सौ देविबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव, नंदकुमार कन्स्ट्रक्शन आणि छाबडा उद्योग समुहाचे संचालक श्री सहजराम उर्फ महेश छाबडा यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मानवसेवा फौंडेशनच्यावतीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. त्यानिमित्त श्री महेश उर्फ सहजराम छाबडा यांच्यावरील हा गौरवपर लेख. कोणत्याही परिस्थितीत मनाचा समतोलपणा ढळू द्यायचा नाही आणि शांतपणा सोडायचा नाही हे एखाद्या तपस्व्यालाच जमू शकते. तो शांतपणा पहायला मिळतो तो महेश छाबडा यांच्यात. म्हणूनच त्यांना हे कसे साध्य होते याचे आकर्षण कोणालाही वाटल्याशिवाय रहात नाही. आपल्या आयुष्यात महेश छाबडा यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत, संकटे, अडचणींना तोंड दिले आहे. पण या परिस्थितीतही शांत मनाने राहणे हे अत्यंत अवघड असलेले काम त्यांनी करून दाखवले आहे. शांतपणाने सर्व काही साध्य करता येते हे महेश छाबडा यांचे यशाचे गमक आहे. कठीण परिस्थितीत जो स्वत:ला सांभाळू शकतो तोच जीवनात यशस्वी होवू शकतो. मोठमोठ्या पर्वतांना आपल्याकडे स्थितप्रज्ञपणाचे लक्षण मानले जाते. याचे कारण पर्वत हे उन, पाउस आणि कोणत्याही परिस्थितीत स्थिर असतात. तो स्थिरपणा म्हणजे स्थितप्रज्ञता म्हटले आहे. भगवतगीतेत किंवा ज्ञानेश्वरीत माणसाला स्थितप्रज्ञता लाभली पाहिजे, माणसाने स्थितप्रज्ञ असले पाहिजे अशी शिकवण दिली आहे. कारण स्थितप्रज्ञ माणूस हाच खर्या अर्थाने संकटावर मात करू शकतो. संकटातून मार्ग काढू शकतो. ही दृष्टी साध्य केली आहे ती महेश छाबडा यांनी. त्यामुळे महेश छाबडा हे एक अदभूत रसायन आहेत. या शांत मनाच्या आणि स्थिर वृत्तीच्या जोरावर शासन प्रशासनालाही महेश छाबडा यांच्यापुढे अनेकवेळा नमते घ्यावे लागले आहे. शासकीय पातळीवर चालणारा कारभार, अव्यवस्था, निराशा, बेशिस्त याबाबत महेश छाबडा यांना कमालीची चीड आहे. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण चिडून चालणार नाही, तर काहीतरी उपाय केला पाहिजे. नेमके दुखणे कुठे आहे हे पाहिले पाहिजे. ते नेमके दुखणे शोधून काढून त्याच्या मुळाला हात घालण्याची क्षमता महेश छाबडा यांच्याकडे आहे. याचे कारण ते अत्यंत शांत मनाने कोणताही निर्णय घेवू शकतात. शांत आणि विचारी मनाने घेतलेला निर्णय कधीच चुकत नाही. नंदकुमार कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अनेक सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्ट अधिकारी महेश छाबडा यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहेत. किंबहुना भ्रष्टाचाराचे आगार म्हणून किंवा भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून वावरणार्या शासकीय अधिकार्यांच्या निष्क्रियपणाचा त्यांना प्रचंड संताप आहे. पण हा संताप कायद्याच्या चौकटीत राहून व्यक्त करायचा आणि प्रत्येकाला धडा शिकवायचा आणि योग्य मार्गावर आणायचे काम महेश छाबडा करतात. हे करत असताना कधीही कोणाच्याबद्दल सूड भावना, द्वेष, मत्सर त्यांच्या मनात नसतो. तो धडा शिकवून झाल्यावर त्याच अधिकार्यांशी काहीही घडले नाही इतक्या प्रेमळ वृत्तीने बोलण्याची धमक आणि मनाचा मोठेपणा महेश छाबडांकडे आहे. हा गुण फार महत्वाचा आहे. हा गुण माणसाला आत्मसात करणे केवळ अशक्य आहे. पण त्यासाठी थोडीफार अध्यात्मिक बैठक असावी लागते. ती बैठक त्यांच्यात आहे. महेश छाबडा हे कधीही भक्तीचे अवडंबर माजवणारे नाहीत. पण मुखात सतत भगवंताचे नामस्मरण करत असतात. नामस्मरणाने मनाची मलिनता नष्ट होते. त्यातून मनाला शांतपणा लाभतो, चित्तवृत्ती स्थिर होतात यावर त्यांचा विश्वास आहे. भुकेलेल्या व्यक्तिची भूक भागवणे, मग ती भूक कोणतीही असली तरी ती भागवली पाहिजे, तेच खरे पुण्यकर्म आहे हा त्यांचा साधा सरळ सोपा विचार आहे. पण या साधेपणातच महानता आहे. यामुळेच महेश छाबडा हे एक अदभूत रसायन आहेत असे वाटते. सागराचा किंवा समुद्राचा कधी थांग लागत नाही. तो अमर्याद असतो. सर्वांना पोटामध्ये घेण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे पोटात काहीही वाईट ठेवायचे नाही तर चांगली चांगली रत्ने देण्याचे काम सागर करतो. नेमके तेच काम हे महेश सर करतात. त्यामुळे त्यांचे मनही सागराप्रमाणे अथांग असे आहे. या अथांग मनाच्या महेश सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा.
Sunday, January 31, 2016
महेश छाबडा ... एक अदभूत रसायन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment