- नोव्हेंबर २०१४ मध्ये महाराष्ट्रात सत्तेचे सत्तांतर झाले पण परिस्थितीचे सत्तांतर झाले नाही. मराठवाड्यातील शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. गेल्या दोन वर्षात मराठवाडा दुष्काळ आणि अवकाळी पावसांच्या संकटात सापडत राहिला आहे. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची अवस्था तर फारच वाईट आहे.
- उस्मानाबाद जिल्ह्यात १९७२ पेक्षा भयंकर अशी दुष्काळाची गडद छाया पसरली आहे. शेतकरी आणि जनता हवालदिल झाली आहे. दुष्काळाबाबत शासन संवेदनशुन्य आहे. गेल्या वर्षी नव्याची नवलाई होती, सत्कारात आणि कौतुकात वेळ गेला पण आता तरी सरकारने लक्ष देणे गरजेचे होते. पण सरकार या गोष्टीला बेदखल करते आहे याचे सखेद आश्चर्य वाटते.
- याबाबतीत सत्तेत नसलेला छोटासा पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे कौतुक करावे लागेल. या भागातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या शिक्षणाबाबत शेकापक्षाने पुढाकार घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत या पक्षाने केलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक गावे दत्तक घेण्याचे कामही शेकापक्षाने केलेले आहे.
- पण सत्तेत असलेल्या आणि सत्तेसाठी आसुसलेल्या कोणाही पक्षाला शेकापक्षाचे अनुकरण करावे असे वाटले नाही. उलट या प्रश्नाचे राजकारण करण्यासाठी सगळेजण धन्यता मानत आहेत. मुख्यमंत्र्यांना औरंगाबादेत संघाच्या बैठकीला येण्यास वेळ मिळतो,परंतु उस्मानाबादसह मराठवाड्यातील दुष्काळी जिल्ह्यास भेट देण्यास वेळ मिळत नाही याबाबत प्रचंड नाराजी आहे.
- उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून सातत्याने पर्जन्यमान कमी होत आले आहे. गेल्या चार वर्षात खरीपाचे पिक शेतकर्यांच्या हाती लागलेले नाही. शेवटी- शेवटी पाऊस झाला तर रब्बी पिके बर्यापैकी आली. पण नंतर झालेल्या गारपीटीमुळं होत्याचे नव्हते झाले. गेल्या काही वर्षापासून पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४९ मध्यम प्रकल्प आणि १०८ लघु पाटबंधारे तलाव कोरडे पडले आहेत.
- यावर्षी तरी समाधानकारक पाऊस पडेल आणि सर्व काही अबादी अबाद होईल, हे स्वप्नही भंग पावत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पशुधन जगवावे कसे, या चिंतेत सर्वजण पडलेले आहेत. जिथे माणसाला पिण्यास पाणी मिळत नाही, तिथं जनावरास आणायचे कोठून हा प्रश्न सतावत आहे. जनावरांचे कळपच्या कळप खाटीकखान्याकडं जाताना दिसत आहे. कृषीधन, पशुधनाचा प्रश्न निर्माण झालेला असताना शेकापक्षाची मदत हा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे असे तेथील शेतकर्यांना वाटत आहे.
- यावर्षी जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लगेच पाऊस सुरू झाला. त्या पावसामुळे शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. या काळ्या आईची ओटी भरली. परंतु नंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची उगवण झाली नाही. जिथं उगवण झाली तिथं नंतर पाऊसच न झाल्यामुळं शेतं करपली आहेत. सततच्या दुष्काळामुळं शेतकरी पार कोडमोडला आहे. बँका कर्ज देत नाहीत आणि सावकार घरचा उंबरठा चढू देत नाही,त्यामुळं शेतकर्यांची अवस्था आई जेवू देईना आणि बाप भिक मागू देईना अशी झाली आहे.
- सततच्या नापिकीमुळं उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्त्येचे सत्र सुरूच आहे. गेल्या ५ महिन्यात १०० हून अधिक शेतकर्यांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत.आत्महत्त्या करू नका,असे वारंवार सांगूनही हताश झालेल्या शेतकर्यांना आत्महत्येशिवाय दुसरा मार्गच सापडत नाही.
- पुर्वीच्या आघाडी सरकारला शेतकर्यांच्या आत्महत्त्येबाबत धारेवर धरणार्या भाजप आणि शिवसेना युती सरकारला शेतकर्यांच्या आत्महत्त्या थांबविण्यात यश आलेले नाही. सरकार कोणचेही असो, शेतकर्यांच्या आत्महत्त्या कोणही थांबवू शकत नाही. याला कारण निसर्ग आहे. निसर्गानेच साथ नाही दिली बळीराजा तर काय करणार? राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर न्याय कोणाकडं मागायचा अशी जुनी म्हण होती.
- शहरातील लोकांना शेतीचं गणित कसे असते हे कधीच समजणार नाही. जेव्हा कांदा १० रूपये किलो होतो, मेथीची गड्डी दहा रूपयाला चार मिळतात तेव्हा कसे पडवडत असेल, असा कधीच विचार मनात येत नाही. जेव्हा पिकते तेव्हा विकत नाही आणि जेव्हा पिकत नाही तेव्हा भाव वाढलेला असतो. यात गबर होतो तो दलाल. दलालच यात मालामाल होतात. जोपर्यंत शेतकर्यांचा थेट संबंध विक्रेत्यापर्यंत येत नाही,तोपर्यंत असे चढ उतार रहाणार. त्यामुळे कांदा महागला याचा दोष शेतकर्याचा नाही किंवा त्याच्या हातात काहीच जात नाही. या दलालांनी सगळी अर्थव्यवस्था दाबून ठेवली आहे.
- शासनाचे कृषी विषयक धोरणच चुकीचे आहे. बी -बियाणे आणि खताचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. कृषी पंपाचे विज बिल वाढलेले आहे. पाणलोट विकासाची कामे सध्या जशी सुरू आहेत,ते पुर्वीपासून झाली असती तर आज जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यात थोडा फार दिलासा मिळाला असता. तहान लागली की विहिर खंदण्याची शासनाची सवय आहे. आता दुष्काळाच्या निमित्ताने गावागावात पाणलोट विकासाची कामे व्हायला हवी,नाही तर उस्मानाबादचे वाळंवट होण्यास वेळ लागणार नाही.
- केंद्रात भाजपाचे सरकार आहे. परदेश दौर्यात वेळ घालवणार्या मोंदींनी आता महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत पॅकेज जाहीर करून वारंवार आढावा घ्यावा. तरच मराठवाड्यातील जनतेला दिलासा मिळेल. आता डोळे परतीच्या पावसावर लागले आहेत पण तेवढ्याने काही होईल असे नाही.
Wednesday, August 26, 2015
मराठवाड्यातील दुष्काळी संकट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment