Thursday, September 3, 2026

दशक पहिला : समास दहावा : नरदेहस्तवन


समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोधा’तील पहिल्या दशकातील दहाव्या म्हणजे शेवटच्या समासात नरदेहस्तवन केलेले आहे. या नरदेहाच्या साहाय्याने अनेक लोकांनी परमार्थाच्या साधनाचे अनेक प्रकारचे प्रयत्न केले आणि ते सिद्धीस नेले. म्हणून समर्थ इथे म्हणतात, हा नरदेह अत्यंत धन्य आहे. याची अपूर्वता अशी की, परमार्थ लाभावा यासाठी जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो.


हा नरदेह मिळाल्यावर त्याचा उपयोग करून कोणी भक्तीच्या नादी लागेल, कोणी अत्यंत विरक्त होऊन डोंगरकपारीचा आश्रय घेऊन राहिले. कोणी तीर्थयात्रा करीत फिरतात, तर कोणी पुरश्चरणे करतात, तर कोणी अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करीत राहतात. कोणी तपाच्या साधनात राहतात, कोणी उत्तम पुरुष योगाचा अभ्यास करतात, तर कोणी अभ्यास करून वेदशास्त्रांमध्ये मोठे विद्वान होतात.

हा समास अत्यंत महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणतात, कोणी एक असून अनेक रूपे घेतात, कोणी पाहता पाहता गुप्त होतात, तर कोणी एका ठिकाणी बसलेले असूनही अनेक ठिकाणी फिरतात, समुद्रांतही जाऊन येतात. कोणी हिस्रपशूंवर बसतात, कोणी जड वस्तू चालवतात, तर कोणी आपल्या तपाच्या बळाने प्रेतांना जिवंत करतात. कोणी तेजाला मंद करतात, कोणी जलाशय आटवून टाकतात, तर कोणी सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. कोणी मोठ्या दृढ निश्चयाने योगाचा अभ्यास करतात. त्यांना अनेक सिद्धी वश होतात. असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत.


साकोलता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तींपैकी ज्याला जी आवडली तिचा उपभोग घेत कोणी राहिले. याप्रमाणे असंख्य सिद्ध, साधू व संत आत्मसहित करण्याच्या मागे लागले. असा हा नरदेह मोठा प्रसिद्ध आहे. त्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच होईल. या समासात हा नरदेह श्रेष्ठ का आहे हे पण समर्थ रामदास स्वामी सांगतात. या नरदेहाच्या आधाराने अनेक साधनांची वाट मोकळी होते. अनेक साधने करणे शक्य होते. पण विशेषकरून सारासार विचारांच्या साहाय्याने पुष्कळ जन मुक्त झाले.

या समासात स्तवन का केले यासाठी समर्थ पशुदेहापेक्षा नरदेह श्रेष्ठ का हेही सांगतात. पशुदेहामध्ये उत्तम गती मिळत नाही असे सगळे सांगतात. म्हणून भगवंतांच्या प्राप्तीला नरदेहच उपयोगी पडतो यात शंका नाही. संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू, समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्त्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी, षड्दर्शनी आणि तापसी हे सगळे नरदेहातच झाले. म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे.


समर्थ म्हणतात, नरदेह स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे, पराधीन किंवा परतंत्र नाही. नरदेहाचा आणखी एक मोठा गुण असा की तो स्वतंत्र असतो. परंतु त्याला परोपकार करण्यापायी झिजवावा आणि कीर्तिरूपाने मागे ठेवावा. घोडा, गाय, बैल, म्हैस ही जनावरे आणि असे इतर पशू जर दयाळूपणे मोकळे सोडले तर त्यांना कोणीतरी धरून नेतो.

समर्थ या स्तवनात सांगतात, व्यंग असलेला देह कामाला येत नाही. तो बेअक्कल असेल, त्याला फेफरे येत असेल किंवा पिशाच्चबाधा असेल तर तो खात्रीने निरुपयोगी समजावा. म्हणूनच समर्थ म्हणतात, निर्व्यंग नरदेह परमार्थाला लावावा. इथे सांगितलेल्या व्यंगांपैकी कोणतेही व्यंग नसेल आणि नरदेह सर्व अवयवांनी चांगला धडधाकट असेल तर त्या माणसाने तत्काळ परमार्थाचा मार्ग चालण्यास आरंभ करावा. मूर्ख माणसाला उत्तम निर्व्यंग देह मिळालेला असतो खरा. पण परमार्थाचा विचार करण्याचे तो विसरूनच जातो. मग मायेच्या जाळ्यात अडकून तो भ्रमाने वावरतो. उदाहरणार्थ, असा माणूस जमीन खणून स्वत:साठी घर बांधतो. घर माझे आहे ही कल्पना तो घट्टपणे उराशी बाळगतो. पण ते बहुताचे आहे, आपले एकट्याचे नाही, ही गोष्ट त्याला कळतच नाही. ज्या घराला मूर्ख माझे म्हणतो व त्यामध्ये माझेपणाने गुंतून राहतो, त्या घरावर किती जीवजंतू व माणसे माझेपणा सांगतात त्याचे वर्णन या समासात समर्थ करतात. उंदीर म्हणतात हे घर आमचे, पाली म्हणतात हे घर आमचे, माशा म्हणतात हे घर आमचे, याच रीतीने कांतण्या, मुंगळे, मुंग्या, विंचू, साप, झुरळे, भुंगे, भिंगो‍ºया, घराच्या लाकडांतील अळ्या, मांजरे, कुत्री, मुंगुस, पाद्रे किडे, वाळवी, पिसवा, ढेकूण, तांबड्या मुंग्या, घुंगर्डी, पिसोळे, गांधील माशा, सोट आणि गोमा हे सर्व किडे ते घर आपले म्हणतात. या किड्यांची नावे आणि पीडा आणखी विस्ताराने सांगायला नको. पशू, दासीघरची माणसे घर आपले म्हणतातच. शिवाय पाहुणे, मित्र, गांवकरी, चोर व राजाचे अधिकारी ते घर आपले म्हणतात. फार काय सगळे जण म्हणतात. हा मूर्खही घर माझे म्हणतो. अखेर ते घर जड होते. त्याचे ओझे वाटू लागते. मग तो गाव सोडून दुसरीकडे जातो.


त्या काळच्या जनरीतीप्रमाणे गाव ओसाड पडला की, सगळ्यांना घरदार टाकून जावे लागे. कालांतराने सगळी घरे पडतात. सबंध गाव ओस पडतो. मग त्या उजाड घरांमध्ये जंगली जनावरे राहू लागतात. खरे म्हणजे किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचेच ते घर असते. ते प्राणी तेथे वस्ती करतात. माझे माझे म्हणून गुंतणाºया बिचाºया या मूर्खाला मात्र घर सोडून जावे लागते. घराची अवस्था, अशी होते. मातीचे घर माझे माझे म्हणणे किती खोटे आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. सारांश, जन्म म्हणजे जगातील दोन दिवसांची वस्ती असते. ती कुठे तरी करावी.

जसे घर खरे आपले नाही, तसा देहसुद्धा खरा आपला नाही. देह आपला म्हणावा तर तेही खरे नाही. घराप्रमाणेच तोही अनेकांसाठी जन्मास आला आहे. उदाहरणार्थ, माणसाच्या डोक्यात उवा घर करतात आणि त्याचे डोके खातात. केसांच्या मुळाशी राहून किडे मांस खातात, एखादे गळू झाले तर त्यात किडे पडतात. माणसाच्या पोटात जंत होतात. हे तर आपण प्रत्यक्ष पाहतोच. दंत, डोळे व कान यांना कीड लागते. कानाला कीड लागली तर तेथे गोमाशा गर्दी करतात.


गोचिड रक्त पितात, चामवा मांसात घुसतात, पिसोळे चावून पळून जातात. भुंगे व गांधीलमाशा चावतात. गोमा व जळवा रक्त पितात, विंचू, साप, फुरसे व घोणस दंश करतात, जन्मल्यापासून पाळलेला हा देह एकाएकी वाघ घेऊन जातो. उंदीर व मांजरे चावतात. कुत्रे व घोडे लचके तोडतात. अस्वल व वानर जीव कासावीस करून मारतात. उंट चावतात व उचलून फेकतात. हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंग खुपसून ठार मारतात. चोर तडातडा शरीराचे तुकडे करतात. पिशाच्चे अंगांत संचारून मारतात. असो, या देहाची अस्वस्था ही अशी आहे. देह बहुतांचा आहे, परमार्थी लावण्यात त्याचे सार्थक आहे. या दृष्टीने विचार केला तर हे शरीर पुष्कळांचे आहे. केवळ आपले नाही हे स्पष्ट होते. देह परमार्थासाठी झिजविला तरच त्याचे सार्थक झाले असे समजावे. नाही तर नाना प्रकारच्या आघातांनी तो वाया जातो आणि मृत्यू पावतो. प्रपंच्यामध्ये गुंतलेल्या मूर्खांना परमार्थातील सुखाची कल्पना येऊ शकत नाही.

दशक पहिला समाप्त


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: