- जवळपास दोन महिन्यांच्या वनवासानंतर मॅगीची न्यायालयामुळे सुटका झाली. दोन दशके ज्या मॅगीने दोन मिनिटे म्हणत दोन पिढ्यांची भूक भागवली होती त्यांना दोन महिन्यांपूर्वी फार मोठा झटका बसला होता. त्यामुळे वनवासाला सामोरे जावे लागले होते. त्यातून स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी त्यांची सुटका झाली. मुंबई उच्च न्यायालयात मॅगीला क्लीन चिट मिळाली नसली तरी दिलासा मिळाला आहे. सरकारने घातलेली बंदी न्यायालयाने अवैध ठरवली आहे.
- मॅगी तयार करणार्या नेस्ले कंपनीला आपली बाजू मांडण्यास पुरेशी संधी दिली गेली नाही, असे न्यायालयाने म्हटले असले तरी मॅगी हा खाद्य प्रकार सुरक्षित आहे, अशी ग्वाही दिलेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे न्यायालयाने बंदी अवैध ठरवली याचा अर्थ मॅगी लगेच खाण्यायोग्य झाली असे म्हणणे पोरकटपणाचे आणि भाबडेपणाचे वाटेल. सरकारमान्य प्रयोगशाळेमध्ये मॅगीची पुन्हा तपासणी करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रयोगशाळा कोणत्या हे न्यायालयाने सांगितले आहे.
- पुढील सहा आठवड्यांत ही तपासणी होईल आणि त्यानंतर मॅगी खाण्यायोग्य आहे की नाही याचा निर्णय न्यायालय देईल. ही तपासणी होईपर्यंत मॅगीचे उत्पादन होणार नसल्याने एकप्रकारे बंदी कायम आहे. मात्र, स्वतंत्र चौकशी होऊन खाद्य प्रकाराबद्दल जनतेच्या मनातील संशय घालवण्याची संधी नेस्लेला मिळणार आहे.
- याठिकाणी हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. मॅगी हा घराघरात पोहोचलेला अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे. किंबहुना शेवया या नूडल्स नावाने खायला मॅगीने शिकवले. म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागात शेवयाचे उप्पीट हा प्रकार फेमस असला तरी शहरात शेवया या फक्त खिरीपुरत्या मर्यादीत होत्या. त्यामुळे मसालेदार शेवया नव्या पिढीला मॅगीने खायला शिकवल्या. नोकरदार महिलांना तर झटपट मॅगीचा फार मोठा आधार होता. मुले आणि तरुणांमध्ये मॅगी लोकप्रिय होती आणि अजूनही आहे हे नाकारता येणार नाही. किंबहुना भारतीय खाद्य संस्कृतीत चिनी खाण्याचे प्रकार घुसले त्यात मॅगी नूडल्स हा पहिला पदार्थ असेल. मात्र, त्याच मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण धोकादायक स्तरावर असल्याचे जाहीर झाल्यानंतर सर्वत्र साशंकतेचे वातावरण होते.
- शिशाचा आरोग्यावरील परिणाम हा सावकाश होतो. काही वर्षांनंतर दुष्परिणाम जाणवू लागतात. मॅगीवरील शिशे हानिकारक पातळीवर आहे, असे सरकारी अधिकारी छातीठोकपणे सांगत होते. चित्रवाहिन्यांवर कित्येक दिवस यावर चर्चा झडल्या. नेस्ले ही आंतरराष्ट्रीय कंपनी. कंपनीचा आर्थिक व्याप एखाद्या लहानशा देशाच्या अर्थव्यवस्थेएवढा आहे. त्यामुळे हा घातक खाद्य प्रकार गरीब देशांवर लादून बक्कळ नफा कमावणारी, लोकांच्या जिवाशी खेळून पैसा कमावणारी कंपनी अशी प्रतिमा नेस्लेची झाली आहे. अर्थात खरोखरच त्यात शिसे असेल तर हे मत चुकीचे नाही.
- आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठ मुक्तपणे झाल्यामुळे मॅगीसारख्या अनेक खाद्यपदार्थांचे चांगलेच फावले होते. अर्थात आपल्याकडील सरकारी कारभार इतका विचित्र आहे की कसलीही योग्यप्रकारे तपासणी याप्रकाराची होईरू याची खात्री देता येत नाही. त्यामुळे नेस्लेसारख्या कंपनीला काही मूठभर लोकांची तोंडे बंद करून, राजकीय पक्षांना मॅनेज करून त्यांचे उत्पादन सदोष जरी असले तरी वनवास संपवणे अवघड नाही. सरकारी अधिकार्यांनी घेतलेल्या चाचण्यांमध्ये शंकांना जागा आहे आणि त्या शंकाही तपासून पाहिल्या पाहिजेत, असे काही तज्ज्ञ म्हणत होते. या आधारावरच नेस्ले दोषमुक्त होवू शकते. किंबहुना शिसे विरहीत प्रॉडक्ट लॅबमध्ये पाठवणे नेस्लेला तसे काहीच अवघड नाही.
- परंतु या मॅगीच्या निमित्ताने ज्या चर्चा टिव्ही आणि प्रसारमाध्यमांमधून झाल्या होत्या त्यामुळे मॅगीची फुकटात नको तितकी जाहीरात झाली हे मात्र कबूल केले पाहिजे. याच वाहिन्यांना याच नकारात्मक जाहीरातीपोटी आणि नंतर बदलेलेले खाण्याच योग्य मॅगी अशी जाहीरात करणारे पर्मनंट पॅकेज मिळाल्यावर दोन मिनिटातच नाही तर चुटकीसरशी मॅगी मार्केटमध्ये धुमाकूळ घालेल यात शंकाच नाही. केवळ टीआरपीकडे पाहून काम करणार्या टीव्ही अँकरांचे पीक सध्या आल्यामुळे शास्त्रीय चर्चा, शास्त्रीय कसोटीवर कोणी केली नाही. नेस्लेवर ६४० कोटींचा दावा ठोकला. न्यायालयाने पुन्हा तपासणी करण्याचा आदेश दिला आहे.
- मॅगी हे पौष्टिक खाद्य नसल्यामुळे वनवास संपला तरी पालकांनी मुलांना त्यापासून दूरच ठेवले पाहिजेे. मॅगी धोकादायक निघाली तर जबर दंडवसुली करून नेस्लेला धडा शिकवावा. मात्र, भारतातील प्रयोगशाळांचे परस्परविरोधी अहवाल येतात, स्टँडर्डायझेशन झालेले नसते, आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे काम करणार्या प्रयोगशाळा प्रशासनाकडे नाहीत हीच गोष्ट देशासाठी धोकादायक आहे. प्रयोगशाळांची संख्याही अत्यल्प आहे. त्यामुळे भारतीय उत्पादनांच्या दर्जाच्या सातत्याबद्दल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शंका असते. तशीच शंका येथील तपासण्याबाबत असते. या कमतरतेचा गैरफायदा कंपनी उठवू शकते. अर्थात मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या या विविध भांडवलदार राजकीय पक्षांना आर्थिक मदत करत असतात. तशी मदत थांबल्यामुळे किंवा कमी पडल्यामुळे नेस्लेच्या मॅगीत शिसे सापडले की काय अशीही शंका यायला इथे वाव आहे. त्यामुळे अचानक जर मॅगीला क्लीनचीट मिळाली तर त्याचा अर्थ अर्थव्यवहाराशी जोडला जावू शकतो.
Sunday, August 16, 2015
दोन मिनिटांचा वनवास
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment