पाश्चात्त्य जगाने नवउदारमतवादी हक्क, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, हवामान बदल आणि शाश्वत विकास यांसारख्या मुद्द्यांवर स्वत:ला जागतिक नैतिकतेचे रक्षक म्हणून दीर्घकाळापासून सादर केले आहे. तथापि, जेव्हा या आदर्शांची प्रत्यक्ष आचरणाशी पडताळणी केली जाते, तेव्हा त्यांच्या तथाकथित नैतिक श्रेष्ठत्वामागे लपलेला दुटप्पीपणा वारंवार उघड होतो. हा विरोधाभास आता केवळ त्यांच्या परराष्ट्र धोरणापुरता मर्यादित राहिलेला नाही. पाश्चात्त्य समाजांमध्ये डाव्या-उदारमतवादी विचारसरणी आणि मूलगामी राजकारण यांच्यातील वाढत्या वैचारिक एकत्रीकरणाचा परिणाम स्वातंत्र्य, बहुलवाद, धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक स्वातंत्र्य यांसारख्या मूल्यांच्या अर्थावरही होत असल्याचे दिसते. अमेरिकेत, जिथे अनेक दशकांपासून अभिव्यक्तिस्वातंत्र्याला आपल्या लोकशाहीचा आत्मा आणि मतभेद व्यक्त करण्याच्या अधिकाराला आपली सांस्कृतिक ओळख मानले जाते, तिथे एखाद्या विचाराची, संघटनेची किंवा व्यक्तीची स्वीकृती अनेकदा ती तेथील प्रचलित वैचारिक कथानकाशी सुसंगत आहे की, त्याच्याशी विसंगत आहे यावर अवलंबून असल्याचे दिसते.
न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे २९ आॅगस्ट रोजी आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ हा या बदलत्या चर्चेचा एक उल्लेखनीय नमुना होता. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक समुदायांमध्ये संवाद, सहअस्तित्व आणि ऐक्य वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण झाले. हा कार्यक्रम ‘अमेरिकन हिंदुज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’द्वारे आयोजित करण्यात आला होता आणि त्याला विविध हिंदू-अमेरिकन संघटनांनी पाठिंबा दिला होता. अमेरिकेतील विविध शहरांमधून आणि ३१ देशांमधून आलेल्या सुमारे ६,००० प्रतिनिधींच्या, तसेच २५०हून अधिक हिंदू-अमेरिकन संघटनांच्या सहभागाने या कार्यक्रमाची व्याप्ती अधोरेखित झाली. असे असूनही, न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि तो रद्द करण्याची मागणी केली. अखेरीस हा कार्यक्रम पार पडला आणि त्याने आपले घोषित उद्दिष्ट साध्य केले, परंतु त्याने एक मूलभूत लोकशाही प्रश्न उपस्थित केला. वक्त्याचे विचार आणि संघटना न ऐकताच अस्वीकार्य घोषित करणे, हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि बहुलवादाच्या तथाकथित अमेरिकन परंपरेशी सुसंगत आहे का?
या आंदोलनात ‘हिंदू फॉर ह्युमन राइट्स’ ही संघटनाही सक्रिय होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नावामध्ये ‘हिंदू’ हा शब्द असलेली ही संघटना भारत, हिंदुत्व आणि आरएसएसशी संबंधित मुद्द्यांविरुद्ध प्रचार करते. आरएसएस-भाजपला होणारा विरोध हा हिंदू समाजातूनच येत आहे, असे सुचवण्यासाठी या संघटनेचे नाव जाणीवपूर्वक निवडले गेले असावे, असे दिसते. त्याच्या कार्यकारी संचालक, सुनीता विश्वनाथ, या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘हाउडी, मोदी’ विरुद्धच्या आंदोलनांमध्येही सहभागी होत्या आणि ‘डिसमँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. २०२३ मध्ये वॉशिंग्टन येथे राहुल गांधींच्या थिंक-टँक संवादातही त्या उपस्थित होत्या. यावरूनच त्यांनी आरएसएस प्रमुखांच्या कार्यक्रमाला विरोध का केला हे सहज स्पष्ट होते.
न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी पंतप्रधान मोदी आणि इस्रायलशी संबंधित मुद्द्यांवर सातत्याने स्पष्ट राजकीय भूमिका घेतली आहे. २०२३ मध्ये त्यांच्या अमेरिका दौºयादरम्यान पंतप्रधान मोदींविरुद्ध जारी केलेले संयुक्त निवेदन, नागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याला असलेला त्यांचा विरोध, उमर खालिदला दिलेला त्यांचा पाठिंबा, आणि हमासला दहशतवादी संघटना म्हणून मान्यता देण्यास नकार व ‘ग्लोबलाईज द इंतिफादा’सारख्या घोषणांचा निषेध करण्याची त्यांची भूमिका, यावरून त्यांचा राजकीय दृष्टिकोन समजण्यास पुरेसे आहे. त्यांची मूलभूत श्रद्धा अमेरिकेच्या लोकशाही तत्त्वांवर आहे की, एखाद्या विशिष्ट धर्माच्या श्रद्धांवर, असा प्रश्न विचारणे अवास्तव ठरणार नाही. याच प्रकारच्या आंदोलनाच्या धर्तीवर, २६ आॅगस्ट रोजी, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाचे पाकिस्तानी वंशाचे अध्यक्ष आसिफ महमूद यांनी मोहन भागवत यांच्या अमेरिका दौºयाला विरोध केला. आयोगाने भारताविषयीच्या आपल्या पूर्वीच्या विधानांमध्ये सीएए, एनआरसी, जम्मू आणि काश्मीर, उमर खालिद आणि शरजील इमाम यांनाही धार्मिक स्वातंत्र्याच्या चर्चेशी जोडले आहे. आंदोलनांची ही संपूर्ण मालिका म्हणजे केवळ काही तुरळक घटनांचा योगायोग आहे असे मानणे म्हणजे वास्तवाकडे दुर्लक्ष करण्यासारखे ठरेल.
न्यूयॉर्कमधील स्थानिक राजकारण, कार्यकर्त्यांच्या संघटना, भारतविरोधी मोहिमा आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कार्यरत असलेल्या संघटनांमध्ये एक वैचारिक परिसंस्था दिसून येते, जिथे एका व्यासपीठावरील आरोप दुसºया व्यासपीठावर पुरावा बनतात. मग या आरोपांना तिसºया व्यासपीठाद्वारे वैधता दिली जाते आणि अखेरीस, एक सुनियोजित कथानक प्रस्थापित सत्य म्हणून सादर केले जाते. पण या सर्व आंदोलनांच्या दरम्यान, एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे मोहन भागवत न्यूयॉर्कमध्ये काय म्हणाले? त्यांनी स्पष्ट केले की, एकतेसाठी एकसारखेपणा आवश्यक नाही. मानवी श्रेष्ठत्व इतरांवर वर्चस्व गाजवण्यात नाही, तर जगाप्रति आपली जबाबदारी समजून घेण्यात आहे. त्यांचा संदेश हा भारताच्या शाश्वत सभ्यताविषयक दूरदृष्टीचे जागतिक सादरीकरण आहे, ज्याचे सार ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेत सामावलेले आहे.
No comments:
Post a Comment