- फार काळ सत्तेपासून वंचित राहणे कॉंग्रेसला कधीच शक्य नसते. चुकून जर हातातून सत्ता निसटली तर ती दीड दोन वर्षात परत मिळवायचीच हे कॉंग्रेसचे गणित. पण नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर येवून आता दीड वर्ष उलटून गेले तरी हालण्याची चिन्ह दिसेनात म्हटल्यावर सगळे कॉंगीजन हवालदिल झाले आहेत. त्यामुळे देशात अराजक माजेल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रकार सुरू केले आहेत. यामध्ये नक्कीच विरोधकांचा हात असणार हे निश्चित. आजचे हरयाणातील जाठ आंदोलन असो वा जेएनयूसारखे निर्माण झालेले प्रश्न. हे सारे मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी चालले आहेत हे न कळण्याइतकी जनता आता मूर्ख नाही.
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या देशद्रोहाच्या आरोपाने खळबळ माजली आहे. पण त्यावर झालेल्या कारवाईने अनेकांचे मुखवटे टरटरा फ़ाटत चालले आहेत. राहुल गांधींसारख्या बुजगावण्याला त्यात नाक खुपसायचे काहीच कारण नव्हते, पण विनाशकाले विपरीतबुद्धी म्हणतात तसे घडले आणि कॉंग्रेसला अखेरचा विटाळ करण्यासाठी ते त्या आंदोलनात उतरले आणि त्यांचा बुरखा फाटला. आज जे कोणी या देशद्रोही कृत्याच्या समर्थनाला नेहमीच्या उत्साहात पुढे आलेत, त्यांचे आजवर चालून गेलेले नाटक दिवसेदिवस उघडे पडू लागले आहे.
- डाव्या चळवळ्यांची एक नेहमीची शैली असते, ती दिशाभूल करण्याची त्यांची पद्धती असते. म्हणजे जो मुद्दा किंवा विषय आहे त्याला बगल देवून भलत्याच विषयावर गदारोळ करायचा. या स्टॅटेचीवर वर्षानुवर्षे हातात लाल बावटा घेवून डावे वळवळत राहिले. पण पश्चिम बंगालमधून उखडून टाकल्यावर गेल्या चार वर्षात तेही सैरावैरा झाले आहेत, दिशाहीन झाले आहेत. त्यामुळे जेएनयूचे आंदोलन हाती घेतले. इथेही काही वेगळे घडले नव्हते.
- आज ज्या डाव्या संघटनांच्या पुढाकाराने अफ़जल गुरूचे उदात्तीकरण झाले, त्यावर पोलिसांनी कारवाई केल्यावर तात्काळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची बोंब ठोकली गेली. मग त्यात शिक्षक संघटनेनेही उडी घेतली. त्यातला खोटेपणा प्रत्येक टप्प्यावर उघडा पडला आहे. कारण पहिल्या दिवशी वाहिन्यांवर झळकलेला उमर खालीद हा विद्यार्थी नेता आता फ़रारी झाला आहे. शिक्षक संघटना म्हणून पुढे आलेल्यांची भूमिका आपल्याला मान्य नाही, असे सांगायला मोठ्या संख्येने शिक्षक व कर्मचारी पुढे आले आहेत. मग विद्यापीठात पोलिस आलेच कसे, हा नवा युक्तीवाद पुढे आला आहे.
- हा फार मोठा विनोद आहे. म्हणजे पोलिस या देशातील कायदा व्यवस्थेचे राखणदार असतात. त्यांना कुठल्याही जागी व केव्हाही जाण्याचा अधिकार देशातील कायद्याने दिलेला आहे. हे विद्यापीठ भारताचा भाग नाही, असे डाव्यांना म्हणायचे आहे काय? भारतभूमीत जिथे कुठे घटनात्मक कायद्याच्या राज्याला आव्हान दिले जाईल वा कायद्याची पायमल्ली होईल, तिथे जाऊन त्याला रोखण्याचा अधिकार पोलिसांना आपोआपच मिळत असतो. त्यासाठी कोणाची परवानगी वा संमती घेण्याची गरज नसते.
- संसद, विधानसभा किंवा न्यायालये यांनाच त्यातून संरक्षण मिळालेले आहे, वा अपवाद केलेला आहे. नेहरू विद्यापीठ तशी संस्था नाही. म्हणूनच तिथे कुठलीही बेकायदा कृत्ये घडत असतील, तर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार पोलिसांना आपोआपच मिळालेला आहे. पण त्याला आक्षेप घेणार्या तथाकथित डाव्या पुरोगाम्यांना मात्र तो प्रकार चुकीचा वाटतो. कायद्यापासून नेहरू विद्यापीठाचा अपवाद कसा होऊ शकतो? दिल्लीत कुठेही काही बेकायदा घडले, तर पोलिस तिथे जाऊ शकत असतील, तर नेहरू विद्यापीठात जाण्याला आक्षेप कसा असू शकतो? विद्यापीठातला विषय असल्याने सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये, ही भाषा लोकशाहीची नव्हेतर खाप पंचायतीची झाली ना? विद्यापिठात पोलिस आलेच कसे? नेहरू विद्यापीठात पोलिस पाठवलेच कोणी? बोलावलेच कोणी? ही भाषा खाप पंचायतीची बाजू घेणारांसारखीच आहे. ती बोलणारे तमाम शहाणे डावे, पुरोगामी व त्याच नेहरू विद्यापीठातले असावेत का? जे लोक कायम भाजपा वा हिंदूत्ववाद्यांवर ब्राह्मणधर्म लादण्याचे आरोप करण्यात धन्यता मानतात, त्यांची ही भाषा कुठली आहे? आम्ही जगासाठी नियम व नैतिकता तयार करतो, मात्र तीच आम्हाला लागू होत नाही, असे यांना म्हणायचे आहे काय? साबरीमला मंदिरात वा शनि शिंगणापुरात महिलाना प्रवेश द्यावा किंवा नाही, याचा निर्णय तिथल्या ट्रस्टींना घेता येणार नाही, तो कायद्याने व प्रसंगी पोलिसांनी तिथे घुसून केला पाहिजे असे हे डावे म्हणतात. मात्र जेएनयू बाबत तसे म्हणत नाहीत. एकीकडे संघावर सनातनवर ब्राह्मणवादाचे आरोप करायचे आणि आपले कृत्य मात्र त्यापेक्षाही भयंकर करायचे असे हे विरोधकांचे, कॉंग्रेस आणि डाव्यांचे झाले आहे. रशियात पाउस पडला तर भारतात छत्री उघडणारे ते डावे. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करू नये ही अपेक्षा आहे. आज ज्यांनी पोलिस कसे आले असा सवाल केला आहे, तेच महिन्यापुर्वी शिंगणापुरात पोलिस का घुसत नाहीत, असा सवाल करत होते. थोडी जरी विवेकबुद्धी या पुरोगाम्यांकडे शिल्लक असती, तर त्यांनी तितक्याच आवेशात पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले असते. पण तसे न करून या विरोधकांचा बुरखा फाटला आहे.
Friday, February 26, 2016
सत्तेपासून दूर गेल्यामुळे तोल ढासळू लागला
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment