हरिपाठ कीर्तन ऐकती सवडी। तयां लाभे जोडी वैकुंठाची।। असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. जे लोक वेळ काढून हरिपाठ ऐकतात किंवा कीर्तनात दंग होतात, त्यांना थेट वैकुंठाचे सुख या भूतलावरच मिळते. हरिपाठातील सतराव्या अभंगात माउली म्हणतात, हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृ पितृ भ्रातृ सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥४॥ म्हणजे, हरीचा जप करून वाणीनें हरीची कीर्ती जो गाईल त्याचा देह पवित्र होईल. हरिनामसंकीर्तनाच्या सामर्थ्याने ज्याने अगणित तप केले तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठात वास्तव्य करतो. आणि तो आईबाप, भाऊबंद तसेच त्यांचे अनेक गोत्रज ही सर्व मनुष्ये चतुर्भुज होऊन वैकुंठी राहतात; म्हणजे त्यांना सरूपतामुक्तीचा लाभ होतो. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अति गुप्त आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरू निवृत्तिनाथ यांनी माझे हाती दिल्यामुळे मी ज्ञानसंपन्न झालो. हरिभक्तीचे अत्यंत सोपेपणाने महत्त्व इथे ज्ञानदेव सांगतात आणि या कार्याचे श्रेय आपल्या गुरूलाही देतात.
त्याआधी सोळाव्या अभंगात माउली म्हणतात, हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥१॥ राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धि ॥२॥ सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निमाले साधुसंगे ॥३॥ ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । तेणें दशदिशा आत्माराम ॥४॥ इथे ज्ञानदेव म्हणतात, ज्याच्या बुद्धीमध्ये हरिचिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्ये सुलभ रामकृष्णनामाचे वास्तव्य आहे, असा मनुष्य फारच दुर्लभ असतो. ज्यांनी रामकृष्णनामाच्याच भजनाने संकल्पविकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्मस्थितीचा लाभ करून घेतला, त्याला परिपूर्ण परब्रह्मसिद्धी प्राप्त झाली अथवा त्याला जगातील सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. भगवद्चिंतनानें बुद्धीला सिद्धी प्राप्त होते, म्हणजे बुद्धीचे मल दूर होऊन तिची उत्तम सिद्धी होते, देहतादात्म्याने पंचविषयाच्या भोगात गुंतलेल्या व त्रिविधतापाने तप्त झालेल्या प्रापंचिक जीवांची शांती साधूंच्या संगतीने होते. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामचिंतनाने माझ्या हृदयांत रामकृष्णस्वरूपाचा ठसाच उमटला आहे. त्यायोगाने दाही दिशांमध्ये आत्माराम भरलेला भासत आहे. आत्मशुद्धीसाठी हरिनाम महत्त्वाचे आहे. त्याची महती हरिपाठात सांगितली आहे. म्हणूनच वारीच्या मार्गावर हरिचे नाम घेण्याची शिकवण देण्यासाठी हरिपाठ आणि कीर्तन हे सातत्याने होत असते. प्रत्येक मुक्कामात प्रत्येक दिंडीत कीर्तन होत असते. संपूर्ण वारी ही हरिमय होऊन जाते. हरिचे हे विशाल रूप आपल्याला वारीत दिसते.
हरिपाठाबरोबर आपण सगळ्या संतांच्या शिकवणुकीकडेही पाहतो आहे. आत्तापर्यंत आपण संत गोरोबा यांची समर्पण भक्ती, संत कान्होपात्राचा विठ्ठलावरचा विश्वास आणि आत्मसमर्पणाची भावना, संत एकनाथ महाराजांची समानतेची शिकवण, संत जनाबार्इंची विठ्ठलाशी झालेली एकरूपता पाहिली, संत चोखा मेळा यांचे प्रेम पाहिले. आता पुढच्या टप्प्यात आपण संत सावता माळी यांच्यातील कर्मयोग पाहणार आहोत. आपला हा महाराष्ट्रधर्म खºया अर्थाने समृद्ध केला आहे तो वारकरी संप्रदायाने. याचा पाया ज्ञानदेव आहेत, तर तुकोबाराय कळस झाले आहेत. चारी मुक्ती लाभण्यासाठी हरिनाम आणि हरिपाठ किती महत्त्वाचा आहे हे प्रत्येकाने आपापल्या परीने सांगत हा संप्रदाय महान केला आहे.
प्रफुल्ल फडके/ संतकृपा
No comments:
Post a Comment