Sunday, January 31, 2016

सर्व काही कायद्याप्रमाणेच

  • एखादा शिक्षा भोगत असलेला कैदी मुदतीपूर्वी तुरूंगातून सुटला की सगळ्यांच्या भुवया वर होतात. हा कैदी इतक्या लवकर सुटला कसा काय? विशेषत: बलात्काराची घटना घडल्यानंतर अवघ्या तीन वर्षांच्या आत तो अल्पवयीन कैदी सुटण्याची तयारी झाली होती. त्याचप्रमाणे अनेकांची शिक्षा माफ होते. याबाबत सामान्य माणसांना एक प्रकारचा तिरस्कार वाटत असतो. इतके गुन्हे करून हे लोक सुटतात कसे हा सामान्यांना पडणारा प्रश्‍न असतो. सध्या संजय दत्तला चांगल्या वर्तनामुळे शिक्षेत सूट देण्यात येत आहे. सर्वांना वाटते आहे की तो अभिनेता आहे म्हणून त्याला फायदा मिळतो आहे. पण प्रत्यक्षात तसे नसते.
  •    देशाची घटना तयार होवून, घटनेचे राज्य येवून सहा दशके उलटली तरी अनेकांना अजून कायदा, संविधान,घटना याचे पुरेसे ज्ञान नाही. या देशातील प्रत्येक कायदा हा सर्वांना माहित असणे अभिप्रेत आहे. पण आपल्याकडे कायदा हा फक्त वकिलांनीच अभ्यासाची गोष्ट आहे असा समज असतो. म्हणूनच तुरूंगात गर्दी होते.
  •   अनेकवेळा चांगले वर्तन केल्यामुळे कैद्यांची शिक्षा कमी होते. हे तुरुंगात चांगले वर्तन म्हणजे काय असते असा अनेकांना प्रश्‍न पडतो. पॅरोल म्हणजे नेमके काय याची अनेकांना माहिती नसते. फक्त बातम्यांमध्ये हे शब्द लोकांपर्यंत पोहोचतात. अनेक कथा चित्रपटातूनही एखादा नायक तुरूंगातून चांगल्या वर्तनामुळे सुटला असे दाखवले जाते. त्यासाठी कायद्यातील या गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे.
  •  अर्थात याची कायद्यात वेगवेगळी व्याख्या आहे. वेगवेगळे नियम आहेत.
  • तुरुंग कायद्यात चांगल्या वर्तनावर सूट मिळण्याची तरतूद आहे. तुरुंगात जो कोणी चांगले काम करतो त्याला सूट देण्यात येते. यात वित्तीय सवलतीचाही समावेश आहे. अशा प्रकारे दर महिन्याला पाच दिवसांपर्यंत सूट मिळवता येते.     आरोपी किंव्हा गुन्हेगार जेव्हा प्रसिद्धी वलयातील, सेलिब्रेटी, श्रीमंत असतो तेव्हा त्याच्याबाबत माणसांना फार उत्सुकता असते. किंवा एखादी प्रतिमा निर्माण केलेला परंतु नंतर गुन्हेगार, आरोपी ठरलेला माणूस असेल तर त्याच्याबाबत जास्त जिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. लाखो कोट्यावधी लोक ज्यांच्या मागे धावतात त्या आदर्शाकडून जेव्हा काही दुर्गुण घडतात तेव्हा त्या प्रमाणात मोठ्या शिक्षेची अपेक्षा होते. त्यामुळेच आसाराम बापू, सलमान खान, संजय दत्त यांच्याकडून असा काही अपराध घडला की लगेच जनमानसात संतापाची लाट निर्माण होते.
  •   पण संजय दत्तच्या घटनेमुळे या प्रकाराला अधिक प्रसिद्धी मिळाली. म्हणून नेमके तत्थ्य समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे तुरुंगात जो आर्थिक कार्य करतो तेव्हा त्याला सूट दिली जाते. विकास यादवनेही तुरुंगात असताना तेथील उद्योगाचे व्यवस्थापन केले होते. यासाठी यादवला सवलत मिळाली होती. या सवलतीची तरतूद तुरुंगाच्या नियमावलीत असते. त्या नियमानुसार संजय दत्तला सवलत मिळाली आहे.
  •      तुरुंगातील चांगले वर्तन म्हणजे काय याची अनेक राज्यांत तुरुंगांची नियमावली असते. बहुतांश बाबी यात एकसारख्या असतात. फक्त दिल्ली तुरुंगाच्या नियमावलीमध्ये तुरुंगातील गुन्ह्यांची यादी दिलेली आहे. ते करणे म्हणजे चांगले वर्तन असे म्हटले जाते. त्याप्रमाणे संजय दत्तकडून वर्तन घडले आहे हे समजणे गरजेचे आहे.
  •     संजय दत्त, सलमान खान यांच्यासारखे लोक सुटले की लगेच निकालावर सामान्यांच्या टिका येतात. कायद्यावरचा विश्‍वास उडाल्याची भावना सोशल मिडीयावरून व्यक्त होते. पण अशी कायद्याची अवहेलना करू नये.
  • तुरुंगाधिकारी कैद्यास अधीक्षकाकडे शिक्षेत सूट देण्यास लिहू शकतो.  सवलतीबरोबरच काही गैरवर्तन केल्यास सूट कमी करण्याचीही तरतूद आहे. जर कैद्याने तुरुंगातील अधिकार्‍यावर हल्ला केला किंवा गैरवर्तन केले तर सूट रद्दही करता येते.  या सर्व नियमांप्रमाणेच संजय दत्तची १०५ दिवस आधीच सुटका होत आहे. तुरुंग प्रशासनानेच संजय दत्तला सोडण्याचा प्रस्ताव दिला.
  • कोणत्याही कैद्याला ११४ दिवस आधी काही नियमांचे पालन करावे लागते. यामुळे त्याला विशेष असे काही दिले जात नाही. तुरुंग कायद्यात पॅरोलवर सूट मिळण्याचाही नियम आहे. तुरुंगात बंद असलेल्या कैद्याला वर्षातून दोन वेळा पॅरोल मिळतो. त्याला आपल्या कुटुंबीयांच्या समारंभात, दु:खाच्या, सुखाच्या प्रसंगी सहभागी होण्याची परवानगी दिली जाते. पॅरोल दोन प्रकारचे असतात. रेग्युलर पॅरोल आणि कस्टडी पॅरोल. रेग्युलर पॅरोलमध्ये सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्या नियमांनुसारच संजय दत्त अधून मधून येत होता जात होता. फेसबुक, सोशल मिडीयावरून त्याबाबत वेगळ्या भावना उमटत होत्या. बायकोच्या आजारपणामुळे त्याला सुट्टी, रजा मिळाली वगैरे. पण कायद्यातील तरतुदीमुळेच तो बाहेर येत जात होता.

No comments: