Monday, August 17, 2015

फक्त सत्तांतर झाले, विकासाचे स्वप्न अपूर्णच राहिले

  •  गोर-गरिबांना, मध्यमवर्गीय साध्यासुध्या माणसांना, सज्जनांना पोलिसांचीच भीती वाटावी. जिथे प्रामाणिकपणा हीच उपेक्षित होण्याची, छळले जाण्याची गुणवत्ता असते. भ्रष्टाचार हाच जिथे शिष्टाचार असावा. जगणे हीच जिथे जन्मठेप वाटावी अशा व्यवस्थेत आपण आज आपण जगत आहोत. त्यामुळे सामान्यांचे जीवन अत्यंत वाईट झालेले आहे. सरकार बदलले, सत्ताचालक बदलले पण परिस्थितीत कोणताच बदल झालेला नाही. अच्छे दिन आनेवाले है म्हणून स्वप्न दाखवणार्‍या नेत्यांनीही अजून अच्छे दिन नेमके कोणासाठी याचा विचार स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे या आश्‍वासनाला बळी पडलेल्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालेली आहे.
  •      ज्या स्वातंत्र्यात आज आपण आहोत त्यासाठी असंख्य लोकांनी आपल्या आयुष्याचा होम केला. घरावर तुळशीपत्र ठेवले. ज्यांच्या सत्तेचा सूर्य मावळत नव्हता, अशा गोर्‍या इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य भारताच्या आकाशातून मावळला तो कायमचा. पण त्यानंतर जे सत्तेवर आले त्यांच्यामुळे पहिले गोरे बरे होते अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे. १९४७  पासून ६८ पैकी जवळपास ५५ वर्ष कॉंग्रेसने राज्य केेले. जनता पक्षाने २ वर्ष, जनता दलाने २ वर्ष, पुरोगामी लोकशाही आघाडीने दोन वर्ष आणि भाजपने सात वर्ष राज्य केले तरी परिस्थितीत काही बदल झाला नाही. त्यामुळे गोरे गेले आणि काळे आले अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न कसे साकारता येईल याविषयी लाल किल्ल्यावरून भारताचे विविध पंतप्रधानांनी स्वप्न दाखवले पण ते फक्त भाषणापुरतेच राहिले आहे. विकास हा मूठभर लोकांचा झाला. समाजात फार मोठी आर्थिक दरी निर्माण झालेली आहे. जवळपास डझनभर पंतप्रधान या देशाला भेटले पण आर्थिक विषमता कमी कोणी करू शकले नाही. 
  • या देशाची अर्थव्यवस्था ज्यांच्या हातात होती तो शेतकरी आज उजाड होताना दिसतो आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सातत्याने होत आहेत. सरकार बदलले तरी आत्महत्या थांबल्या नाहीत. तशीच वेळ आता कामगारांवर येताना दिसेल. आज असंघटीत क्षेत्रातील असुरक्षित कामगार हा अतिशय चिंताग्रस्त आहे. अत्यंत कमी पगारावर मालकांच्या मर्जीने आणि शोषणाने पिचला जात आहे. कोणताही कायदा शेतकरी आणि कामगारांना संरक्षण देण्यासाठी पुरेसा राहिलेला नाही. शेतकर्‍यांच्या जमिनी काढून घेवून भांडवलदारांच्या घशात घालणे म्हणजे विकास असे सरकारला वाटते आहे. कामगारांना कंत्राटी पद्धतीत आणि अपुर्‍या वेतनावर काम करायला भाग पाडणे हे सरकारचे धोरण राहिले आहे. त्यामुळे आर्थिक दरी ही वाढत चालली आहे.
  •   भारताला सर्व क्षेत्रात विकसित करण्याचे आव्हान भारतीय नेत्यांना पेलायचे होते. स्वातंत्र्याची चव काय असते हे भारतीय नागरिकांना अनुभवायचे होते. पण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत हे स्वप्न काही पूर्ण झालेले नाही. 
  • ज्या स्वातंत्र्यापूर्वी एका या देशातील नागरिक उद्याच्या उज्ज्वल भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वत:ला जबाबदार धरत होता. नेते आणि जनता यांचा हेतू एकच होता. स्वतंत्र भारताचा सर्वांगीण विकास. परंतु आजपर्यंत तो होवू शकलेला नाही. सर्वांगिण विकास नाही तर मर्यादीत आणि मूठभरांचा विकास झाला. खादीतील नेते सूटाबूटात आले. धोतरातील नेते लॅपटॉप घेवू लागले. बसने फिरणारे आणि ज्यांच्यासाठी बसमधील ५ क्रमांकाची जागा राखीव असते ते आमदार खासदार अलिशान एसी कारने फिरू लागले. पण शेतकरी मात्र कळकट मळकट कपड्यातच राहिला. आढ्याकडे पाहून जगणेच त्याच्या नशिबी आले. कामगारांची अवस्था तर किडामुंगीसारखी लाचार झाली. श्रमाला प्रतिष्ठा मिळेनाशी झाली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटून भांडवलदारांच्या गुलामगिरीत कर्मचारीवर्ग अडकला. त्याचे शोषण होवू लागले.
  •      स्वातंत्र्य नावाची वस्तू कशी वापरावी हे समजण्यासाठी सुद्धा आपल्याला समजले नाही. त्या स्वातंत्र्याचा उपयोग सामान्यांना जगणे सहज व्हावे यासाठी असला पाहिजे यासाठी राहिला नाही. तर बळी तो कान पिळी अशी अवस्था आज आहे.
  •    ते गोरे परवडले, हे तर त्यांच्याहून निपत्तर निघाले ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया आहे जुन्या पिढीच्या लोकांची आजच्या सात्ताधीशांबद्दलची. ग्रामपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट मंत्रालयापर्यंतचे अनेकांचे अनुभव आहेत. दिल्या घेतल्याशिवाय काम होत नाही. कागद पुढे सरकत नाही. जे काम करण्यासाठी सरकार पगार देते ते लाभार्थीचे काम वेगळे पैसे घेऊन करण्याची पाशवी चटक आली कुठून? कुठल्या स्वातंत्र्यात आहोत आपण ?    ज्या सत्तेत शेतकरी सुरक्षित नाहीत. आत्महत्येशिवाय ज्याला पर्याय दिसत नाही अन् महिलाही सुरक्षित नाही. सहकाराचा स्वाहाकार होतो, शिक्षणाचा बाजार होतो, रुग्णालये वाढतात पण रुग्ण कमी होत नाहीत. ज्या सत्तेत व्यवस्थेचेच दुसरे नाव अव्यवस्था आहे. पोलिस हा जनतेचा खरे तर मित्र आहे, पण गोर-गरिबांना, मध्यमवर्गीय साध्यासुध्या माणसांना, सज्जनांना पोलिसांचीच भीती वाटावी. जिथे प्रामाणिकपणा हीच उपेक्षित होण्याची, छळले जाण्याची गुणवत्ता असते. भ्रष्टाचार हाच जिथे शिष्टाचार असावा. याला आपण स्वातंत्र्य कसे काय म्हणायचे?

No comments: