Tuesday, September 1, 2026

दशक पहिला : समास सातवा : कवेश्वरस्तवन


समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधातील स्तवननाम या पहिल्या दशकातील सातव्या समासात कवेश्वरस्तवन केलेले आहे. या ठिकाणी ते प्रथम कवीच्या प्रतिभेचे सामान्य स्वरूप सांगतात. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ अशी आपल्याकडे म्हण आहे, या प्रतिभेचे माहात्म्य ते इथे सांगतात.


समर्थ म्हणतात, आता मी थोर कवींना नमस्कार करतो. कवी शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवतात. कवी म्हणजे वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय. कवीचे अंत:करण म्हणजे सरस्वतीचे स्वत:च्या मालकीचे राहते घरच समजावे. कवीला सरस्वती पूर्ण वश असते, ती त्याच्यापाशी सदैव राहते. नाना प्रकारच्या कलांना कवी जिवंत ठेवतो. तसेच अगदी खºया अर्थाने किती तरी शब्द कवीच्या हृदयात येऊन राहतात. कवीचा शब्दसंग्रह फार मोठा असतो. कवीचे इतके सुंदर माहात्म्य आजवर कोणी सांगिलेले नव्हते.

स्वामी या समासात म्हणतात, जगातील उत्तम मूल्यांचे ऐश्वर्य दाखवण्यासाठी, भगवंतांचे थोरपण गाण्यासाठी आणि अनेक तºहेच्या कौशल्याने संतांची कीर्ती सांगण्यासाठी कवी जन्मास येतात. कवी हे शब्दरूपी रत्नांचे समुद्र असतात. त्यांच्यापाशी सुंदर शब्दांचा साठा असतो. कवींच्या अंत:करणरूपी सरोवरांत मुक्त पुरुष मोकळेपणे विहार करतात. मुक्त पुरुषाच्या विलक्षण अवस्थेची सर्वांगीण कल्पना केवळ कवीच करू शकतात. बुद्धीच्या विलासाचे नाना प्रकारचे खेळ करून दाखविणारे कलावंतच कवीच्या रूपाने जन्म घेतात. कवी हे अध्यात्म ग्रंथांची खाण असतात. ते खूप अध्यात्मग्रंथ लिहू शकतात. ते बोलके जिवंत चिंतामणी असतात. कवी म्हणजे श्रोत्यांना विनाकष्ट प्यायला मिळालेले कामधेनूचे अमृतासमान दूधच असते.


रामदास स्वामी म्हणतात, कवीला प्रतिभेचा कल्पतरू म्हणावे, कारण हवी तेव्हा प्रतिभा त्याच्या सेवेला हजर असते. मोक्षाचा साठा बाळगणारा हा कवी सायुज्यमुक्तीचा पसरलेला मोठा विस्तारच असतो. कवी आपल्या काव्यामध्ये सायुज्यमुक्तीचे अति विस्ताराने वर्णन करतात. मृत्यूलोकापलीकडे जीवाच्या अवस्था, योगी लोकांचा पटचक्रभेदन मार्ग आणि ज्ञानमार्गाने जाणा‍ºयांचा परमार्थ हे तिन्ही अति सूक्ष्म, अतिंद्रिय आणि म्हणून अतिगुप्त असतात. कवी आपल्या शब्दसामर्थ्याने त्यांना साकार करून उघड करतो, सामान्य माणसापर्यंत पोचवतो. त्याचप्रमाणे परमात्मस्वरूप किंवा परब्रह्म अत्यंत शुद्ध, मलरहित आहे. ते त्रिगुणांच्या बाहेर असते, मायेच्या पलीकडे राहते. माणसाची कल्पना व बुद्धी तेथे लटक्या पडतात. शब्द तेथे पोचू शकत नाहीत. तरी कवी आपल्या काव्यशक्तीने त्याची खूण अचूकपणे सांगतो, ओळख करून देतो आणि त्याचे लक्षणही समजावून देतो.

समर्थ इथे म्हणतात की, कवी श्रुतीला काय सांगायचे आहे ते गूढ उकलतो. कवी भेटणे म्हणजे जणू काय परमेश्वराचा अलभ्य लाभच होणे. कवीच्या सहवासाने आत्मज्ञान सुलभ होते. यानंतर समर्थ रामदास स्वामी या समासात, व्यक्तीवर व मानवी जीवनावर कवीचे होणारे परिणाम सांगतात. ते म्हणतात, कवीच्या प्रतिभेने मुमुक्षुला नवी ज्ञानदृष्टी प्राप्त होते, साधन कोणते करावे ते साधकांना समजते, आणि सिद्धांची समाधी अवस्था स्थिर होते. कवीच्या प्रतिपादनेने स्वकर्तव्याची जाणीव होते, मनोजयाचे उपाय समजतात आणि धर्मिकांना नीतीचे वळण लागते. वैराग्याचे महत्त्व मनावर ठसून कवी माणसांना वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात, भक्तीचे माहात्म्य वर्णन करून त्यांचा गौरव करतात आणि आचारधर्माची आवश्यक्यता सांगून धर्मरक्षण करतात. प्रेमी पुरुषाच्या प्रेमावस्था कवी शब्दांमध्ये गुंफतात, ध्यान लावणाºया साधकांना भगवंतांचा प्रत्यय अंतरी कसा येतो त्याची कल्पना देतात, आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवितात. वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात, भक्तीचे माहात्म्य वर्णन करून त्यांचा गौरव करतात, आणि आचारधर्माची आवश्यकता सांगून धर्मरक्षण करतात. प्रेमी पुरुषाच्या प्रेमावस्था कवी शब्दांमध्ये गुंफतात, ध्यान लावणाºया साधकांना भगवंतांचा प्रत्यय अंतरी कसा येतो त्याची कल्पना देतात, आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवितात.


कवी नाना प्रकारच्या साधनांची माहिती करून देतात. अनेक प्रकारच्या साधनफलांचे वर्णन करतात आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या कृपेनेच निरनिराळ्या कार्यामध्ये यशप्राप्ती होते. कवीच्या वाणीचा विलास सुरू झाला, कवी काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणा‍ºयांचे कान अगदी तृप्त होतात. पूर्वीच्या कवींनी रचलेली उत्कृष्ट काव्ये वाचून नंतरच्या कवींची कविताशक्ती जागी होते. विद्वान पुरुषांची योग्यता, सत्ताधारी पुरुषांची सत्ता आणि हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी नाना प्रकारचे काव्य प्रबंध रचतात. अनेक प्रकारच्या गद्य पद्यादी वाङ्मयांमध्ये कवी लेखनाच्या निरनिराळ्या धाटी, छंद, प्रास व अलंकार वापरतात. कवी त्यांचे नवेनवे प्रकार सुरू करतात. या चार चार सृष्टीला कवी एखाद्या दागिन्याप्रमाणे शोभून दिसतो. कवित्वामुळे ऐश्वर्य सजविले जाते. कवी हे सर्व निर्णयांना निश्चितपणा देतात. कवी सभेला शोभा आणतात, भाग्याला भूषण देतात, नाना प्रकारच्या सुखांचे संरक्षण करतात. अदृश्य देवांना कवी रूप देऊन दृश्य करतात. ऋषींचे महत्त्व पटवून देतात आणि नाना शास्त्रांचे सामर्थ्य, अधिकार व स्थान समजावून सांगतात. मोठमोठ्या कवींनी उत्कृष्ट काव्ये रचली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता. म्हणून सबंध मानवी जीवनाला कवी हे मोठे आधार आहेत, असे स्वामी इथे सांगतात.

पूर्वीच्या समकालीन आणि पुढच्या सर्व थोर कवींना श्री समर्थ वंदन करतात. अनेक प्रकारच्या विद्या व ज्ञान थोर कवींच्या काव्याशिवाय आपल्याला मिळाले नसते. कवीमुळेच सर्व ज्ञान जगात पसरते. व्यास, वाल्मीकी इत्यादी अनेक महाकवी झाले. त्यांनीच लोकांना विवेक शिकविला. पूर्वी काव्ये केलेली होती. ती पाठ केल्याने मोठमोठ्या पंडितांना विद्वत्ता प्राप्त झाली. त्या विद्वत्तेमुळे त्यांना जगात मोठी योग्यता मिळाली. पूर्वी असे मोठमोठे कितीतरी कवी होऊन गेले. आता आहेत व पुढेही होतील. त्या सर्वांना मी नमस्कार करतो.


या समासात रामदास स्वामी म्हणतात, कवी हे चातुर्याच्या मूर्ती असतात. प्रत्यक्ष बृहस्पतीच असतात. वेद, श्रुतींनासुद्धा असे वाटते की, त्यांच्या मुखाने आपण शब्दरूपाने प्रकट व्हावे. केवळ परोपकारासाठी अनेक प्रकारचे सिद्धांत कवी आपल्या काव्यामध्ये सांगतात. पुढे स्वामी सांगतात की, कवी म्हणजे अत्यंत शुद्ध अशा परब्रह्माचे ऐश्वर्य होय. दृश्य विश्वाला अंतर्यामीपणे सांभाळणारा जो विराटपुरुष त्याची ध्यानावस्था म्हणजे हे कवी. भेदाने भरलेल्या विश्वात व्यापून देखील ईश्वर अभेद अवस्थेतच राहतो. भेदात असून भेदाचे भान त्याला नसते. ही त्याची ध्यानमग्न अवस्था. तेच कवीचे रूप असते. काव्य प्रसवताना कवी ध्यानमग्न असतो, ईश्वराशी तादात्म्य पावतो. कवी म्हणजे साकार झालेल्या भक्तीचा परिणाम असतो. आकाशाहून विशाल असणारी ईश्वराची दिव्य गुणकर्मे म्हणजे हे कवी. कविवर्णनाचे माझे विचार येथे मी पुरे करतो. महाकवी हे जगाचे म्हणजेच मानव सामाजाचे आधार असल्यामुळे त्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो. असे म्हणून या समासाचे वर्णन ते पूर्ण करतात.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा



No comments: