तर प्रदेश सरकारला जमते ते आम्हाला का जमू नये हा विचार पुन्हा इथे दिसून येतो. गुजरातमध्ये गेल्यावर भुज, नारायण सरोवर, सोरटी सोमनाथ येथील, कच्छ मधील कोठारा येथील वास्तू किती स्वच्छ चकचकीत ठेवल्या जातात. कोठारा येथील जैन पार्श्वनाथाच्या मंदीरातील भव्य घंटा वाजली की तीचा आवाज शेकडो किलोमिटरपर्यंत पोहोचतो. त्या घंटेचे अनेक शतके पावित्र्य राखले गेले आहे. मात्र आमच्या नाशिकच्या नारोशंकराच्या घंटेची वाट काही खोडसाळ कॉलेज तरूणांनी काही दिवसांपुर्वी लावली होती. वसईच्या लढाईत चिमाजी अप्पांनी ती जिंकून आणली होती. या ऐतिहासिक घंटेचे महत्त्व आम्ही का जपू शकलो नाही? अशा परिस्थितीत आमची मनोवृत्ती किती दुष्ट आणि विघातक कृत्यांकडे वळताना दिसत आहे हे जरा आंतर्मुख होउन प्रत्येकाने पाहिले पाहिजे. काय अवस्था आहे आज पुण्यातल्या शनिवार वाड्याची? शनिवार वाड्यावर सभा घेणे हे राजकीय पक्षांचे बलस्थान ठरवले जाते. पण या वाड्याच्या चार बुरूजांच्या मधून जाताना काय दिसते? या वाड्यातील आतल्या भागाचा वापर कशासाठी केला जातो? वाई तालुक्यातील मेणवलीचा नाना फडणवीसांचा वाडा हा एक उत्तम वास्तू नमुना होता. काही वर्षापुर्वी प्रकाश झा या निर्मात्याने मृत्यूदंड या सिनेमाचे चित्रीकरण केले. त्यावेळी थोडीशी रंगरंगोटी केली. पण गेल्या 15 वर्षात त्यानंतर त्या वाड्याकडे कोणी ढुंकून पाहिले नाही. मेणवलीच्या बाजूचा घाट, वाईतले सात घाट, अनेक मंदीरांची अवस्था अतिशय वाईट आहे. सातारचा अजिंक्यतारा हा असाच किल्ला. या किल्ल्यावर फार पुर्वी जुने शिवकालीन रांजण, कोठारे होते. त्या कोठारांच्या भिंती होत्या. आज त्याची एकही वीट शिल्लक नाही. फक्त जोत्यापर्यंतचे बांधकाम दिसते आणि त्यावर उगवलेले गवत.सिंहगडाची काय अवस्था आहे? पुरंदरची काय अवस्था आहे? विशाळगडची अवस्था कशी आहे? पन्हाळा गड हा केवळ मधुचंद्रासाठी केलेला स्पॉट आहे काय? त्याचे ऐतिहासिक महत्व आम्ही कसे जपणार आहोत? मोठमोठ्या गड किल्ल्यांवर आज महाराष्ट्रात जेव्हा शाळेच्या सहली नेल्या जातात तेव्हा अनेक पर्यटक, शाळेचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी हे तीथे आपली नावे कोरताना दिसतात. जुन्या वास्तुंची किल्ल्यांची विटंबना केली जाते. अशी अस्वच्छता राजस्थानातील जयपूरच्या अमेरगडला दिसते का? जयपूर पॅलेस, गुलाबी शहराचे सौदर्य कसे त्यांनी जपले आहे. हे महाराष्ट्रात का घडत नाही याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. आमदार विवेक पाटील यांनी ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत सरकार केंद्राकडून मदत घेउन त्याची डागडुजी करेलही. पण त्यानंतरही त्याची रक्षणाची जबाबदारी ही वेगवेगळ्या घटकांवर सोपवणे गरजेचे आहे. आमचे पुरातन खाते याबाबत फारसे जागृत नाही. पुरातन खात्याकडून ऐतिहासिक वास्तू आणि वस्तूंची निगा व्यवस्थित राखली जात नाही. आमदार विवेक पाटील यांनी मागच्या कित्येक अधिवेशनात याबाबत पाठपुरावा करून शिरढोणचा वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा हा निगा राखण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अथवा ग्रामपंचायतीकडे सोपवावा याबाबत मागणी केली होती. त्या त्या स्थानिक संस्थांच्या माध्यमातून याबाबत सुधारणा आणि स्वच्छता केल्यावर आपोआपच त्याचे पर्यटकांकडे लक्ष वेधले जाईल यात शंका नाही. सरकारने यासाठी जे लोकप्रतिनिधी चांगल्या सूचना करतात त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे. जुन्या वास्तूंचा, किल्ल्यांचा मान राखणे सरकारी पातळीवर शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कोणी चांगली सूचना केली असेल तर त्याचा सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सगळ्या गोष्टी सरकारी पातळीवर होतील हे मान्य केल्यानंतर त्या ऐतिहासिक वास्तू आणि वस्तूंची कदर, अभिमान बाळगण्याची मानसिकता तयार करायला आम्हाला प्रयत्न करावेच लागतील. ही केवळ आमदार विवेक पाटील यांची इच्छा आहे, तशी इच्छा सर्वांना झाली पाहिजे. इतिहास हा एका वैभवाचा साक्षीदार असतो. इतिहासातून आम्हाला चुका समजतात. इतिहासात झालेल्या चुकाही समजतात आणि आम्ही कुठे चुकतो आहोत हेही समजते. यासाठी त्याच्या जतनाची गरज आहे. आमदार विवेक पाटील यांनी त्यासाठी एक पाउल टाकले आहे. त्या पावलाला पर्यटन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून पुढचे पाउल टाकले आहे. आता यासाठी आपल्याला काही पावले टाकली पाहिजेत याचा नागरिकांनी विचार करायला हवा. बाकीच्या राज्यात ते जमते आम्हाला का जमू नये?
Sunday, April 27, 2014
हे आम्हाला का जमू नये?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment