दासबोधातील स्तवननाम या पहिल्या दशकातील आठव्या समासात समर्थ रामदास स्वामी हे सर्वात प्रथम अध्यात्मिक सभेची थोरवी सांगतात. कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी आणि उत्तम प्रकारे होण्यासाठी सभेतून, चांगल्या चर्चेतून जावे लागते. कोणतीही सभा ही विचारांची आणि सर्वाेत्तम कार्याच्या सिद्धीसाठी ती ताकद असते. सभेमधून मोठे कार्य उभे राहत असते. म्हणूनच सभाशास्त्राला महत्त्व असते. अशा सभा प्रत्येक ठिकाणी होत असतात. त्याठिकाणी असलेली ताकद, शक्ती आणि अधिष्ठानाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी या समासात करतात. ते म्हणतात की, आता सर्व प्रकारच्या अध्यात्मिक सभांना मी नमस्कार करतो. अशा सभेत मुक्ती सुलभ होते. तेथे ईश्वर आपण होऊन प्रेमाने तिष्ठत उभा राहतो. म्हणजे, भगवान नारदाला सांगतात की, नारदा, वैकुंठ योग्यांचे हृदय किंवा सूर्य यांचे ठिकाणी मी राहत नाही. माझे भक्त जेथे गायन करतात तेथे मी उभा असतो. मी वैकुंठात सापडत नाही, योग्यांच्या हृदयांत आढळत नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी गातात त्या त्या ठिकाणी नारदा, मी उभा असतो. म्हणून सभा श्रेष्ठ मानावी. जेथे भक्त भगवंताचे गुणगायन करतात तेच वैकुंठ समजावे. तेथे नामघोषाचा गडगडाट आणि भगवंताचा जयजयकार गर्जत असतो.
त्यानंतर समर्थ सभेमध्ये कोणते कार्यक्रम चालतात त्याचे वर्णन करतात. प्रेमळ भक्तांचे गायन, भगवंताच्या कथा, हरिकीर्तने, वेदांचे व्याख्यान आणि पुराणांचे श्रवण हे कार्यक्रम अध्यात्मिक सभेमध्ये निरंतर चालू असतात. त्याचप्रमाणे परमेश्वराचे गुणानुवाद चालतात. परमार्थाच्या अनेक अंगांवर निरुपणे होतात व प्रश्नोत्तररूपी संवाद चालतात आणि आत्मविद्येमध्ये जे अनेक भेदाभेद आहेत त्यावर चर्चा चालते. त्यामुळे त्याबद्दल विचारमंथन होते.
या अध्यात्मिक सभेत कोण असते? तर अध्यात्मिक सभेतील सभासदांची यादीच इथे समर्थ सांगतात. ते म्हणतात की, या सभेमध्ये असलेले सभासद हे भक्त, प्रेमळ, भाविक, सखोल ज्ञानी, सात्विक, रम्य व रसाळ गाणारे, निष्ठावंत, कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशील, धर्मनिष्ठ, पवित्र, पुण्यशील, शुद्ध अंत:करणाचे कृपाळू, योगी, विरक्त, उदास, नियमाने चालणारे, इंद्रियनिग्रही, तापसी, विरक्त, निस्पृह, बहुदा अरण्यात राहणारे, दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे वैष्णव, बालब्रह्मचारी, मोठे योगी, पुरश्चरण करणारे, तपस्वी, तीर्थवासी, मन जिंकणारे, महायोगी, जनात राहून जनापासून अलिप्त असणारे, सिद्ध, साधू, साधक, मंत्रयंत्र करून देणारे, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही, संत, सज्जन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, प्रौढ, सर्वज्ञ, निर्मळ समाधान करणारे, योगी, विद्वान, ऋषीश्वर, धूर्त, तार्किक, महाकवी, मनोजय केलेले मोठे मुनी, दिगंबर, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्त्वज्ञानी, पिंडज्ञानी अथवा शरीरज्ञानी, योगाभ्यासी योगज्ञानी, उदासीन, पंडित, पुराणिक, विद्वान, वैदिक, भट, यजुर्वेदी पाठक, अति चांगले असणारे, वेदांचे मोठे ज्ञाते, याज्ञीक, अग्निहोत्री, वैद्य, पंचाक्षरी, परोपकार करणारे, भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळाचे ज्ञान असणारे, बहुश्रुत, निराभिमानी, अपेक्षा नसणारे, शांतिक्षमादयाशील, पवित्र, सत्वशील, शुद्ध अंत:करणाचे ज्ञानीशील पुरुष, त्यांना पाहिले की, देवाला पहिल्यासारखे वाटावे असे, उत्तम प्रकारचे मोठ्या योग्यतेचे अनेक सभासद अध्यात्मिक सभेत असतात. अशा सभेत शाश्वत कोणते व अशाश्वत कोणते याबद्दल सदैव विचारमंथन चालते. त्यांचा थोरपणा अलौकिक असतो. त्याचे संपूर्ण वर्णन करणे अशक्यप्राय आहे.
या अध्यात्मिक सभेचा मोठा फायदा होईल हे सांगताना समर्थ म्हणतात की, अशा सभेमध्ये परमार्थाची आवड असणारे लोकच बसतात. खरा परमार्थ त्यांना ऐकायला सापडतो. त्यामुळे सहजच लोकांचा उद्धार होतो. अत्यंत धीराची आणि सत्वगुणाने भरलेली उत्तम गुणाने संपन्न अशी परमार्थप्रेमी मंडळी जेथे जमतात तेथे नित्य नवा स्वानंद भोगायला मिळतो. विद्यासंपन्न, कलासंपन्न, विशेषगुणसंपन्न, भगवंताच्या प्रेमाने संपन्न अशी चांगली माणसे जेथे एकत्र येतात. त्याचप्रमाणे प्रवृत्त, निवृत्त, प्रापंचिक, परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थी, संन्यासी, वृद्ध, तरुण, लहान मुले, स्त्री, पुरुष, वगैरे सगळे जण ज्या सभेत बसून आपल्या हृदयात भगवंतांचे ध्यान करतात, ती परमेश्वराला प्रिय असणारी माणसे समजावी. त्यांच्या संगतीने तत्काळ समाधान मिळते. त्यांना मी नमस्कार करतो. ज्या सभेमध्ये भगवंताचे अखंड कीर्तन चालते, जेथे हरिनामाचा गजर चालतो त्या सभेला माझा नमस्कार असो. या समासात समर्थांनी सभेचे स्तवन केलेले आहे आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे. कोणत्याही कार्यासाठी सभा ही किती महत्त्वाची आहे हे यातून दिसून येते.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment