- सध्या वाढलेल्या महागाईबद्दल कोणीच का तक्रार करत नाही असा प्रश्न पडतो आहे. भाजी पाला, कांदा बटाटा आणि जीवनावश्यक वस्तुंचे भाव इतके वाढले आहेत की त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही हे पंधरावे आश्चर्य म्हणावे लागेल. कांदा ८० रूपये किलो तर कोणतीही भाजी शंभर रूपयांच्या घरातच आहे. त्यामुळे सामान्य माणसांचे जीवन प्रचंड महाग झाले आहे. परंतु या महागाईबाबत प्रसारमाध्यमे, राजकीय पक्ष अजिबात आवाज उठवण्यास तयार नाहीत. भारतीय जनता पक्ष सत्तेत नसताना कधीतरी महागाई विरोधात बोलायचा. २०१० मध्ये सर्वात प्रथम दरवाढ, महागाई, इंधन दरवाढ याविरोधात भाजप आणि सर्व डावे उजवे पक्ष कॉंग्रेस सरकार विरोधात एकत्र येवून बंद केला होता. मात्र आता भाजपच सत्तेत आल्यानंतर या महागाईकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. कॉंग्रेस निष्क्रिय आणि निष्प्रभ झाल्यामुळे महागाईपेक्षा त्यांची नजर भाजप नेते कुठल्या प्रकरणात अडकत आहेत काय याकडे वेध लावून बसले आहेत. त्यामुळे विरोधकाची प्रखर भूमिका घेवून विरोधकांचे काम नेमके काय असले पाहिजे याचा विसर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांना पडला आहे. त्यामुळे सामान्य जनता न घर का ना घाट का अशी झाली आहे. भडकलेल्या महागाई विरुद्ध कोणताही राजकीय पक्ष आवाज उठवायला तयार नाही.
- एक काळ असा होता महागाई विरोधात मोर्चे निघायचे. घंटानाद व्हायचे. थाळीमोर्चे निघायचे. प्रसारमाध्यमे तुटून पडायची. आज कामगार संघटनाही बोलत नाहीत. गृहिणींचे मोर्चे निघत नाहीत. महागाई विरोधात हातात लाटणं घेवून रस्त्यावर उतरणार्या रणरागिणी मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर आज नाहीत. त्यांचे वारसदार निर्माण व्हावेत असे कोणत्याही महिला संघटनांना, महिला नेतृत्त्वाला वाटले नाही. मृणालताई गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांच्या महागाईविरोधी महिला संघटना ४५ वर्षापूर्वी रुपया, दोन रुपयांनी महागाई वाढली तर थाळया वाजवत होत्या. आता या थाळ्या बंद झाल्या आहेत. १९७० च्या दशकात तेलाचे घाऊक व्यापारी सेठ किलाचंद यांना तेलाचे भाव पाच रुपये वरून सात रुपये किलो केल्यावर त्यांना सहा तास घेराव घालून मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर आदी महिलांनी कोंडून ठेवले होते. आज असे रस्त्यावर उतरणाने नेतृत्व नसल्यामुळे आहे ती परिस्थिती सामान्यांना स्विकारावी लागते आहे. सगळेजण जणू आपलेच दात आपलेच ओठ म्हणून गप्प बसत आहेत. कारण अच्छे दिन येतील या भ्रमात आपण दीड वर्षांपूर्वी राहिलो पण ते दिवस अजून दिसत नाहती.
- समाजात जेव्हा नेतृत्व बधिर होते, तेव्हा सामान्य माणसाने कुणाकडे बघायचे, असा प्रश्न निर्माण होतो.आज गरज आहे ती सामान्य माणसाची खदखद बाहेर पडण्याची. पण ही खदखद बाहेर पडणार कशी? आज सामान्य माणसे सगळया बाजूने हैराण आहेत. कॉंग्रेसच्या राजवटीत महागाईने जीवन अशक्य झाल्याचा प्रचार जोरात झाला. त्यामुळे सामान्य माणसांना असे वाटत होते की, एक प्रयोग करून पाहू या, एक संधी देवून पाहूया.अच्छे दिनची घोषणा मोदींनी केली होती. कॉंग्रेसचे दिवस चांगले नाहीत, आम्ही अच्छे दिन घेवून येवू असा विश्वास मोदींनी दिला होता. त्यामुळे लोकांच्या मनातील महागाईबद्दलच्या अस्वस्थतेचा विषय नेमका हेरून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात महागाई विषयावर रान पेटवले आणि कॉंग्रेस विरोधातील फलक झळकले. मोठया आशेने आणि अपेक्षेने लोकांनी मोदींना मतदान केले. त्यामुळे सामान्य माणूस आज महागाई झाली तरी मूग गिळून गप्प बसला आहे.
- या सरकारकडून सामान्य माणसांची किमान एवढीच अपेक्षा होती की, मोदी सत्तेवर आल्यानंतर निश्चित दिवस बदलतील. ही सामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखून ‘अच्छे दिन’चा नारा दिला गेला. त्यामुळे जनता अधिक हुरळून गेली. पण सत्ता आली आणि शिखरावर गेलेल्या अपेक्षांचा चक्काचूर व्हायला सुरुवात झाली. आता या महागाई विरुद्धचा संताप व्यक्त करायला सामान्य माणसानेच सुरुवात केलेली आहे. आपली कुजबुज आता सामान्य माणूस सुरू करतो आहे. कारण जीवन जगणे अशक्य झालेली ही माणसे आहेत. या कुजबुजीतून भविष्यात आणि लवकरात लवकर आंदोलन उभे राहण्याची प्रतिक्षा आहे. आज ज्या शेतकर्याने या देशाला समृद्ध केले, त्या शेतकर्याला आत्महत्या करावी लागत आहे. शेतकर्यांच्या आत्महत्यांबाबत, महागाई बाबत हे सरकार काहीच बोलत नाही. उलट पेट्रोल दीड दोन रूपयांनी स्वस्त झाले फसवी फुंकर मारण्याचा प्रकार होत आहे. पण या दीड दोन रूपये स्वस्त पेट्रोलचा सामान्यांना काहीही फायदा नाही. कांदाच जिथे ८० रूपये किलो झाला आहे, भाजीपाला शंभरच्या घरात आहे त्यापेक्षा पेट्रोलचा दर कमी असणे म्हणजे फार मोठी विसंगती आहे. सामान्य माणसाने पेट्रोल प्यायचे काय? सामान्य माणूस आज महागाईत भरडला जातो आहे. तो ज्या दिवशी संतप्त होऊन रस्त्यावर उतरेल, त्या दिवशी या सरकारचे दिवस भरलेले असतील. डाळींचे भाव, कांद्याचे भाव आणि महागाईने या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. वीस वर्षांपूर्वी दिल्लीत भाजपची सत्ता होती. ेतेव्हा सूषमा स्वराज यांना कांदे महागले या कारणाने सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर दिल्लीकरांनी ३ निवडणुकीत भाजपला जवळ केले नाही. पंधरा वर्षांच्या वनवासानंतर आम आदमीला सत्तेवर पोहोचवले. त्यामुळे पहिले वर्ष कौतुकात गेल्यावर आता अच्छे दिनसाठी या सरकारने प्रयत्न केले नाहीत तर पुन्हा या भाजपला वनवास सोसावा लागेल हे भाजप नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे विरोधक असलेल्या कॉंग्रेसने रस्त्यावर उतरून हा संताप कॅच केला नाही तर तिसरी शक्ती निर्माण होयास वेळ लागणार नाही.
Thursday, August 20, 2015
महागाईकडे सरकारचे दुर्लक्ष
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment