- पठाणकोटच्या हल्ल्याशी पंतप्रधान मोदींची लाहोर भेट जोडून अनेक प्रतिक्रिया आलेल्या होत्या. प्रामुख्याने कॉग्रेस त्यासाठी आघाडीवर होती. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तर नेहमीप्रमाणे आपल्या अकलेचे तारे तोडण्याची संधी साधली. भाजपाचे सरकार सत्तेत असते, तेव्हाच असे जिहादी दहशतवादी सोकावतात, इथपर्यंत त्यांनी मजल मारली. वाजपेयी सत्तेत असताना अझर मसूदला तुरूंगातून सुखरूप उचलून कंदाहारला सोडण्यात आल्याचा संदर्भ शिंदे यांनी दिला. त्याच्याशी मग मोदींच्या लाहोर भेटीचा प्रसंग जोडला होता. यातून काय सिद्ध करायचे होते सुशीलकुमार शिंदे यांना? पण शरणागतीचे राजकारण करून भारताला दुबळा चेहरा देणार्या मुफ्ती महंमद सैद यांच्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक होते आहे त्याचे काय?
- पुरोगामी म्हणून पत्रकारीता करणारे अनेक बगळे, सुमार केतकर आणि त्यांच्या पंथातले अनेक पत्रकारही कंदाहारचे स्मरण अगत्याने करून देतात. पठाणकोट हल्ल्यानंतर विविध वाहिन्यांवर या पत्रपंडितांनी अक्कल पाजळली होती. पण त्यापैकी एकानेही मुफ्ती महंमद सैद यांचा संदर्भ का दिला नव्हता? भारतातील जिहादी घातपाताचा आरंभ जणू कंदाहारच्या विमान अपहरणापासून सुरू झाला, असेच हे पत्रपंडीत भासवत असले तरी ते सत्य नाही. असेे करताना आपण मुफ़्ती महंमद सईद यांचे एक कर्तृत्व झाकतोय, याचे त्यापैकी कोणाला भान नसते.
- आज त्यांच्या निधनांतरही बहुतेकांना मुफ़्तींच्या त्याच ऐतिहासिक कामगिरीचे विस्मरण झालेले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे कौतुक आता आठवडाभर चालेल. तसेच त्यांच्या वारस कन्येचाही उदो उदो सुरू होईल. पण मुफ़्तींमुळेच जिहाद समोरील भारताच्या शरणागतीचा इतिहास सुरू झाला हे लक्षात घेतले पाहिजे. मुफ़्तींना तीन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी घाकटी कन्या डॉ. रुबाया यांच्या अपहरणाने भारताच्या शरणागतीचा इतिहास सुरू झालेला होता. १९८९ सालात राजीव गांधींचा पराभव झाला. भाजपा व मार्क्सवाद्यांची डावी आघाडी यांच्या पाठींब्यावर जनता दलाचे व्ही. पी. सिंग सरकार सत्तेत आले. त्यात मुफ़्ती महंमद सईद यांची देशाचे गृहमंत्री म्हणून नेमणूक झालेली होती. मुफ़्ती यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यापासून अवघ्या सहा दिवसात श्रीनगर येथून त्यांची कन्या रुबाया हिचे अपहरण झाले. तेव्हा भारत सोडा, काश्मिरमध्येही कुठे घातपात वा हिंसाचाराची घटना घडत नसे. जिहाद, घातपात वा पाकिस्तानचा झेंडा फ़डकवण्याची कुणाला हिंमत नव्हती, असा तो कालखंड होता. अशावेळी मुफ़्ती या काश्मिरी नेत्याच्या हाती देशाची अंतर्गत सुरक्षा गेली आणि त्याच्याच मुलीचे अपहरण झाले. त्याच्या बदल्यात तुरूंगात खितपत पडलेल्या पाकधार्जिण्या पाच घातपात्यांच्या मुक्ततेची अट घालण्यात आली. जम्मू काश्मिर लिबरेशन फ़्रंट या संघटनेने तो उद्योग केला होता. तेव्हा त्या संघटनेला भारतात बंदी होती आणि त्याचा नेता परदेशी आश्रय घेऊन जगत होता. तेव्हा देशाची सुरक्षा गुंडाळून मुफ़्तींनी ती मागणी पुर्ण केली आणि तिथून मग जिहादींपुढे शरणगत होण्याचा दिर्घकालीन इतिहास सुरू झाला.
- आपल्या मुलीला सुखरूप परत मिळवण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्याने जिहादी मागणीपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर एकामागून एक अशा घटना घडू लागल्या आणि क्रमाक्रमाने काश्मिरमध्ये पाकिस्तानातून जिहादी हल्लेखोर येण्याचा सिलसिला सुरू झाला. जिहाद वा घातपात यांच्याशी तितक्याच खंबीरपणे दोन हात करून आपण अधिक भेदक व प्रत्युत्तर देणारे आहोत, असेच दाखवावे लागते. तरच दहशतवादाचा सामना होऊ शकत असतो. आपल्या पोरांचे कुटुंबियांचे अपहरण झाले वा त्यांचा जीव धोक्यात असला, म्हणून देशाचा गृहमंत्री शरण जाणार असेल, तर पर्यायाने भारत सरकारच जिहादला शरण जात असते. म्हणजे महत्वाच्या व्यक्ती वा नातलगांचे अपहरण करा, त्यांना ओलिस ठेवा, म्हणजे सरकारला नाक मुठीत धरून शरण आणता येते.ही प्रथा ज्यांचा सध्या उदोउदो सुरू आहे त्या मुफ्ती महंमद सैद यांनी सुरू केली. ही मुफ़्ती महंमद सईद यांची खरी ओळख आहे.
- स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात त्यांचे स्थान शरणागतीचा नायक हीच आहे. गेल्या पंचवीस वर्षात त्यामुळेच देश दहशतवाद व जिहादच्या विळख्यात फ़सत गेला आहे. पण याला जबाबदार असलेल्या मुफ़्तींच्या या राजकीय देणगीचा उल्लेखही कोणी करीत नाही. कारण मुफ़्ती हे मुस्लिम नेता आहेत आणि त्यांच्या चुका वा गुन्ह्यावर पांघरूण घालण्याला आपल्या देशात पुरोगामीत्व मानले जाते.
- आज त्यांच्या निधनानंतर देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात काश्मिरला आणून सहभागी करण्यासाठी मुफ़्तींनी दिलेल्या योगदानाचे कोडकौतुक सुरू आहे. पण वास्तवात अजून तरी काश्मिर खरोखर भारताच्या मुख्यप्रवाहात सहभागी झालेला आहे काय? रुबायाच्या अपहरणापर्यंत काश्मिरात पंडीत गुण्यागोविंदाने नांदत होते आणि पुढल्या २५ वर्षात तिथून लक्षावधी हिंदूंना परागंदा व्हावे लागले. याला काश्मिर मुख्यप्रवाहात आणणे म्हणायचे काय? मेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये पण अशा व्यक्तीचे खोटेनाटे दिशाभूल करणारे कौतुक सुद्धा करू नये.
Wednesday, January 13, 2016
दहशतवादापुढे लोटांगण घालणारे सैद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment