Tuesday, June 23, 2020

माया ही पंढरी, सेवा ही पंढरी

 या वारीमध्ये अनेकजण सेवा करण्यासाठी येतात. अनेकजण वारीची माया पाहण्यासाठी येतात. या वारीचे वातावरण अक्षरश: मायामय असते. मोह पाडणारे असते. कारण यातील सांस्कृतिक वैभवही ताकदीचे असते. या वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत हे आपण वाचले आहे. त्यामध्ये 1) उभे, 2) गोल. अशी रिंगणे असतात. एकुण या वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात.
त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात. या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो. हे याची देही याची डोळा पाहिल्याशिवाय नाही समजणार. पण तरीही वारीचे वर्णन वाचताना, ऐकतानाही आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहिले तर या प्रवाहात येण्याची ईच्छा होईल यात शंका नाही. कारण इथे सगळे काही शिस्तबद्धपणे आणि रितीने होत असते. कसलाही गोंधळ किंवा धुडगूस नसतो. आपण मोर्चे पाहतो तेंव्हा अनेकांच्या अनेक घोषणा असतात. कुणाचा कुणाला मेळ नसतो. कोण काय बोलत असतो, कोण काय घोषणा देतो यात एकवाक्यता नसते. पण वारीत तसे होत नाही.
वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.
दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.
     हे सगळे नियोजन असते. पण शतकानुशतकांच्या सवयीने ते आपोआप होते असे वाटते. वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात. वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.
     वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात. रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.
    सुरवातीलाच आज म्हटले की इथे मायेसाठी आणि सेवेसाठी लोक येतात. त्यामध्ये काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते.
     काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात. वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड  हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात. संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात.
      श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात. वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो. श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात ‘माऊली’ असेच म्हणते.
लेकराचे हित चिंतते ती माऊली! विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे ‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊली’ म्हणून गौरविले. नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते. जगी ऐसा बाप व्हावा। ज्याचा वंश मुक्तीस जावा॥पोटा येतां हरले पापा। ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय म्हणतात. श्रींचे वारी सोहळ्यात होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत.
     म्हणून या वारीत मिळणारा आनंद हा अवर्णनीय असा असतो. एक तरी ओवी अनुभवावी एक तरी वारी करावी म्हणजे आयुष्य सफल झाले असे सांगावेसे वाटते.
प्रफुल्ल फडके/ 9152448055

No comments: