वसंतात कोकीळेचे होणारे आगमन, ग्रीष्मात आषाढातला पहिला दिवस, श्रावणातील उनपावसाचा खेळ, शरदातील चांदणे, हेमतांची कडाक्याची थंडी आणी शिशिरातील पानगळ हे साहित्यातील रसनिर्मितीचे स्त्रोत असतात. त्यातला आजचा एक दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील पहिला दिवस. ‘आषाढ’ म्हटलं की, आठवतो ढगांच्या काळ्या पुजक्यांआडून गर्जना करत बसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्यकृती असलेलं ‘मेघदूत’. निसर्ग, प्रदेश, माणसं याबद्दलचं कालिदासाचं भान आणि जाण, अवघ्या सृष्टीबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला या आषाढात सतत जाणवत राहतं आणि मनात तरळते ती ‘मेघदूत’ या सर्वागसुंदर प्रेमकाव्यातली पहिली ओळ ‘आषाढस्य प्रथम दिवसे।’
कोणतेही मोबाईलचे नेटवर्क, सॅटेलाईट नसताना, इंटरनेट नसताना कसे काय बरे असे काव्य निर्माण होउ शकते? तर जे न देखे रवी ते देखे कवी हेच याला उत्तर आहे.
काल सूर्यग्रहणासह पावसाचा सांगावा घेऊन आलेला ‘ज्येष्ठ’ संपला आणि आषाढाला सुरुवात झाली. आषाढ म्हणजे निळ्या-जांभळ्या मेघांनी आभाळ भरून येतं. गरजू लागतं. पावसाचे टपोरे थेंब ताल धरू लागतात. मध्येच वाराही उनाड मुलासारखा धिंगाणा घालतो. उकाडयानं त्रस्त झालेल्या धरेला आषाढसरींचा शिडकावा हवाहवासा वाटतो. ओल्या मातीच्या गंधानं उल्हसित झालेलं वातावरण होरपळल्या धरेला आणि आपल्या मनालाही तजेला देतं. आषाढात कधी झोडपणार्या या पावसाला सासरा असेही म्हणतात. सासरा जसा झोडपून काढतो, तसा दणाणा हा पावसाचा असतो.
आषाढातली सृष्टीची ही रूपं पाहून प्रेमीजनांच्या प्रेमभावना ही उत्फल्ल होतात. खरं तर राधेच्या अन् गोपींच्या प्रेमात रंगलेल्या श्रीकृष्णानं भगवद्गीतेत “मासानां मार्गशीर्षोऽहम” ऐवजी “आषाढोऽहम” असं म्हणायला हवं होतं. पावसाचं भरभरून दान देणारी, प्रेमिकांना एका अनोख्या रंगात भिजवून चिंब करणारी आषाढवेळा म्हणूनच तर महाकवी कालिदासालाही भावली असावी. किंबहुना या पावसाच्या सरी या सृजनशिलतेचे प्रतिक असल्यामुळे आणि या वातावरणातच नवे बिज अंकुरण्याची ताकद असल्यामुळे कालिदासांना हा महिना आवडला असावा. कारण अंकुरण्याचा संबंध त्यांनी प्रेमाशी जोडला आहे असे वाटते.
कालिदासाच्या ‘मेघदूता’त विशेष भूमिका बजावणारा मेघ, या हंगामात मात्र मोठ्ठी दडी मारून गायब झालेला असला तरी या काव्याचा प्रारंभ असणारा आषाढाचा हंगाम आजपासून सुरू झाला. कालिदासांचे ‘मेघदूत’ हे एक सर्वागसुंदर प्रेमकाव्य आहे. ते कुठल्याही पुराणकथेवर आधारलेलं नाही. मानवी अंत:करणातील प्रेमाचा आणि त्यातून उद्भवणा-या विरहवेदनांचा तो सुस्पष्ट आविष्कार आहे. कालिदासाची ‘मेघदूत’ ही एक साहित्यकृती वाचल्यावर तो स्वत: किती सुजाण रसिक होता, याची कल्पना येते.
खरं सांगायचं तर ‘मेघदूता’ला विशेत अशी कथा नाही, पण त्यामागची कल्पना मात्र जबरदस्त आहे. कोण्या एका यक्षाकडून त्याच्या कर्तव्यात काही चूक घडली आहे. त्यामुळे त्याला वर्षभर घरापासून आणि अर्थातच त्याच्या प्रिय पत्नीपासून दूर राहण्याची शिक्षा मिळाली आहे. या शिक्षेच्या कालावधीतले आठ महिने संपून आता केवळ चारच महिने उरले आहेत. पण आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी या यक्षाला एका उंच पर्वतावर उतरलेला एक मेघ दिसतो आणि त्याच्या भावना उचंबळून येतात. त्याला आपल्या पत्नीची तीव्र आठवण येते आणि विरहाच्या सलानं तो व्याकूळ होतो. वाढतच जाणा-या विरहात त्याच्या मनाला कशाचंच भान राहात नाही. तो त्या अचेतन मेघालाच आपला दूत बनवू पाहतो. त्या मेघाच्या संमतीची वाटही न पाहता त्याच्यावर दुताचं काम सोपवून टाकतो. दूरवर, हिमालयाच्या पायथ्याशी असणा-या अलकानगरीत यक्षाची अतिप्रिय पत्नी राहात असते. तिला या मेघानं आपला संदेश सांगावा, आपल्या सांत्वनाचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचावेत, अशी यक्षाची इच्छा आहे. यासाठी त्या मेघाने अलकानगरीपर्यंत कसा प्रवास करावा, हे तो त्या मेघाला समजावून सांगतो. मेघाला अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग माहित नाही तो मार्ग या काव्यात कालिदास सांगतात. अलकानगरीत पोहोचल्यावर त्याच्या प्रियेचं निवासस्थान कसं शोधावं, तिला कसं ओळखावं, हेही तो समजावून सांगतो. एवढाच ‘मेघदूत’ या काव्याचा कथाविषय. म्हणजे किती सुरेख कल्पना आहे. प्यासा सावन सारख्या चित्रपटात मेघा रे मेघा रे, आज तू प्रेम का संदेश बरसा दे हे गाणे जे निर्माण झाले आहे ते यातूनच निर्माण झाले असावे. कारण आजवर प्रेमाचा संदेश घेउन जाणारा फक्त राजहंस होता, कबूतर होते. पण एक निर्जिव मेघ असा प्रेमदूत बनून कसा जाउ शकतो? कविची अफाट कल्पना. त्या कल्पनेचेच कौतुक वाटते. अशा अफाट कल्पना सुचण्याचा, अंकुरण्याचा हा हंगाम म्हणजे आषाढ महिना. त्या महिन्याचा आज पहिला दिवस.
म्हणजे, त्या मेघदुताला कथानक असं फारसं काही नाही आणि तरीही त्यातला प्रत्येक श्लोक नितांत रमणीय झाला आहे. कारण त्यात निसर्गाचं रूप वर्णन आहे, त्याच्या आश्रयानं प्रेमिकांच्या भावभावनांचं प्रकटीकरण आहे. हा आविष्कार अत्यंक तरल असला तरीही अतिशय उत्कट आहे.
Thursday, June 25, 2020
आषाढस्य प्रथम दिवसे।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment