कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी काहीही करत असतात. त्यांना फक्त प्रसिद्धीत रहायचे असते. त्यामुळे वरकरणी जरी आपण शरद पवारांचे एकनिष्ठ आहोत, अजितदादांचे जवळचे आहोत असे बोलत असले तरी शरद पवारांच्या विचारांनी ते चालतातच असे नाही. त्यामुळे सवंग लोकप्रियतेसाठी ते काहीही करू शकतात. पाकीस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आपण ठेवणार आहोत असे सांगून गेल्या दोन दिवसात त्यांनी उगाचच रान उठवलं आहे. त्यांच्या गळाला सापडल्यासारखे शिवसेनेचे मासे त्यावरून तडफडत आहेत. गुलाम अली चा कार्यक्रम होवू देणार नाही वगैरे वगैरे प्रतिक्रीया सोशल मिडीयावरून उठत आहेत. पण गुलाम अली भारतात येण्यास तयार आहेत काय हा खरा प्रश्न आहे. त्यांच्यापर्यंत जितेंद्र आव्हाड पोहोचले तरी आहेत काय? पण बाजारात तुरी चा प्रकार करून प्रसिद्धीत राहण्यासाठी आव्हाडांचे प्रयत्न चालू आहेत. ठाण्याचे सर्वात लढावू आमदार असे जीतेंद्र आव्हाड स्वत:ला म्हणवून घेतात. बाकी तसे त्यांना कोणी म्हणत नाहीत. पण त्यांनी जोमाने फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य हाती घेतल्याचे म्हटले आहे. म्हणूनच आव्हाडांच्या वर्तनावरून नजर मारावीच लागेल. कारण आता जितेंद्र आव्हाड यांनी आपले उदात्त कार्य पुढे घेऊन जाण्याचा नवा मार्ग शोधलेला असून त्यातही पुन्हा बाधा येण्याचा धोका आहे. सहाजिकच त्यापासून आव्हाडांना वाचवणे आणि सामाजिक प्रबोधनाच्या महान कार्याला चालना देण्याची जबाबदारी सरकार खेरीज कोण उचलू शकणार आहे? गुलाम अली येणार नाहीत हे माहित असूनही आपण कार्यक्रम ठेवणार असा साप सोडून विरोधकांना भुई धोपटण्याची संधी देवून आपले महानपण सिद्ध करण्याचे काम आव्हाड करत आहेत. अर्थात ही आव्हाडांची तशी जुनीच सवय आहे. मिडीयाचे लक्ष आपल्याकडे असले पाहिजे. आपण चर्चेत राहिले पाहिजे एवढीच त्यांची अपेक्षा असते. मिडीया आणि विरोधक त्यांच्या या जाळ्यात बरोबर फसतात. जितेंद्र आव्हाडांचे म्हणणे आहे की पाकीस्तानी गायक खूप महान आहेत. अर्थात पाकीस्तानशी किंवा गुलाम अलींशी आव्हाडांना काही देणेघेणे नाही. फक्त मुंब्रा आपल्या ताब्यात राहिला पाहिजे. नाहीतरी मुंब्रा म्हणजे मिनी पाकीस्तानच आहे. त्यामुळे आव्हाडांना पाकीस्तानी कलाकार, गायक हे सगळेच धर्मनिरपेक्ष वाटतात. त्यांच्या नजरेतून पाकिस्तानी गायकांच्या व कलावंतांच्या प्रबोधनकार्यामुळे त्या देशात व आसपासच्या प्रदेशात इतकी शांतता व प्रगल्भता आलेली आहे, की हजारोच्या संख्येने लोकांना जगण्याची इच्छाही उरलेली नाही. म्हणून लोक मोक्षाप्रत जात आहेत. अनेकांना स्वर्गप्राप्ती झाल्याचेही कानी येते. इतका महान सुधारक भारतात आला तर आपोआप वैचारिक प्रबोधन व सामाजिक उत्थानाला वेग येणार. त्यासाठी जीतेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला आहे. या देशातील धर्मनिरपेक्षता, पुरोगामीत्व हे केवळ पाकीस्तानी गायकांना मुंबईत बोलवूनच शाबूत राहिल असे आव्हाडांना वाटते. म्हणून त्यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी एक फुसकुली सोडली आहे की गुलाम अली यांना ठाण्यात बोलावणार. शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना असे गणित असताना या ठाण्यात गुलाम अली येणार? पाकीस्तानी गायक येणार? मोठाच गजहब होणार यावरून. त्यामुळे ही आयडीयाची कल्पना आव्हाडांनी लढवली आणि आपल्या हातातील निवडक पत्रकारांना हाताशी धरून बातमी सोडून दिली. म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने ज्याला विरोध केला, त्यालाच प्रबोधन म्हणण्याचे काम आव्हाड करणार आहेत. केवढा उदात्त विचार हा. आव्हाडांच्या या विचाराची आजच्या जगातील अनेक अडाण्यांना कल्पना नाही. म्हणून आपण आव्हाडांचे हात मजबूत करणे आवश्यक नाही काय? ठाण्यात असे म्हणतात की आव्हाडांचे हात मजबूत केले, म्हणजे सिमेंटच्या इमारतीही कच्च्या व दुर्बळ होऊन जातात. नुसत्या आव्हाडाच्या गर्जनेनेच या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागतात. तिथले बिल्डरही आव्हाडांच्या आशीर्वादाने इमारती उभ्या करतात. अन्यथा नुसत्या आवाजानेही जमिनदोस्त होण्याचा धोका असतो. अशा दांडग्या पाठीराख्याच्या मदतीने आपण महाराष्ट्राला पुरोगामीत्व बहाल करीत असताना त्यात बाधा आणली जाऊ नये, अशी अपेक्षा बाळगणे चुक आहे काय? उंच उंच दहीहंड्या बांधण्याचा आव्हाडांचा मनसुबा राज्य सरकारने दुष्काळाचे सावट आणुन अपयशी केला होता. बहुधा आता राज्यातला दुष्काळ संपलेला असावा. म्हणूनच आव्हाडांनी पुन्हा आपली मुलूखगिरी सुरू केली आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानातून क्रांतीकारी तालिबानी सुधारकांना आमंत्रित केले आहे. गुलाम अली यांच्या गायनाने आता फ़ुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना चालना दिली जाणार आहे. त्यांच्या गजलांनी पाकिस्तान इतका पुरोगामी झाला, की तिथे म्हणे हिंदू दहशतवादाचे नामोनिशाणच शिल्लक उरलेले नाही. ते शिल्लक राहू नये किंवा तो धोकाही भविष्यात संभवू नये, म्हणून हिंदुंचेच निर्मूलन पाकिस्तानातून करण्यात आले. त्यामुळे त्यांचे अनुकरण भारताने करावे असे आव्हाडांना वाटते काय? पण गुलाम आली ठाण्यात येणे कदापि शक्य नसूनही त्यांच्या नावाची चर्चा करवून आव्हाडांनी केलेली नौटंकी ही फारच मजेशीर आहे.
Saturday, January 23, 2016
आव्हाडांची नौटंकी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment