निर्गुणाचा संग धरिला जो आवडी। बाणली तातडी विठ्ठलाची।। असे संत गोरा कुंभार यांनी आपल्या अभंगात म्हटले आहे. गोरा कुंभार हे कर्मयोगी संत होते. त्यांचे जीवन विठ्ठलाला समर्पित होते. ज्याला निर्गुण-निराकार विठ्ठलाची ओढ लागते, त्याचे संसारातील लक्ष उडते आणि तो विठ्ठलमय होऊन जातो. वारकरी संप्रदायात कर्मयोगाला फार महत्त्व आहे. विठ्ठलाला समर्पित भक्ती करायची, पण आपले नियोजित कर्म पूर्ण करून. असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी या विचाराला वारकरी संप्रदायात कुठेही स्थान नाही. त्यामुळे संत गोरा कुंभार यांच्याविषयी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या सर्व भावंडांना विशेष आत्मियता होती. त्यांचा समर्पण भाव हा ज्ञानदेवांनी हेरला होता.
आपले नित्यकर्म करत असताना ती हरिची पूजा मानून गोरोबा करायचे. हरिपाठातील अभंगात ज्ञानदेव म्हणतात की, हरिउच्चारणी अनंत पापराशी। जातील लयासी क्षणमात्रे ॥ १॥ तृण अग्निमेळे समरस झाले। तैसे नामे केले जपता हरि॥ २॥ हरिउच्चारण मंत्र पै अगाध। पळे भूतबाधा भय याचे॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ। न करवे अर्थ उपनिषदा॥ ४॥ म्हणजे हरिनामाचा जप केल्याने पापाच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. गवताचा व अग्नीचा संबंध झाला की, ते गवत अग्निरूप होते, त्याप्रमाणे हरिचा जप निरंतर करीत असले, म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. गोरोबा काका हे असेच हरिरूप झालेले होते. हरिच्या नाममंत्राचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्याच्या धाकाने भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच्चबाधा नाहीशी होते, इतकेच नव्हे, तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते; म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. अर्थात या ठिकाणी भूत म्हणजे आपण ज्या मायापाशात अडकलेलो असतो, मोहमायेत अडकलेले असतो तो मोह नष्ट होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही. पण तो करण्याची ताकद नामस्मरणात आहे. गोरोबांनी आपल्या कर्माने, समर्पणाने ते दाखवून दिले होते.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी। वायांची उपाधी करिसी जना॥ १॥ भावबळे आकळे येरवी नाकळे। करतळी आंवळे तैसा हरि॥ २॥ पारियाचा रवा घेता भूमीवरी। यत्न परोपरी साधन तैसे॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण। दिधले संपूर्ण माझे हाती॥ ४॥ म्हणजे ज्ञानदेवांना सांगायचे आहे की, कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमाचे आचरण केले, तरी हरिवर दृढ विश्वास असल्यावाचून ती सफळ होणार नाहीत, याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीण का करता? हरिच्या ठिकाणी विश्वास ठेवून त्याचे भजन केल्याने तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणे आपल्याला हस्तगत होतो, अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही. पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या म्हणजे ज्याप्रमाणे ते पाºयाचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणे हरिनामावाचून इतर साधनांनी भगवतप्राप्ती होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. किती बारकावे सांगितले आहेत या हरिपाठात ज्ञानदेवांनी हे लक्षात येते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, माझे गुरू निवृत्तीनाथ हे गुणत्रयापलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्ये दिला, म्हणजे त्यांनी केलेल्या बोधाने माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला. भक्तीचा खरा अर्थ येथे ज्ञानदेवांनी दाखवला आहे. ज्ञानदेव आपल्या गुरुबंधू असलेल्या निवृत्तीनाथांना समर्पित आहेत. तसेच गोरोबा काका विठ्ठलाला समर्पित आहेत. त्यासाठी त्यांना पंढरपूरला जाण्याचीही गरज नाही इतका विठ्ठल त्यांच्यात ज्ञानदेव पाहतात.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
No comments:
Post a Comment