केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज तिसरा अर्थसंकल्प सादर केला. नेहमीप्रमाणेच विरोधकांची निराशा करणारा असा हा अर्थसंकल्प असला तरी प्रसार माध्यमांना या अर्थसंकल्पाने फार मोठे आव्हान दिले आहे. ते यासाठी की आता टिका कशावर करायची? त्यामुळे हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने चांगला अर्थसंकल्प आहे असे कबूल करण्यास काहीच हरकत नाही. केंद्रीय अर्थसंकल्पाचे भाषण सुरु असतानाच शेअर बाजाराच्या निर्देशांकात म्हणजे सेन्सेक्समध्ये तब्बल ६०० अंशांची घसरण झाली होती. सेन्सेक्सने २२,४९४.६१ ची नीचांकी पातळी गाठली होती. त्यामुळे या अर्थसंकल्पाने भांडवलदारांच्या मनात धडकी भरली होती हे निश्चित. भांडवलदारांमध्ये निर्माण झालेल्या या भितीच्या भावनेवरून लक्षात येते की हा अर्थसंकल्प भांडवलदारांना धार्जिणा नसावा. त्यामुळे मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार आहे असे म्हणणार्या डाव्या पक्षांचेही नाक या अर्थसंकल्पाने कापले आहे हे स्पष्ट होते. आता मात्र मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सावरला आहे. मात्र, अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराची निराशा झाल्याचे चित्र आहे. यातून सर्वसामान्यांना खूष करणारा अर्थसंकल्प अशीच या अर्थसंकल्पाची स्थिती आहे. शेअर बाजारात निराशाजनक वातावरण आहे. यामागचे मुख्य कारण हे पेट्रोल मोटारीवर एक टक्का सेस तर डिझेल मोटारींवर २.५ टक्के सेस लावला जाणार आहे. तसेच १० लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या गाड्या महाग होणार आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे. मोटर कंपन्यांच्या, कार उत्पादकांच्या शेअरमध्ये घसरण झाली आह. मात्र सध्या, मुंबई शेअर बाजारात टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि रिलायन्स यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहे. तर आयटीसी, मारुती, झी, विप्रो आणि सिप्ला कंपनीचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. यावरून स्पष्ट आहे की बँकींग, लोखंडपोलाद, विमा या क्षेत्राला प्राधान्य देणारे हे सरकार आहे. सामान्यांना फायदा ठरेल असा हा अर्थसंकल्प आहे. एकूणच सामान्य माणूस अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प मांडलेला दिसून येतो. आज जागतीक स्तरावर मंदीचे वातावरण आहे त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार याचा विचार करूनच हा अर्थसंकल्प मांडल्याचे दिसून येते. त्यामुळे मंदीच्या या संकटात संधी म्हणून कसे पाहता येईल याला अरूण जेटली यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अरूण जेटली यांचे या अर्थसंकल्पासाठी अभिनंदन केले पाहिजे. संकटे आम्ही संधी म्हणून पाहत आहोत हे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे. म्हणजे जागतिक संघटनांकडून देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असल्याचे स्पष्ट असल्याचे त्यांनी दाखवून दिले. कारण आर्थिक मंदीतही भारताचा विकास झपाट्याने वाढत आहे, स्थिर आहे. गेल्या तीन वर्षात म्हणजे मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विकासदर (जीडीपी) ७.६ टक्के इतका वाढलेला दिसतो आहे. यूपीएच्या काळात ६.३ टक्के इतका मर्यादीत असलेला विकास दर वाढताना दिसला आहे. यूपीएच्या काळात महागाई निर्देशांक ९.६ टक्के होता. तो आता ५.४ टक्के इतका खाली आला आहे. त्यामुळे विरोधकांनी आणि प्रसारमाध्यमांनी कितीही टिका केली तरी सामान्य माणसांना आवडेल असाच हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प चांगला असला पाहिजे ही अपेक्षा होतीच. दोन दिवसांपूर्वी तसे आम्ही बोलूनही दाखवले होते. कारण कोणत्याही सरकारला कर्तृत्व दाखवण्यासाठी तिसर्या वर्षातील अर्थसंकल्प फार महत्वाचा असतो. या सरकारने या वर्षात अस्मानी आणि सुल्तानी संकट झेलले आहे. दुष्काळ, अतिवृष्ठी, टंचाई या परिस्थिती बरोबरच मानवनिर्मित संकटांनाही सामना करावा लागला होता. त्यामुळेच संकटाशी सामना करुन देश विकासपथावर आणल्याचे जेटलींनी दाखवून दिले. या अर्थसंकल्पात अधिकाधिक खर्च मागासवर्गीयांसाठी केला जाणार आहे. नुकताच अमलात येत असणार्या सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी तिजोरीवर भर पडणार आहे. त्या खर्चाला सरकारला तोंड द्यायचे आहे. तरीही शेतकरी, मध्यमवर्गीय, सामान्य माणूस, मागासवर्ग यांना बरोबर घेवून जाणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी विमा योजना शेतकर्यांसाठी फायद्याची ठरते आहे. त्यामुळे सरकार आपल्या आर्थिक नियोजनातून शेतकरी, कष्टकरी यांचा विश्वास संपादन करताना दिसत आहे. त्यामुळे सामान्य, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी नव्याने आरोग्य विमा योजना लवकरच सुरु करणार असल्याचेही या अर्थसंकल्पाने कबूल केले आहे. त्याचप्रमाणे दारिद्य रेषेखालील कुटुंबासाठी सिलिंडर पुरविण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील राहील असे आश्वासन हा संकल्प देतो. यावरून गॅस अनुदान नाकारणारांची संख्या गेल्या वर्षात वाढली असल्याचे दिसते. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला हा त्यांनी संपादन केलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांचा विचार करणार्या अर्थसंकल्पाचे स्वागत करायला हवे.
Monday, February 29, 2016
सर्वसामान्यांना खूष करणारा अर्थसंकल्प
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment