समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला ‘दासबोध’ हा अत्यंत अद्भुत असा ग्रंथ आहे. यातील स्तवननाम पहिल्या दशकातील नवव्या समासात त्यांनी परमार्थाचे स्तवन केलेले आहे. या समासात समर्थ प्रथम परमार्थाचा श्रेष्ठपणा सांगतात. ते म्हणतात, मी आता परमार्थाचे गुणवर्णन करतो. परमार्थ हे साधकांचे खरे ध्येय आहे. मानवी जीवनात उत्तमात उत्तम साध्य किंवा फल असेल तर ते म्हणजे परमार्थ हे आहे.
समर्थ इथे म्हणतात की, परमार्थ अति सोपा आणि रोकडा आहे. खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संतसमागम केला तर तो सहज वश होतो. परंतु तो प्राप्त करून घेण्याचे हे वर्म चुकल्यामुळे तो अति कठीण होऊन बसला आहे. त्याचप्रमाणे साधने नाना प्रकारची आहेत, पण ती सगळी उधारीची आहेत. म्हणजे त्यांचे फल कालांतराने मिळते. त्यासाठी वाट पाहावी लागते. पण परमार्थ हा अगदी रोकडा व्यवहार असल्याने तेथे तत्काळ फळ मिळते, लगेच ब्रह्मस्वरूपाचे साक्षात दर्शन घडते. वेदांत आणि शास्त्रात ज्या आत्मस्वरूपाचे वर्णन आहे. त्याचा एकदम प्रत्यक्ष अनुभव येतो.
या समासात रामदास स्वामी म्हणतात, तात्त्विक दृष्टीने परमार्थ ब्रह्मस्वरूपच आहे. ते स्वरूप अखंड, अक्षय, अपार व गुप्त आहे. पाहायला गेले तर परमार्थ सर्वत्र भरून आहे. पण त्याला पाहायला लागणारी दृष्टी नाही म्हणून तो अणुइतका देखील दिसत नाही. सर्वसंग टाकून एकांतात जाऊन पाहायचा प्रयत्न केला तरी तो दृष्टीस पडत नाही.
म्हणून समर्थ म्हणतात, हृदयाकाशमार्गामध्ये हृदयस्थ स्वस्वरूपापर्यंत पोचण्याचा जो गुप्त रस्ता आहे तो फक्त उत्तम योग्यांनाच माहीत असतो. सामान्य माणसांना या गुप्त व सूक्ष्म अर्थांचे ज्ञान बहुधा होत नाही. सर्व ज्ञानाचे तात्पर्य, अखंड, अक्षय आणि अपार असा हा परमार्थ काही केल्या चोराला चोरून नेता येत नाही. राजा, अग्नी आणि श्वापदे यापैकी कोणाकडूनही परमार्थाला भय नाही. असल्या भयाचा उल्लेखसुद्धा करू नये. परब्रह्म आपल्या जागेवरून उचलता येत नाही. किंवा ते आपल्या स्थानावरून ढळत नाही. कितीही काळ लोटला आणि बदलला तरी ते इकडे तिकडे चालत नाही. जिथल्या तेथे जसेच्या तसे स्थिर राहते. अशी ही आपली स्वत:ची ठेव आहे. तिच्यात कधीही पालट होत नाही. कितीही काळ गेला तरी त्यात कमीजास्तपणा होत नाही. परब्रह्म कधी झिजत नाही किंवा दिसत नाही असे होत नाही. परंतु गुरूने ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यात घातल्यावाचून नुसते पाहू गेले तर ते दिसत नाही.
या समासात परमार्थाचे स्तवन करताना स्वामी म्हणतात, परमार्थ अति गुह्य आहे खरे, पण जो शोधतो त्याला तो लाभतो. पूर्वी जे मोठमोठे ज्ञानी होऊन गेले त्यांचेदेखील परमार्थ हेच ध्येय होते. तो अतिशय गूढ स्वरूपाचा आहे, म्हणून त्याला परमार्थ असे म्हणतात. जे त्याचा शोध करतात त्यांना तो अर्थ सापडतो. इतरांना मात्र तो जवळ असूनही अनेक जन्म गेले तरी सापडत नाही.
परमार्थाची अपूर्वता वर्णन करताना समर्थ म्हणतात, हा परमार्थ मोठा विलक्षण आहे. त्याच्यापाशी जन्म आणि मृत्यू या कालाधीन घटनांचा मागमूस नाही. शिवाय त्याच्यामुळे सायुज्यमुक्तीची पदवी आपल्यापाशीच आपल्याला लाभते.
हे सांगत असताना इथे समर्थ ब्रह्मानुभवाचे अप्रतिम वर्णन करतात. ते सांगतात, आत्मानात्मविवेकाने माया अस्तंगत होते, नाहीशी होते. सार काय व असार काय हे विचाराला बरोबर कळते. आपल्या हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप स्वच्छपणे अनुभवास येते. आपण ब्रह्म जिकडे तिकडे अनंतपणे अनुभवास येऊ लागल्याने हे दृश्य विश्व त्यामध्ये बुडून जाते. ते कोठच्या कोठे नाहीसे होते. पंचभूतांच्या अफाट फापट पसाºयाची किंमत राहत नाही.
समर्थ इथे म्हणतात की प्रपंच खोटा वाटतो. मायेचा पसारा हा केवळ कल्पनामय आहे असे वाटते आणि विवेकाच्या सामर्थ्याने शुद्ध आत्मस्वरूपाचे अंतर्यामी दर्शन घडते. आतबाहेर ब्रह्मदर्शन होण्याची अवस्था अंतर्यामी स्थिर झाली की, सर्व संशय पार नाहीसे होतात. हे सबंध दृश्य विश्व जुने, फाटलेले भोके पडलेले आणि कुजट वाटू लागते. मनातून बाहेर टाकून देण्याच्या लायकीचे वाटते.
समर्थ म्हणतात, मानवी जीवनात परमार्थाचे परम स्थान आहे. परमार्थ हा असा आहे. जो करील त्याच्या जीवनाचे ते खरे सार्थक आहे. तो मुळातच अत्यंत श्रेष्ठ, थोर, योग्य आणि शक्तिमान आहे. पुन:पुन्हा त्याला समर्थ म्हणण्याची जरूर काय! या परमार्थामुळे ब्रह्मादिकांना विश्रांती मिळते, समाधान लाभते. त्यानेच ज्ञानी पुरुष परब्रह्माशी एकरूप होऊन जातात. सिद्ध, साधू आणि महात्मे यांना परमार्थ विसावा देतो. सात्त्विक सामान्य माणसांनी जर संतसंगती धरली तर त्यांनाही शेवटी असाच विसावा मिळतो, असेच समाधान लाभते.
अखेरीस परमार्थाचे सर्वसाधारण कार्य काय आहे हे समर्थ सांगतात. परमार्थ मनुष्यजन्माचे सार्थक करतो, परमार्थच संसारातून नीटपणे पार पडतो. धार्मिक वृत्तीच्या माणसांना परमार्थच परलोकीच्या सुखाचा मार्ग दाखवितो. परमार्थ तापसांना आश्रय देतो, साधकांना आधार देतो. या भवसागरातून कसे पार पडावे हे परमार्थच सांगतो. ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा असतो. जो परमार्थ करीत नाही तो एकपरीने भिकारीच समजावा. परमार्थाची बरोबरी करील असे या जगात काही नाही.
म्हणून रामदास स्वामी म्हणतात, अनेक जन्मांचे पुण्य पदरी असेल तरच हातून परमार्थ घडतो. परमार्थ घडला म्हणजे मुख्य परमात्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. परमार्थ न करणारा माणूस मूर्ख समजावा. शहाण्याने परमार्थ करावाच, अशी आग्रही भूमिका समर्थ मांडतात. जो मनुष्य परमार्थ जाणतो आणि आचरणात आणतो त्याचा जन्म सार्थकी लागतो. इतर सारे लोक पापी असून केवळ कुलक्षयासाठी जन्म घेतात. भगवंतांची प्राप्ती करून न घेता जो संसारामध्ये शिणतो तो मूर्ख असतो. त्याचे तोंड पाहू नये. म्हणून चांगल्या माणसाने परमार्थाच्या नादी लागावे आणि आपल्या शरीराचे सार्थक करावे. भगवंतांची भक्ती करून आपल्या शरीराचे सार्थक करावे. त्याचप्रमाणे भगवंतांची भक्ती करून आपल्या पूर्वजांचा उद्धार करावा.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment