Wednesday, July 15, 2026

संत कान्होपात्रा यांची आळवणी


नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा जावो पाहातां पाहातां।। असे संत कान्होपात्रा आपल्या अभंगात म्हणतात. हे विठ्ठला, आता माझा अंत पाहू नकोस. माझे प्राण गेले तरी चालतील, पण ते तुझे रूप डोळ्यात साठवूनच जावेत. केवढी ही आर्तता आहे, विठ्ठलभेटीची ओढ आहे. संत कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील एक अत्यंत आदरणीय आणि महत्त्वाच्या संत-कवयित्री आहेत. त्यांचे जीवन, भक्ती आणि विचार आजही लाखो भाविकांना प्रेरित करतात. संत कान्होपात्रा यांची भक्ती ही अनन्यभक्ती (संपूर्ण आत्मसमर्पण) या प्रकारात मोडते. त्यांनी विठ्ठलाला केवळ आपले दैवत मानले नाही, तर आपला रक्षक आणि सर्वस्व मानले.


कान्होपात्रा यांचे विचार आणि भक्ती मुख्यत्वे ‘शरण जाणे’ यावर आधारित होती. संकटाच्या वेळी माणसाने इतर कोणाकडेही न जाता केवळ भगवंताच्या चरणी लीन व्हावे, हा त्यांचा ठाम विश्वास होता. बिदरच्या बादशहाने जेव्हा त्यांना आपल्या दरबारात आणण्याची सक्ती केली, तेव्हा त्यांनी विठ्ठलाच्या चरणी प्राण अर्पण करणे पसंत केले, पण स्वत:चे पावित्र्य आणि भक्ती ढळू दिली नाही. त्यांच्या विचारांमधून सामाजिक बंधनांपेक्षा ईश्वराप्रति असलेले प्रेम श्रेष्ठ असल्याचे दिसून येते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड न करता ईश्वरावर अतूट श्रद्धा ठेवण्याचा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. संत कान्होपात्रा यांनी रचलेले अभंग त्यांच्या मनातील आर्तता, विठ्ठलाविषयीची ओढ आणि व्याकूळता दर्शवतात.

नको देवराया अंत आता पाहू.. हा अभंग संत कान्होपात्रा यांच्या अत्यंत व्याकूळ मनाची साक्ष देतो, जेव्हा बिदरच्या बादशहाचे सैनिक त्यांना पकडण्यासाठी आले होते. तेव्हा तिच्या तोंडून आलेली ही आर्त हाक आहे. नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे॥ हरिणीचे पाडस व्याघ्रे वेढियले। अपुल्या माउली पाहतसे॥ तुजविण ठाव न दिसे या त्रिभुवनी। धावे धावे चक्रपाणी वेगी आता॥ कान्होपात्रा म्हणे शरण आले तुला। पावे माउली पंढरीच्या राया॥ या अभंगात कान्होपात्रा म्हणते, हे विठ्ठला, आता माझा अंत पाहू नकोस. माझा प्राण व्याकूळ झाला आहे. ज्याप्रमाणे वाघाने घेरलेले हरणाचे पाडस आपल्या आईची वाट पाहते, त्याप्रमाणे मी तुझी वाट पाहत आहे. या तिन्ही लोकांत तुझ्याशिवाय मला दुसरा कोणताही आसरा नाही. हे चक्रपाणी विठ्ठला, आता लवकर धावून ये. कान्होपात्रा तुला शरण आली आहे, हे पंढरीच्या राया, मला पाव! अशी अत्यंत आर्त आणि व्याकूळ होऊन भक्तिपूर्वक घातलेली ही साद आहे.


आणखी एका अभंगात कान्होपात्रा म्हणते, पतितपावन नाव ऐकुनी आलो दारा... ईश्वराच्या ‘पतितपावन’ (पापी लोकांना पावन करणारा) या रूपावर विश्वास ठेवून त्यांनी हा अभंग रचला आहे. पतितपावन नाव ऐकुनी आलो दारा। पतित पावन न व्हावे तरी हा विसरा॥ मी तर पतित महाअपराधी देवा। काय मुखे करू तुमची सेवा॥ कान्होपात्रा म्हणे शरण आले तुला। पावे माउली पंढरीच्या राया॥ म्हणजे कान्होपात्रा म्हणते, देवा, तू पतितपावन आहेस असे ऐकून मी तुझ्या दारी आले आहे. जर तू मला पावन करणार नसशील, तर तुझे हे नाव विसरून जा. मी तर अत्यंत अपराधी आणि पतित आहे, मी कोणत्या मुखाने तुझी सेवा करू? पण तरीही मी तुला शरण आले आहे, मला सांभाळून घे. विठ्ठलावर प्रचंड श्रद्धा यातून दिसून येते. एका अभंगात कान्होपात्रा म्हणते, अगा वैकुंठीच्या राया... म्हणजे विठ्ठलाला आळवताना आणि त्याच्या दर्शनाची ओढ व्यक्त करताना हा अभंग गायला जातो. अगा वैकुंठीच्या राया। सख्या विठ्ठल सखया॥ तुजविण मज कोणी। नाही देव या भुवनी॥ हे वैकुंठाच्या राजा, माझ्या सख्या विठ्ठला! या पृथ्वीवर तुझ्याशिवाय मला दुसरा कोणताही देव किंवा रक्षक नाही. तूच माझा एकमेव सखा आहेस. संत कान्होपात्रा यांचे अभंग हे केवळ काव्य नसून, ती विठ्ठलाशी साधलेली थेट आणि अत्यंत प्रामाणिक संवादरूप भक्ती आहे. आजही पंढरीच्या आषाढी-कार्तिकी वारीत त्यांचे अभंग अत्यंत भक्तिभावाने गायले जातात. कान्होपात्रा आपल्या भक्तीत लीन असताना सतत नामस्मरण करत असे. नामस्मरण हा वारीतील मार्गाचा फार मोठा आत्मा आहे.

प्रफुल्ल फडके/ संतकृपा



No comments: