Tuesday, February 16, 2016

सकारात्मकतेकडे दुर्लक्ष झाले

 दहशतवाद आणि जेहादचा नवा चेहरा असलेल्या इसिसचे भूत आता जगाच्या मानगुटीवर पक्के बसले आहे. पंधरा वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या अल कैदाने जे केले होते ते नव्याने आता उगवताना दिसते आहे. त्यातून भारताला अलिप्त रहाता येईलच असे नाही. युरोपातील अनेक देशात सुखवस्तू जीवन जगलेल्या व तिथेच जन्म घेतलेल्या अनेक मुस्लिम तरूणांनाही इसिसच्या जिहादचे आकर्षण वाटले आहे. भारतातही मुंबई ठाणे येथील मुंब्रा आणि अन्य भागातून, तसेच पुणे आणि देशातील अनेक काना कोपर्‍यात हे विषारी बीज पसरत चाललेले दिसते आहे. भारतासारख्या गरीब व विषमतेने भरलेल्या देशात मुस्लिम तरूण जिहादकडे आकर्षित होणे हे अशक्य अजिबात नाही. म्हणून तर गेल्या वर्षी प्रथमच मुंबई नजिकच्या कल्याण शहरातले चार तरूण इराकला इसिसच्या युद्धात सहभागी व्हायला गेल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. अशावेळी त्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी फक्त चर्चा आणि फालतू मसलतीत वेळ दवडला गेला. तात्विक आणि बौद्धिक चर्चेलाच प्राधान्य मिळत राहिले आणि समस्या जशीच्या तशी राहिली. कालांतराने ती अधिकच भीषण रुप धारण करत गेली.
परिस्थिती अशी आहे की एका बाजूला मुस्लिम नाराजांच्या मनात विष पेरण्याचा उद्योग कट्टरपंथीय करत होते आणि दुसरीकडे मुस्लिमांच्या दुर्दशेबद्दल बोलून बुद्धीवादी हिंसेला चुचकारत बसलेले होते. जगभरात हेच चालले होते. अगदी भारतातली स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. पुरोगामी या शब्दाच्या नावाखाली वाटेल ते बरळणार्‍यांचे सध्या प्रस्थ फार वाढत चालले आहे. ते अशा दहशतवादाला कुरवाळत बसताना दिसू लागले.
 कोणत्याही समस्येचे आकलन करून त्यावरचे वास्तविक परिणामकारक उपाय शोधण्यापेक्षा जगभऱचे शहाणे, डाव्या आणि मानवतावादी विचारांच्या नावाखाली स्वत:ला विचारवंत, थोर विचारवंत, ज्येष्ठ विचारवंत, चिकीत्सक, अभ्यासक, विश्‍लेषक, समीक्षक अशा नावांनी ओळखले जाणारे चुकीची मते पसरवत राहिले. हे लोक नुसते कोणाच्या तरी डोक्यावर खापर फ़ोडण्यात धन्यता मानत होते. त्याचा लाभ हे लोक मिळवताना दिसत आहे.
    अफ़गाण असो किंवा इराक-सिरीया असो, तिथल्या जिहादी हिंसाचाराचे खापर अमेरिका किंवा अन्य कुणावर फ़ोडून काहूर माजवले जाते. त्यामुळे जिहादचा भस्मासूर बोकाळत गेलेला आहे.
   याशिवाय दुसरी बाजू राजकीय आहे. दहशतवादाला धर्म नसतो, असे टुमणे लावले जाते आणि मग तेच सत्य ठरवण्यासाठी शाब्दिक कसरती सुरू होतात. जबाबदार म्हणून राज्यकर्ते वा सरकारवर खापर फ़ोडले जाते. पण हे खापर फोडताना तथाकथीत विचारवंत हे पायरी सोडून वागतात, अशा वाईट प्रवृत्तींना नकळतपणे गोंजारत राहतात, असेच आजवर दिसून आले आहे. प्रत्येकवेळी सरकाला जबाबदार धरायचे पण सरकारच्या काही मर्यादा असतात याचे भान या व्यक्ती ठेवत नाहीत.
   प्रत्येकाच्या घरात जाऊन तिथे काय हालचाली होत आहेत, याकडे सरकार वा पोलिस नजर ठेवू शकत नाहीत. ते जागरुक नागरिकांचे काम आहे. प्रामुख्याने कुटुंब व परिवाराचे काम आहे. गेल्या वर्षी कल्याणचे चार मुस्लिम तरूण इराकला इसिसमध्ये सहभागी व्हायला गेलेले होते. त्याची पहिली खबर त्यांच्या कुटुंबियांनीच पोलिसांना दिलेली होती. अर्थात हे तरूण बेपत्ता होईपर्यंत त्यांच्या कुटुंबालाही त्यांच्या हेतूविषयी काही अंदाज नव्हता. पण जेव्हा सत्य उमजले, तेव्हा त्यांनीच पोलिसांकडे पहिली धाव घेतली हे विसरता कामा नये. त्यामागची भावनाही ओळखली पाहिजे.
   आपल्या मुलांनी चुकीच्या मार्गाने जाऊ नये, म्हणून ते पालक स्वेच्छेने पुढे आलेले होते आणि पोलिस कारवाईत आपलीच मुले तुरूंगात जातील, ह्याची कल्पना असतानाही पालकांनी ते धाडस दाखवलेले होते. पण या गोष्टीचे कुठेही ना मिडीयाने कौतुक केले ना विचारवंतांनी केले. आज अशा पालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे, त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळवण्याची गरज आहे.
या घटनेनंतर गेल्या काही महिन्यांत कोणी अशा पालकांना वा कुटुंबियांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे काय? अनेक तरूण मुस्लिम जिहादमध्ये सहभागी झालेही असतील, पण काही कुटुंबियच त्याची माहिती द्यायला पुढे सरसावले नाहीत हे सत्य आहे. हे असे का घडले हे तथाकथीत विचारवंतांनी समजून घेतले पाहिजे. आज भारताले मुस्लिम इसिस वा जिहादमध्ये सहभागी व्हायला जातात, ही नकारात्मक बाजू असेल. पण त्यातल्याच काहींचे पालक त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतात, ही त्याचीच सकारात्मक बाजू आहे. पण यातील सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमे, राज्यकर्ते, समाजधुरीण, विचारवंत, पुरोगामी, डावे उजवे मधले सगळेच कमी पडले हे लक्षात घेतले पाहिजे.

No comments: