दासबोधातील दुसरा दशक हा मूर्खलक्षणनाम दशक म्हणून ओळखला जातो. यातील पहिल्या समासात मूर्खांची लक्षणे समर्थांनी सांगितलेली आहे. समासाचा आरंभ गणपती, शारदा व श्रीसद्गुरू यांना वंदन आणि श्रीरामस्मरण करूनच इथे समर्थांनी केलेला आहे. रामदास स्वामींनी या समासात, मूर्खांचे प्रकार आणि त्यांची अपार लक्षणे सांगितली आहेत. ते म्हणतात, जगातील मूर्खाचे प्रकार दोन, एक मूर्ख व दुसरा पढतमूर्ख. दोघांची लक्षणे ऐकून गंमत वाटेल. श्रोत्यांनी आदराने ती ऐकावीत आणि तयार विचार करावा. पढतमूर्खाची लक्षणे दहाव्या समासात सांगितली आहेत.
ज्यांना आत्मज्ञान नाही, जे अगदी अज्ञानी आणि म्हणून प्रपंचात जे संपूर्णपणे गुंतलेले असतात, अशा लोकांची ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. कामवासनेपायी अत्यंत स्त्रीअधीन जीवित जगणारा तो मूर्ख. ज्या आईबापांच्या पोटी जन्म घेतो त्यांच्यावरच उलटतो, आपल्या बायकोला जो एकमेव मित्र मानतो, इतर सर्व नातेवाइकांना बाजूस सारून जो बाईलबुध्या बनतो, आपले अंत:करण फक्त बायकोपाशीच उघड करतो, जो परस्त्रीवर प्रेम करतो, आपल्या सासुरवाडीस अनाहुत जाऊन राहतो, कुलशील न पाहता कोणत्याही मुलीशी लग्न करतो, तो माणूस मूर्ख समजावा.
मोठा अहंकरी, बढाईखोर, निंदक आणि व्यसनी असणारा तो मूर्ख असतो. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसासमोर जो मोठ्या अहंकाराने वागतो, तो व आपण बरोबरीचे आहोत असे मनात समजतो, तसा अधिकार नसताना जो दुसºयावर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो, जो आपण स्वत:च आपली तारीफ करतो, एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो तर दुसरीकडे आमचे पूर्वज व वाडवडील असे होते तसे होते, वगैरे बढाई मारतो तो मूर्ख.
काही कारण नसता जो उगाचच हसत सुटतो, दुसºयाने दिलेला योग्य सल्ला जो ऐकत नाही, जो पुष्कळ लोकांशी वाकडा असतो. स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, येता-जाता दुसºयाची निंदा करतो, पुष्कळ जण जागत बसले असता जो मध्ये हातपाय ताणून झोपतो, दुसºयाच्या घरी भरमसाट जेवतो, आपला मान किंवा अपमान जो स्वत:च्या तोंडाने उघड करतो, पुढील सात व्यसनांत (जुगार, बाहेरख्याल, चोरी, चहाडी, परस्त्री, पांखरांची झुंज आणि नायकिणीचे गाणे) मग्न असतो. तो माणूस मूर्ख समजावा.
स्वत:पेक्षा श्रेष्ठ असणाºया माणसाशी जो फार सलगी करतो, हिताच्या गोष्टी कोणी सांगू लागला तर कंटाळतो, न ऐकणाºया लोकांना जो शिकविण्याच्या प्रयत्न करतो, वडील माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो, सज्जन माणसाला भानगडीत अडकवितो, कामवासना भोगण्यापायी जो एकाएकी लाजमर्यादा सोडतो आणि अत्यंत बेलगाम वागू लागतो, तो माणूस मूर्ख समजावा.
आपल्या पदरचा नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो, सदासर्वकाळ अस्थिर चित्त असतो, कारणाचा नीट शोध न करता अपराध नसून जो शिक्षा करतो, थोडक्या खर्चासाठी भारी कंजूषपणा करतो, देवाची व वडील माणसांची जो पर्वा करीत नाही, अशक्त असला तरी वाचाळपणा करतो, काही घरबंध न पाळता जो अश्लील शब्द सर्रास वापरतो, जो घरांतील माणसांवर दातओठ खातो, पण बाहेर मात्र दिनपणे नरमाईने वागतो. तो माणूस मूर्ख समजावा.
दुसºयाच्या बायकोशी एकांत करतो, रस्त्याने खात खात जातो, आपण कोणावरही उपकार करीत नाही, दुसºयाने उपकार केला तर त्याची फेड जो अपकाराने करतो, करतो पण बोलतो फार, जो तापट, आळशी, खादाड, दुर्वर्तनी, कपटी आणि धारिष्टशून्य असतो, विद्या, वैभव, धन, पराक्रम, सामर्थ्य किंवा मान यांपैकी काही देखील जवळ नसून जो उगीच अभिमान मिरवतो, उद्धट, खोटा, लबाड, दुराचारी, वाकड्या बुद्धीचा व बेशरम असून जो बेसुमार झोप घेतो, जो उंच जागी जाऊन वस्त्र नेसतो, चव्हाट्यावर परसाकडेस बसतो, सदा बहुतेक नग्नप्राय असतो किंवा फिरतो, ज्याचे दात, डोळे, नाक, हात, कपडे व पाय नेहमी अस्वच्छ असतात, तो मूर्ख.
अपशकुनाने दुसºयाचा घात करतो, तो माणूस मूर्ख समजावा. चंचल बुद्धीचा, स्वार्थी, पैशाला सर्वस्व मानणारा, ईश्वराला विसरणारा, दुर्जन संगतीत राहणारा, निंद्य वस्तू अंगीकारणारा, रागाने स्वत:चे नुकसान करणारा तो मूर्ख असतो. जो बुद्धीने अस्थिर असतो, जिवलग माणसांना जो अति दु:ख देतो, त्यांच्याशी कधी गोड शब्दही बोलत नाही, कोणी आश्रयाला आला तर त्यास दूर लोटतो, संपत्ती टिकेल या भरवशावर राहतो, भरदिवसा डोळे झाकतो म्हणजे ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो, तो मूर्ख.
दुसºयाच्या दु:खाने जो सुखी होतो, दुसºयाच्या सुखाने दु:खी होतो, कोणाशी बोलताना आदर न ठेवता बोलतो, निंद्य वस्तूचा जो अंगीकार करतो, जो सरळ अनुमान सोडून बोलतो, आडमार्गाने जातो, जो आपली पत राखू जाणत नाहीं. अवघड पैज मारतो, कारण नसताना बडबडतो, पण जरूर असते तेव्हा जो मुक्यासारखा गप बसतो, तो मूर्ख.
हलक्या लोकांशी जो बरोबरीने वागतो, त्यांच्याशी बरोबरीने वाद घालतो, उत्तरास प्रत्युत्तर देतो, जो श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो, जी वस्तू मिळणे अशक्य आहे तिच्यासाठी हेवा करतो, स्वत:च्या घरात चोरी करतो, ईश्वराला सोडून जो माणसावर भरवसा ठेवतो, काही सार्थक न करिता आयुष्याचे दिवस वाया घालवितो, संसारात भोगाव्या लागणाºया दु:खासाठी जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्राचा दोष लोकांत उघड करतो, श्रेष्ठ माणसांच्या मनातून जो उतरतो, सभेमध्ये किंवा बैठकीमध्ये जो नकोसा वाटतो, क्षणाक्षणाला ज्याचे मन बदलते, ज्याच्या सभेला आवरणारा नसतो, जो भ्रष्ट मार्गाने द्रव्य मिळवितो, आपला पैसा दुसºयापाशी ठेवून जो लोकांच्या पैशाची हाव धरतो, घरी आलेल्या पाहुण्यास जो मदत करीत नाही, जो सदा सर्वकाळ चिंताग्रस्त असतो, दोन्ही हातांनी डोके खाजवितो, जलाशयांत जो चूळ टाकतो, पायाने पाय खाजवितो, तो मूर्ख असतो.
बायकोशी व मुलांशी जो फाजील बरोबरीने वागतो. जो परस्त्रीशी भांडणतंटा करतो, मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो, मूर्खाची संगत करतो, कोणाचे भांडण चालू असेल तर जो पाहत उभा राहतो, ते सोडविण्याऐवजी त्याची गंमत पाहतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो मूर्ख.
श्रीमंत झाल्यावर पूर्वीच्या माणसांची ओळख जो विसरतो, आपले काम होईपर्यंत जो अगदी नम्रपणे वागतो, पण दुसºयाच्या कामाला उपयोगी पडत नाही, कांही वाचताना जो मुळांतील अक्षरे सोडून देतो किंवा स्वत:च्या पदरची घालून ते वाचतो, जो पुस्तकांची जोपासना करीत नाही, जो स्वत: कधी पुस्तक वाचीत नाहीं, दुसºया कोणाला वाचायला देत नाही, नुसते दप्तरात बांधून ठेवतो, तो माणूस मूर्ख समजावा.
समर्थ सांगतात की, ही मूर्खलक्षणे ऐकून मनुष्य चतुर होतो. शहाण्याने त्यांचा त्याग करावा. अशी ही मूर्खलक्षणे आहेत. ती ऐकल्याने मनुष्य चतुर बनतो. शहाणी माणसे लक्ष देऊन ती सदा ऐकतात. वास्तविक मूर्ख लक्षणे अगणित आहेत. श्रोत्यांनी त्यांचा त्याग करावा म्हणून माझ्या बुद्धीला सुचली ती लक्षणे मी येथे सांगितली. त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. आपण उत्तम लक्षणे घ्यावी. मूर्ख लक्षणे सोडून द्यावी.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment